scorecardresearch

Premium

वसई रोड टर्मिनस अधांतरी; तिसरा प्रस्तावही केवळ कागदावरच, पाच वर्षांनंतरही प्रतीक्षा कायम

वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या कालावधीत रेल्वे टर्मिनस तयार केले जाणार होते.

vasai road station
वसई रोड स्टेशन

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांच्या कालावधीत रेल्वे टर्मिनस तयार केले जाणार होते. मात्र २०२३ संपत आले तरी कामाचा पत्ता नाही. याबाबत अद्याप अनेक परवानग्या मिळाल्या नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे टर्मिनस अभावी वसईकरांचे हाल सुरूच राहणार आहेत.

2693 train travellers caught without tickets
अंधेरीमध्ये तिकीट तपासनीसांची फौज; एकाच दिवसात २,६९३ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून सात लाख रुपये दंड वसूल
Panvel - Uran via Bokadweera ST service started
पनवेल – उरण व्हाया बोकडवीरा एसटी सेवा अखेर दोन वर्षानंतर सुरु
special bus service Panvel-Belapur route NMMT rail block
रेल्वे ब्लॉकमुळे एनएमएमटीच्या पनवेल-बेलापूर मार्गावर विशेष बससेवा
central railways collect fine rs 16 88 crore in one month from ticketless travellers
अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनविण्याचा पहिला प्रस्ताव २०१३ बनविण्यात आला होता. मात्र तो कार्यान्वित होऊ शकला नव्हता. त्यानंतर २०१७ मध्ये दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. तोही बारगळला. पुढे २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वसई रोड रेल्वे टर्मिनस तयार करण्याची घोषणा केली. त्यात २०२३ पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. तर याबाबत पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यात रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

पहिल्या टप्प्यात किमान बांधकामांचा वापर करून काही भागांचा विकास आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्ण टर्मिनस विकसित केले जाणार होते. यासाठी ३०० हेक्टर जागा हस्तांतरित करावी लागणार होती. मात्र २०२३ वर्ष संपत आले तरी हे टर्मिनसचे काम सुरू झालेले नाही. सन २०२३-२४ पर्यंत वसई रोड रेल्वे स्थानकाचे रेल्वे टर्मिनस करण्याची योजना होती. पंरतु अनेक परवानग्या बाकी असल्याचे पश्चिम रेल्वेचे उपमुख्य कार्यकारी प्रबंधक (योजन) संदीप श्रीवास्तव यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे. दुसरीकडे सध्या वसई रेल्वे टर्मिनसचा कुठलाही विचार नाही, यासंदर्भात धोरणात्मक निर्णय बाकी असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे.

प्रवाशांची गैरसोय

वसईतून मोठय़ा संख्येने प्रवासी बाहेरगावी प्रवास करत असतात. परंतु येथील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकात जावे लागते. पश्चिम रेल्वेमधून दररोज १०३ लांब पल्ल्याच्या गाडय़ांची ये-जा असते.  त्यापैकी दररोज ४३ रेल्वेगाडय़ा या मुंबई सेंट्रल स्थानक आणि वांद्रे टर्मिनस स्थानकातून सुटत असतात. या सर्व गाडय़ा वसई रोड रेल्वे स्थानकातून जात असतात. याशिवाय ६० लांब पल्ल्यांच्या गाडय़ा या वसई स्थानकात बदलत असतात. त्यामध्ये काही उत्तरेकडे जातात तसेच मध्य रेल्वेकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे  इंजिन बदलले जात असते. या प्रक्रियेला ५० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. शिवाय दररोज ४० मालगाडय़ा वसई स्थानकातून जात असतात. त्यामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनवावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.  वसई टर्मिनस तयार झाल्यास पश्चिम रेल्वेवरील इतर टर्मिनसवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टर्मिनससाठी जमीन अधिग्रहणापासून अनेक परवानग्या बाकी आहेत.  तसे रेल्वेने आम्हाला लेखी पत्राद्वारे सांगितले आहे. ज्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता त्या कालावधीत प्रशासन परवानग्यादेखील मिळवू शकलेली नाही.  -जॉन परेरा, आमआदमी पक्ष, पालघर जिल्हाध्यक्ष.

आम्ही वसई रेल्वे टर्मिनस तयार करण्याचे काम मंजूर करवून घेतले होते. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. चालू वर्षांत ते पूर्ण होण्याची शक्यता नाही. परंतु रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते पूर्ण करवून घेऊ.  -राजेंद्र गावित, खासदार, पालघर

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai road terminus the third proposal is also only on paper ysh

First published on: 27-09-2023 at 03:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×