वसई: पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच धोक्याचा बनला आहे. यंदाच्या चालू वर्षात मीरारोड ते वैतरणा या सात स्थानकाच्या दरम्यान १२२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महिन्याला सरासरी १० ते १५ जण रेल्वे अपघातात दगावत आहेत.
मागील काही वर्षांपासून वसई विरार व मिरा भाईंदर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकरणासोबतच रेल्वे लोकल गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संख्या बेसुमार वाढली आहे. विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर, मिरारोड या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. वाढत्या प्रवास गर्दीमुळे प्रवाशांचा अक्षरशः धोकादायक प्रवास होऊ लागला आहे. काही वेळा लोकल गाड्यांच्या अनियमित वेळांमुळे लोकल गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. गर्दीमुळे काही प्रवासी लोकलमधून लटकून प्रवास करतात. त्यामुळे तोल जाऊन पडण्याचे प्रमाण ही अधिक आहे. तर लवकर गाडी पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून व निष्काळजीपणे धावत जाऊन लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही अपघात घडू लागले आहेत तर काही अपघात हे भरधाव वेगाने येणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या धडका लागून घडले आहे.
मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. या सात रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जानेवारी ते सप्टेंबर नऊ महिन्यात १२२ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. तर १३४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालत्या गाडीतून पडून व ठोकर लागून अधिक अपघात घडले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दररोज लोकलमधून लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात मात्र काही प्रवासी हे निष्काळजीपणे प्रवास करतात त्यामुळे अशा घटना समोर येत आहेत.असे पोलिसांनी सांगितले आहे.
रेल्वेत आत्महत्या प्रमाणात वाढ
मागील काही वर्षांपासून रेल्वे स्थानकात आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. काही जण रेल्वे रुळावर उडी मारून व त्या ठिकाणी झोपून आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असतात. आतापर्यंत घडलेल्या रेल्वे अपघातात किमान ४० आत्महत्या करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जीवघेणी गर्दी
मागील तीन ते चार वर्षात रेल्वे लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ दहा ते बारा लाख इतके प्रवासी प्रवास करीत होते. आता जवळपास मिरारोड ते वैतरणा या स्थानकातून २२ ते २५ लाख इतके प्रवासी प्रवास करतात. यातील सर्वाधिक प्रवासी हे नालासोपारा आणि विरार स्थानकातून प्रवास करतात. या गर्दीचा फायदा चोरटेही घेऊ लागले आहेत.
वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतात. महिन्याला सरासरी १० ते १५ जणांचा अपघाती मृत्यू होत असतो. अपघात कमी व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांनी सुद्धा काळजीपूर्वक प्रवास करावा. :- भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई रेल्वे पोलीस ठाणे</strong>