रिक्षा प्रवाशांकडून लूट सुरूच

एकीकडे एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरू असताना रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे.

प्रवासी मर्यादा शिथिल तरीही भाडे दुप्पट

विरार :  एकीकडे एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरू असताना रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे. प्रवासी संख्येवरील मर्यादा शिथिल केली असली तरी मात्र भाडेवाढ कायम असल्याने नागरिकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहतूक शाखा अथवा परिवहन विभागाने रिक्षा प्रवासी मर्यादेत कोणतीही सुट दिली नसतानाही रिक्षाचालक अतिरिक्त प्रवासी वाहतूक करून त्यांच्याकडून दुप्पट भाडे घेत आहेत.

कोरना काळात संसर्ग वाढू नये म्हणून रिक्षा वाहतुकीवरही निर्बंध आणले होते. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षांचा वापर केला जात होता. पण जसजसा करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तस तशी रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आली. पण फक्त दोनच प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे रिक्षाचालकांनी आधीच्या भाडय़ात दुपटीने वाढ केली होती. नागरिकांनी सुद्धा केवळ दोन प्रवासी असल्याने ही भाडेवाढ निमुटपणे सहन केली.

सध्या रिक्षा वाहतूक बहुतांश ठिकाणी सुरळीत झाली आहे. रिक्षाचालक परवानगी नसतानाही ३ ते ४ प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत. तरीसुद्धा त्यांच्याकडून दुप्पट भाडे घेत आहेत. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने नाईलाजाने प्रवाशांना ही भाडेवाढ सहन करावी लागत आहे.

विरार फुलपाडा रिक्षा आगारात काही रिक्षाचालकांनी अतिरिक्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकास दुप्पट भाडे देऊ नये असे फलक लावले होते. पण काही रिक्षाचालकांनी त्यास विरोध केल्याने त्यांनीसुद्धा माघार घेतली. तसेच विरार रेल्वे स्थाकानात मनवेल पाडा, कारगिल नगर, नागीदास, जीवदानी रोड, चंदनसार अशा ठिकाणी रिक्षा उभ्या असतात. या ठिकाणी रिक्षा चालक तीन प्रवासी घेऊन जात आहेत. पण तरीही प्रवशांकडून दुप्पट भाडे आकारले जात आहे.   

शहरातील सर्वच भागांत करोना काळाच्या आधीच्या दरात रिक्षाचालकांनी दुपटीने वाढ केली आहे. जिथे १० रुपये होते तिथे २० रुपये झाले तर जिथे २० रुपये भाडे होते तिथे ४० रुपये तर रात्रीच्या वेळी वाट्टेल ते भाडे आकारले जात आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. महापालिकेची बससेवा मर्यादित असल्याने नागरिकांना रिक्षावाल्यांच्या भाडेवाढीला बळी पडावे लागत आहे. 

यासंदर्भात विरार वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी माहिती दिली की, अजूनही किती प्रवासी बसवावेत यासंदर्भात कोणतेही नवीन आदेश आले नाहीत. यामुळे रिक्षाचालकांनी जुन्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित आहे. तसेच अतिरिक्त भाडे अथवा जादा प्रवासी घेवून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. सध्या रिक्षाचालक कमीत कमी तीन प्रवासी बसवितात, त्यातही भाडे दुप्पट आकारतात. त्यांना काही बोलायला गेले तर हुज्जत घालतात. प्रवासी जास्त बसवीत असतील तर भाडे कमी करावे.

 – धर्मेश मीना, प्रवासी

यासंदर्भात अनेक वेळा रिक्षाचालकांना सांगितले आहे की, भाडे कमी करावे पण वेगवेगळय़ा युनियन आणि बेकायदा रिक्षांचा भरणा झाल्याने कुणीही भाडेवाढ कमी करायला तयार नाही. या संदर्भात लवकरच वाहतूक पोलिसांना सांगून कारवाईसाठी सांगितले जाईल

प्रेमकुमार गुप्ता, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष, विरार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Looting rickshaw passengers continues ysh

ताज्या बातम्या