भाईंदर :-ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे नवरात्री काळात आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायच्या वाहतूक विभागाने जारी केली आहे.
ठाणे मार्गांवर वाहतूक कोंडीची तीव्र समस्या जाणवत आहे. या कोंडीचा थेट फटका ठाणे शहराच्या अंतर्गत वाहतुकीवर बसू लागला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतल्यानंतर अवजड वाहनांना सकाळी ६ ते दुपारी ११ आणि दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत बंदी घालत असल्याचे आदेश ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केले होते.
मात्र तरी देखील बंदी कालावधीत अनेक अवजड वाहने घोडबंदर येथील गायमुख मार्गांवरून ठाण्यात येत असल्याचे आरोप भाजप सह अन्य सर्वाकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे व मुंबई अहमदाबाद महामार्गवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी आपला दौरा आयोजित केला होता. मात्र ऐन वेळी तो रद्द करण्यात आला.
दरम्यान ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता २० सप्टेंबर पासून २ ऑक्टोंबर म्हणजे दसऱ्यापर्यंत अवजड वाहनांना ठाणे मार्गांवर बंदी घालत असल्याचे आदेश मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी जारी केले आहेत.या काळात मुंबई अहमदाबाद महामार्गवरून अवजड वाहने हे ठाण्याच्या मार्गाने जाऊ नये म्हणून त्यांना महामार्गवरून प्रवास करण्यास ठराविक वेळेत बंदी घालण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तर सदर आदेश सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते १० पर्यंत लागू असणार असून अन्य वेळी प्रवासाची मुभा दिली जाणार आहे.
या मार्गांवर असणार बंदी
- मुंबई हुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ बंदी.
- गुजरातहुन येणाऱ्या अवजड वाहन खानिवडे टोल नाका येथे बंदी.
- पालघर हुन येणाऱ्या अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे बंदी.
- वसई हुन येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी फाटा येथे बंदी.