पंचवीस लाख खर्च वाया; चार वर्षांत वापर नाही

भाईंदर: मीरा-भाईंदर शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याकरिता पालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून चार वर्षांपूर्वी ‘पाणी शुद्धता चाचणी यंत्र’ खरेदी केले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे यंत्र खरेदी केल्यापासून वापरविना धूळ खात पडल्याने प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ दश लक्ष लीटर तर एमआयडीसीकडून १३५ दश लक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी नळजोडणीद्वारे प्रशासनाला प्राप्त होत असल्यामुळे यामध्ये गळती तसेच विविध स्वरूपाच्या समस्या निर्माण होत असतात. याचा गंभीर परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर देखील होत असतो. याद्वारे अनेक साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने अशा पाण्याची वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. याकरिता प्रशासनाने २०१७ रोजी ‘पाणी शुद्धता चाचणी यंत्र’ खरेदी केले आहे.

या यंत्राद्वारे रोज पाण्याची चाचणी करून त्याचा गुणवत्ता अहवाल संबंधित विभागाला पाठवण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून म्हणजे यंत्र खरेदी केल्यापासून या यंत्राचा वापरदेखील झाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच हे यंत्र सुमारे २५ लाख रुपये खर्च करून खरेदी केल्याच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या यंत्राची मूळ किंमत त्यापेक्षा दुप्पट आहे.

यंत्र ठेवण्याकरिता जागा मिळेना

मीरा-भाईंदर शहराला होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता ‘पाणी शुद्धता चाचणी यंत्र’ खरेदी केले आहे. मात्र या यंत्राचा वापर करण्यात येत नसल्यामुळे या यंत्राला ठेवावे कुठे हा वेगळा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे पालिकेचे कामकाज करण्याकरिता जागेची कमतरता असताना हे यंत्र मीरारोड येथील प्रभाग कार्यालयाच्या उद्यान विभागात ठेवण्यात आले आहे. यामुळे या विभागात यंत्राचे अतिक्रमण झाले असून कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. तसेच हे यंत्र तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी उद्यान विभागाने पाणीपुरवठा विभागाला पत्राद्वारे केली आहे.

या यंत्राचा लवकरच वापर करण्यात येणार आहे. शिवाय ते ठेवण्याकरिता जागा नसल्यामुळे वन विभागात ठेवण्यात आले असून लवकरच तेथून हलवण्यात येणार आहे.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग)