वसई: वसईतील एव्हरशाईन येथे पारपत्र कार्यालयाचे मंजूर होऊन वर्ष उलटत आले तरी अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही. पारपत्र कार्यालयाचे सर्व काम पूर्ण होऊनही सहा महिने झाले आहेत. उद्घाटनासाठी हे काम लांबणीवर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पारपत्र नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय सुरूच आहे.

वसई विरारसह पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र पारपत्र कार्यालय मंजूर करण्यात आले होते. हे कार्यालय पालघरला असावे की वसईला असावे याबाबत वाद सुरू होता. पारपत्राच्या मंजुरीनंतर दोन वर्षांनी कार्यालयाला वसईत जागा मिळाली होती. जानेवारी २०२२ मध्ये वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील टपाल कार्यालयात या पारपत्र कार्यालयाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले होते. येत्या दोन महिन्यांत हे पारपत्र जनतेसाठी खुले होणार असल्याची माहिती टपाल विभागाने दिली होती, मात्र आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी ते सुरू करण्यात आलेले नाही.

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. उद्घाटनासाठी या पारपत्राचे काम लांबणीवर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. वसई आणि पालघर जिल्ह्यासाठी पारपत्र कार्यालय नसल्याने नागरिकांना मुंबईच्या मालाड आणि ठाणे येथील पारपत्र कार्यालयात जावे लागत आहे. पारपत्र काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. पोलीस पडताळणीसाठी पारपत्र कार्यालयातून येणाऱ्या कागदपत्रांनाही विलंब लागत आहे. मात्र आता वर्ष उलटत आले तरीही अद्याप हे कार्यालय सुरू करण्यात आलं नाही. कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे असेच कारण टपाल कार्यालयातून देण्यात येत आहे.

सेवेसाठी सज्ज

पारपत्र कार्यालयाला जागा देण्यात आल्यानंतर आम्ही सर्व तयारी पूर्ण केली. अगदी फर्निचरपासून इतर सर्व अत्यावश्यक गोष्टी पाच महिन्यांपासूनच तयार आहेत. मात्र पारपत्र कार्यालयाकडून पुढील काही सूचना नसल्याने ते सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती टपाल खात्याचे अधीक्षक फणसे यांनी दिली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होण्याचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारपत्र कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी शिल्लक असतील; पण डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पारपत्र कार्यालय सुरू करून दिले जाईल, अशी माहिती पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.