वसई: तीन वेळा भूमीपुजन होऊन, अडीचशे कोटींचा निधी मंजूर तरी देखील पालिकेच्या आचोळे रुग्णालयाचे काम रखडले आहे. रुग्णालयाच्या जागेचा पुन्हा एकदा तिढा निर्माण झाल्याने रुग्णालयाचे काम आणखीन लांबणीवर पडणार आहे. ही जागा सत्र न्यायालय व न्यायाधीश निवास स्थान बांधण्यासाठी नियोजित करण्यात आल्याचे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्याने रुग्णालयाचे काम थांबले आहे.

वसई विरार शहरातील नागरिकांसाठी सर्वाधिक खाटांची क्षमता, सुसज्ज अशा सोयीसुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेने प्रभाग समिती ड मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विविध प्रकारच्या अडचणीमुळे रुग्णालयाचे काम पुढे सरकले नव्हते. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यानंतर ८ जुलै २०२४ रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका क्षेत्रातील रुग्णालय व मूलभूत सुविधेसाठी २५० कोटी रुपये निधी मंजूर करून पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये निधीला मंजुरी दिली होती.

यानंतर विविध राजकीय पक्षांतर्फे भूमीपूजनही करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयाचे काम मार्गी लागेल असे वाटले होते. त्यातच आता ज्या जागेत रुग्णालय उभारले जाणार आहे ती जागा सत्र न्यायालय व न्यायाधीश निवास स्थान बांधण्यासाठी नियोजित करण्यात आली आहे. वसईतील लँड बेअरिंग क्रमांक ३७६ व सर्व्हे क्रमांक २७ ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा ही बदली स्वरूपात न्यायालय उभारणी साठी देण्यात यावी व न्यायालयासाठी नियोजित असलेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात यावी असे परिपत्रक ही काढण्यात आले आहे.त्यामुळे आता पालिकेने रुग्णालयात उभारणीसाठी आरक्षित केलेल्या जागेचा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे रुग्णालय उभारणीच्या कामाला निधी मंजूर आहे. परंतु जागा नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुसज्ज रुग्णालयाचे काम आणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

रुग्णालयाच्या कामाचे तीन वेळा भूमिपूजन

मागील पाच वर्षांपासून विविध राजकीय पक्ष यांच्या मार्फत केवळ रुग्णालयाच्या भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे. १९ ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच दिवशी बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन आमदार क्षितीज ठाकूर यांनी सुध्दा रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेचे जागेसाठी प्रयत्न सुरू

पालिकेने रुग्णालय उभारणीसाठी जागा जरी आरक्षित केली केली होती. आता ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याच्या सूचना आल्यानंतर आता नवीन जागेचा पालिकेने शोध सुरू केला आहे. यासाठी पालिकेच्या मालकीच्या जागा आहेत त्याचा शोध घेऊन त्या जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन आरक्षित असलेल्या जागेच्या ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.