वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव, वाहनचालकांची निष्काळजी अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघातांच्या घटना समोर येत आहेत. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. मागील आठ महिन्यात महामार्गावर १४३ अपघात घडले आहेत. त्यात ५७ जणांचा बळी गेला आहे तर ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून वसई विरार, पालघर, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, गुजरात राज्यासह विविध भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही प्रचंड वाढली आहे. त्यातच आता अपघाताच्या ही विविध घटना समोर येत आहेत. विविध ठिकाणी तयार झालेले जीवघेणे खड्डे, काही भागात रस्त्याची झालेली लेन कटिंग, रस्त्यामध्येच उभ्या केलेल्या वाहनांना धडका लागणे, अपुरे दुभाजक, पथदिव्यांचा अभाव, भरधाव वेगाने येणारी वाहने, वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत.
दहिसर टोल नाका ते विरार शिरसाड या दरम्यान जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत १४३ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ जण गंभीर जखमी झाले असून ३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सातत्याने महामार्गावर अपघातांच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. मात्र काहीवेळा वाहनचालक नियमांचे पालन करीत नाहीत त्यामुळे अपघातांच्या घटना घडतात. याशिवाय रस्ते दुरुस्तीची कामांसंदर्भात वेळोवेळी प्राधिकरणाला याची माहिती दिली जाते असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
विरुद्ध दिशेने वाहनांची वाहतूक
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात माती भरावाची कामे सुरू आहेत तर मालजीपाडा, ससूनवघर भागात आरएमसी प्रकल्प असल्याने तेथील वाहने ही विरुद्ध दिशेने प्रवास करतात. वाहतूक पोलिसांकडून त्यावर कारवाई होत नसल्याने सर्रासपणे अशी वाहने भरधाव वेगाने विरुद्ध बाजूने चालविली जातात. यामुळे ही अपघाताच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दुचाकी चालकांसाठी महामार्ग धोक्याचा
राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाने काँक्रिटिकरण केले आहे. अवघ्या वर्षभरातच काँक्रिटीकरण केलेल्या रस्तावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी उंच सखल स्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी वाहनांचे टायर्स मार्क तयार होऊन रस्ता प्रचंड खराब झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. दहिसर टोल नाका ते विरार फाटा या दरम्यान दोन्ही बाजूच्या वाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठे टायर मार्क तयार झाले आहेत. अशा रस्त्यावरून दुचाकी चालविणे अत्यंत धोकादायक बनत आहे. त्यातच वाहनांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात चिखल मार्गावर येत असून त्यावर घसरून दुचाकीचे अपघात घडत आहेत.
अशा ठिकाणी सर्वाधिक अपघात
महामार्गवरील वर्सोवा पुलापासून ते चिंचोटी या दरम्यान वासमाऱ्या पूल, मालजीपाडा, लोढा धाम जवळ प्रामुख्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावखल पासून ते टोल नाका याभागात ही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. मांडवी पोलीस ठाण्यात आठ महिन्यात २५ जणांचा महामार्गावर अपघात झाल्याची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले आहे.