Letter To PM Narendra Modi On Traffic Jam: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने महामार्गालगच्या नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहे. या कोंडीच्या त्रासाला कंटाळून आता आत्महत्या करावी लागेल अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. यासाठी आत्महत्येच्या परवानगीसाठी टपालाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले जाणार आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या स्थानिकांना सुद्धा बसू लागला आहे.
महामार्गलगत ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा, यासह अनेक खेडी आणि पाडे आहेत. येथे मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. येथील नागरिकांचा दळणवळण करण्याचा महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. येथील नागरिकांना लागणाऱ्या दैनंदिन भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपचार, व इतर कामांसाठी ठाणे, काशीमिरा, वसई , नायगाव यासारख्या ठिकाणी जावे लागते. परंतु महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिकच वाढू लागल्याने नागरिकांच्या दळणवळणावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या वाहतूक कोंडीमुळे घराच्या बाहेर देखील निघता येत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. तर शाळकरी विद्यार्थ्यांचे ही प्रचंड हाल होत आहेत. मुलांना शाळेत पाठवावे की नाही अशा चिंतेत पालकवर्ग सापडला आहे.
याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही तोडगा निघला नाही.या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळून आता आत्महत्या करावी लागेल अशी प्रतिक्रिया येत आहेत. यासाठी स्थानिक भूमीपुत्रांकडून अनोखे आंदोलन पुकारले जाणार आहे. मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टपालाद्वारे सामुदायिक निवेदन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे निवेदन गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ससूनवघर टपाल कार्यालय येथून पाठविले जाईल असे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत समाज माध्यमावर ही हे पत्रक फिरत असल्याने या आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
अशा आहेत मागण्या
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे त्यावर कारवाई
जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही शिस्तभंगाची कारवाई का झाली नाही?
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात यावी.