वसई: २४ वर्षांपूर्वी माझे लग्न डहाणू मध्ये झाले होते. त्यावेळी वसई विरारमध्ये ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शुक्रवारी संध्याकाळी त्या वसईत आल्या होत्या.

वसई विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे- पंडित यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी संध्याकाळी स्मृती ईराणी यांची वसईत जाहीर सभा झाली. माझं सासर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे. २४ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यावेळी जिल्ह्यात अनेक समस्या होत्या. आज मी सासरच्या लोकांना विचारलं तर या समस्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आजार दूर केले आहेत.

हेही वाचा >>> वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई शहराला लागलेला आजार तुम्ही येत्या २० तारखेला दूर करा असे आवाहन त्यांनी केले. करोना काळात मोदी सरकारने नागरिकांना मोफत लसी दिल्या होत्या. त्यामुळे आपण सर्व जण जगलो. परंतु ज्यांची या विधानसभेत सत्ता आहे ते जर त्यावेळी देशात सत्तेवर असते तर इंजेक्शन मिळाले असते का? लोक जिवंत राहिले असते का? असा सवाल त्यांनी केला. मी माजी केंद्रीय मंत्री आहे. तुम्ही मला थेट प्रश्न विचारू शकता, बोलू शकता. परंतु येथील सत्ताधार्‍याना तुम्ही असे निर्भिडपणे प्रश्न विचारू शकत नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे वसईतील दहशतवादावर भाष्य केले. वसईच्या आनंद नगर येथील विश्वकर्मा सभागृहात झालेल्या या सभेत स्मृती ईराणी दोन तास उशीरा पोहोचल्या. त्यांची वाट पाहत भाजपाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सभेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज पाटील, शेखर धुरी, उत्तम कुमार, रिपब्लिकन पक्षाचे ईश्वर धुळे आदी नेते उपस्थित होते.