वसई: मागील काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली येथील हरित पट्टा उध्वस्त होऊ लागला आहे. त्याचा मोठा परिणाम शहरात दिसून येत आहे. वसईचा हरित पट्टा टिकून राहिला पाहिजे यासाठी वसईकरांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रदिनी हरित वसई वाचवा अशी शपथ घेत नवीन चळवळ सुरू करण्याचा निश्चय नागरिकांनी केला आहे.

वसई विरार शहरात मागील काही वर्षात वाढती विकासकामे , नव्याने तयार होत असलेले प्रकल्प, बुजविण्यात येत असलेले जलस्त्रोत, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी होत असलेले दुर्लक्ष, चटई निर्देशांक क्षेत्रात करण्यात आलेली वाढ,  वाढते प्रदूषण, अतिक्रमण, बेसुमार वाळू उपसा, पाणी जाण्याचे नैसर्गिक बंद झालेले मार्ग, अशा विविध मार्गाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. आताच जर जागृत झाले नाही तर येत्या काळात वसईचा हरित पट्टा हा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.येथील हरित पट्टा व वसईचे वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा वसईतील नागरिक मैदानात उतरले आहेत.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मी वसईकर अभियानातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पापडी येथील हुतात्मा स्मारकाजवळ एकत्रित जमत वसई वाचविण्यासाठी शपथग्रहण कार्यक्रम पार पडला. यात शेकडोच्या संख्येने वसईकर व पर्यावरण प्रेमीं नागरिक सहभागी झाले होते.

विकासाच्या नावाखाली वसईचा निसर्ग व येथील संस्कृती नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. दिवसेंदिवस प्रकार वाढत असल्याने येथील निसर्ग धोक्यात सापडत आहे. तो वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा उभारायला हवा अशी प्रतिक्रिया मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकर यांनी दिली आहे. चटई निर्देशांक वाढल्याने आज शहरात काँक्रिटीची जंगल उभी राहत आहे. त्या विरोधात ही लढा उभारला जाईल. असेही खानोलकर यांनी यावेळी सांगितले.

शहराचा विकास साधत असताना पर्यावरणाचाही विचार होणे गरजेचे आहे. यात विशेषतः पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना अशी क्षेत्र सुद्धा टिकविण्याकडे पाठ फिरवली जाऊ लागली आहे. प्रशासन ही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्रासपणे झाडांच्या कत्तली सुरू आहेत. याबाबत वेळोवेळी आम्ही हरकती घेत असतो त्याला योग्य तो न्याय मिळत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते जॉन परेरा यांनी सांगितले आहे.

जो निसर्ग आपल्याला जगवतो त्याच निसर्गाला उध्वस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. आता असे प्रकार थांबविण्यासाठी पुन्हा एकदा नवीन चळवळ सुरू केली जाणार असल्याचे वसईतील नागरिकांनी सांगितले आहे.

लढा उभारणार

वसईला चळवळीचा वारसा आहे. वसईकरांनी यापूर्वी ज्या चळवळी उभ्या केल्या होत्या त्यामुळे हरित वसई टिकली होती. आता मात्र पुन्हा एकदा हरित वसई उध्वस्त करण्याचा डाव सुरू झाला आहे. त्यामुळे आता पर्यावरण प्रेमीं, वसईतील नागरिक, सामाजिक संस्था अशा सर्वांना एकत्रित सोबत घेऊन हरित वसईला वाचविण्यासाठी लढा उभारला जाईल असे मिलिंद खानोलकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.