भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर शहराने देशात अव्वल स्थान मिळाले असल्याने राष्ट्रपतींच्या द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पालिकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील शहरांचे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेच्या आधारे मूल्यांकन केले जाते. २०२४-२५ च्या या स्पर्धेत पाच हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता, त्यात मिरा भाईंदरने बाजी मारली.

गुरुवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी ३ लाख ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिरा भाईंदर देशात अव्वल असल्याचे घोषित करण्यात आले. यंदा महापालिकेला ‘५ स्टार कचरामुक्त शहर’ व ‘वॉटर प्लस’ हे प्रतिष्ठेचे मानांकनही प्राप्त झाले आहे. महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी २०२३ च्या स्पर्धेत मिरा भाईंदर महापालिका तिसऱ्या क्रमांकावर होती.

म्हणून मिळाले यश…

मिरा भाईंदर महापालिकेने कचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचारी कल्याण, नागरिक सहभाग, जलव्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.देशातील पहिला स्वदेशी ‘विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्प’ मिरा भाईंदरमध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज १० टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या प्रकल्पात प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज ८ टन ओला आणि सुका कचरा प्रक्रिया केला जातो.शहरातील मलनि:सारण प्रकल्पाद्वारे दररोज ११० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर सार्वजनिक स्वच्छतेसाठी केला जातो.याशिवाय सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी थेट संवाद, दुकानदारांमध्ये जनजागृती आणि स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान महत्त्वाचे ठरले असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.