रेल्वे विकास महामंडळाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे तीन वर्षांपासून पडून
मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवाशांना जलद प्रवासाचा आणखी एक पर्याय ठरू शकणारी पनवेल ते वसईदरम्यानच्या लोकलसेवेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी अडकला आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान सध्या उपलब्ध असलेल्या मार्गावरून उपनगरी रेल्वेसेवा चालवण्यासाठी व त्याच्याशी संबंधित अन्य कामांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून त्याला अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.
सध्या पनवेल-वसईदरम्यान दोनच रेल्वेमार्ग असून यावरून मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गाडय़ा धावतात, तर बाहेरगावावरून येणाऱ्या गाडय़ाही या दोन स्थानकांदरम्यान थांबतात. निमशहरी आणि ग्रामीण भागांसाठी रेल्वेकडून प्रवाशांसाठी मेमू ट्रेन सेवा उपलब्ध केली जाते. मात्र या सेवेच्या फेऱ्या मर्यादित असल्यामुळे असंख्य प्रवाशांना तिचा लाभ घेता येत नाही. उलट पनवेलहून वसईसह मुंबईतील पश्चिम उपनगरांकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित रेल्वेसेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यासाठीही एमआरव्हीसी सर्व पडताळणी तपासून पाहत आहे.
पनवेल-वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याची एमआरव्हीसीची योजना आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी) ए अंतर्गत याचा समावेश केला आहे. लोकलसाठी आणखी दोन मार्ग उभारण्याची योजना होती. मात्र तांत्रिक मुद्दे उपस्थित करून २०१९ मध्ये केंद्र सरकारने या मार्गिकेचा पुन्हा आढावा घेण्यास एमआरव्हीसीला आदेश दिले होते आणि त्यानुसार आढावा घेतल्यानंतर सध्याच्या उपलब्ध दोन मार्गावरूनच लोकल चालवण्याची योजना तयार करण्यात आली. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
या संदर्भात राज्य सरकारसोबत वारंवार बैठकाही घेण्यात आल्या आहेत; परंतु प्रकल्पात त्यांनी रस दाखवला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले. येत्या दोन ते तीन वर्षांत याच भागातून मालवाहतूक रेल्वे गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर) होत आहे. त्यामुळे मालगाडय़ाबरोबरच मेल, एक्स्प्रेसही धावणे शक्य होईल. त्याचा फायदा लोकल सेवांसाठी होणार आहे. सध्याच्या दोन मार्गिका लोकलसाठी उपलब्ध होताच पनवेल-वसई प्रवास सुकर आणि झटपट होणे शक्य होईल. त्यासाठी फलाट, सिग्नलसह अन्य कामे करावी लागतील; परंतु २०१९ पासून हा प्रकल्प राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
९८० कोटींचा खर्च सध्या पनवेल ते वसईदरम्यान उपलब्ध दोन मार्गावरूनच उपनगरीय रेल्वे चालवण्याचे नियोजन असून त्यासाठी ९८० कोटी रुपये खर्च आहे; परंतु मंजुरीची प्रतीक्षा असल्याने त्याच्या खर्चात वाढही होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.