वसई: मागील काही महिन्यांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वसई विरार मधून मुंबई व ठाणे अशा ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. तासनतास या कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. तर अलीकडे या कोंडीत अडकून एक लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती.
त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाकडून आता यावर उपाययोजना केली जाणार आहे. ज्यामुळे नायगाव ते घोडबंदर आणि घोडबंदर ते नायगाव असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
घोडबंदर मार्गावर कोंडी असली की लोक वळतात ते रोरो सेवेकडे. त्यामुळे सद्यस्थित सुरू असणाऱ्या भाईंदर ते वसई रो-रो सेवेवर मोठा ताण येतो. याशिवाय ज्या काही रोरो फेऱ्या आहेत त्या सुद्धा अपुऱ्या आहेत. यामुळे रोरो फेऱ्या वाढवा याशिवाय अन्य जलमार्गाच्या ठिकाणी रोरो सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वसईतील मच्छीमारांचे प्रश्न व विविध समस्या याबाबत बैठक घेतली. या बैठकीत वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी घोडबंदर ते नायगाव अशी रोरो सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. ही रोरो सेवा सुरू करण्याच्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी ही सकारात्मक प्रतिसाद रोरो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने जे काही नियोजन असेल ते पूर्ण करावे अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
त्यामुळे ही रोरो सेवा सुरू झाल्यास नायगाव, वसई, व घोडबंदर ठाणे भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी सोयीची ठरणार असल्याचे आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी सांगितले आहे.
सर्वेक्षण करून आराखडा तयार करणार
घोडबंदर आणि नायगाव या खाडी मार्गे रोरो सेवा सुरू केली जाणार आहे. घोडबंदर येथे जेट्टीची सुविधा चांगल्याप्रकारे करण्यात आली आहे. मात्र नायगाव पश्चिमेच्या बाजूला जेट्टीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. याशिवाय ज्या भागातून ही फेरीबोट जाईल तेथील जलमार्गिका तपासणी यासह विविध तांत्रिक बाबी समजून घेऊन आराखडा तयार केला जाणार आहे.
प्रवाशांना असा होईल फायदा
नायगावहून घोडबंदरला जाण्यासाठी प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. पण, रस्त्याची दयनीय अवस्था आणि अवजड वाहने यामुळे दिवसेंदिवस या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे घोडबंदर ते नायगाव अशी रोरो सेवा जर सुरू झाली. तर, जलमार्गाने लोकांना जलद गतीने प्रवास करता येईल. तसेच यामुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांच्या वेळेचीही बचत होईल.
