संपदा वागळे

इतरांनी टाकलेल्या मोडक्यातोडक्या वस्तूंचंच नव्हे तर स्वत:च्या घरातील जुन्यापुराण्या चीजांचं सोनं करणं हा डॉ. सुहासिनी भांडारे आपला जन्मसिद्ध हक्क मानतात. चेंबूर नाक्यावरील ‘जसवंत बाग’ परिसरातील त्यांचं आगळंवेगळं घर पाहताना क्षणोक्षणी आपल्या तोंडून ‘अगंबाई! अरेच्या!’ असे उद्गार येत राहतात.

एक गोष्ट वाचली होती.. एक साधू फिरता फिरता तहान लागली म्हणून वाटेवरच्या एका कुंभाराकडे गेला. तिथे त्याला मडक्यांची एक मोठी रास दिसली. एक मडकं मात्र कोपऱ्यात एकटंच पडलं होतं. कारण विचारताच कुंभार म्हणाला की, ‘ते गळकं आहे, ते कोण विकत घेणार म्हणून ठेवलंय बाजूला.’ साधूने तेच मडकं मागून घेतलं आणि आपल्या आश्रमाशेजारच्या मंदिरातील शिविपडीवर टांगलं. येणारे भाविक शिविपडीला नमस्कार केल्यावर अभिषेक करणाऱ्या वरच्या मडक्याला डोकं टेकवू लागले.. ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे त्या साधूच्या स्पर्शाने एका फुटक्या मडक्याचं नशीब जसं बदललं तसंच चेंबूरमधील डॉ. सुहासिनी भांडारे यांच्या जादुई हस्तस्पर्शाने भंगारामध्ये पडलेल्या अनेक वस्तूंचं भाग्य उजळलंय.

आतापर्यंत अनेक छंदांबद्दल ऐकलं होतं, पण भंगार शोधण्याचा छंद.. तोही एका डॉक्टर बाईंना.. हे ऐकून मी अवाकच झाले. इतरांनी टाकलेल्या मोडक्यातोडक्या वस्तूंचंच नव्हे तर स्वत:च्या घरातील जुन्यापुराण्या चीजांचं सोनं करणं हा त्या आपला जन्मसिद्ध हक्क मानतात. चेंबूर नाक्यावरील ‘जसवंत बाग’ परिसरातील त्यांचं आगळंवेगळं घर पाहताना क्षणोक्षणी आपल्या तोंडून ‘अगंबाई! अरेच्या!’ असे उद्गार येत राहतात.

घराच्या रचनेपासूनच वेगळेपणा जाणवू लागतो. खरं तर हा एक तळमजल्यावरील ५०० स्क्वे. फुटांचा वन बी.एच.के. फ्लॅट, पण सुहासिनीताईंनी सभोवतालची जागा कल्पकतेने वापरून या लहानशा जागेचा ऐसपस बंगला बनवलाय. बाहेर पडायला पाच दारं, एकूण चार टॉयलेट्स आणि सभोवती बागबगीचा असा हा बंगला पाहताना त्यांना ‘तुम्ही डॉक्टर की आर्किटेक्ट,’ असा प्रश्न विचारावासा वाटतो.

चेंबूरमधील जसवंत बाग परिसर हे सुहासिनीताईंचं जन्मस्थान.. याच ठिकाणी त्यांच्या वडिलांची म्हणजे भाऊराव चेंबूरकरांची आठ एकरांची वाडी होती. तीन विहिरी, त्यांच्या पाण्यावर तरारलेला भाजीपाला. हापूस आंब्यांची राई आणि असंख्य फळझाडं व फुलझाडं ..अशा सुजलाम् सुफलाम् भूमीशी जुळलेले ऋणानुबंध अतूट राहावेत ही त्यांची तीव्र इच्छा. म्हणूनच वडिलांनी जेव्हा हा जमीनजुमला विकला तेव्हा (म्हणजे यांच्या लग्नानंतर १३ वर्षांनी ) सुहासिनीताईंनी हा छोटासा ब्लॉक आवर्जून विकत घेतला.

चेंबूरमध्ये हॉस्पिटल चालवायला घेतल्यावर जाणं-येणं सोपं पडावं म्हणून शिवाजी पार्कचं प्रशस्त घर सोडून भांडारे कुटुंब इथे राहायला आलं. १९८३ चा तो काळ. घरात पूर्ण वेळच्या बाईसह सासूबाई, नणंद, चार मुली आणि ही दोघं अशी एकूण नऊ माणसं. शिवाय मोठय़ा जागेतील अगडबंब सामान! या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी डॉक्टरीणबाईंचं डोकं कामाला लागलं.

प्रथम घरासभोवतीच्या मोकळ्या जागेवर पत्रे टाकून शेड उभारली. हे पत्रेही ब्रेबॉर्न स्टेडियमवरील जुनी शेड काढल्यामुळे भंगारवाल्याकडे जमा झालेले. शेड उभी करण्यासाठी लागणारं लोखंडही त्यानेच दिलं. या छताखाली लाद्या बसल्या आणि वर पंखे दिवे. अशा तऱ्हेने पुढच्या बाजूस मिळालेली  २० बाय १२ फुटांची जागा एका बाजूला सोफे तर दुसऱ्या बाजूला वर छत असलेला लांबरुंद झोपाळा यांनी सजली. सोफ्यांच्या बाजूला अर्धी भिंत बांधून त्यावर लांबलचक फिश टँक ठेवल्याने गप्पा मारण्यासाठी छानसा आडोसाही तयार झाला. तसंच घराचं पुढचं दार काढून तिथे पाच फूट रुंद दरवाजा आणि त्यापुढे तेवढय़ाच रुंद पायऱ्या केल्याने घराला बंगल्याचा लुक आला. या पायऱ्या चढताना आपली नजर बाहेरच लावलेल्या डॉक्टर श्रीकांत भांडारे यांच्या हसऱ्या फोटोकडे जाते आणि त्यांचं कृपाछत्र आजही या घरावर आहे.. असणार याची जाणीव होते. सध्या या घरात ८३ वर्षांच्या (कार्यक्षमता मात्र आजही ३८ची) सुहासिनीताई आपल्या लेक व जावयासमवेत राहतात.

बेडरूमच्या पाठच्या भिंतीला खिडकी नसल्याने व आजूबाजूला बंगल्यांची कामं चालू असल्याने घराचा पाठचा भाग म्हणजे एक कचरा डेपोच झाला होता. तिथे पडलेल्या डेब्रिजचाच आधार घेऊन सुहासिनीताईंनी त्या भागाची पातळी घराशी जुळवली, तिथे टाइल्स बसवल्या आणि बेडरूमला दार करून हा भागही घराशी जोडला. अशा तऱ्हेने पाठीमागे अर्धवर्तुळाकार पडवी तयार झाली. या पडवीला बाहेरच्या बाजूने पूर्ण भिंत न घालता वरच्या अर्ध्या भागात ग्रिल  बसून त्यावर जाळीदार हिरवं कापड लावल्याने हवाही खेळती राहिली.

या भागाला सुहासिनीताईंनी ‘दिवाणे खास’ हे नाव दिलंय, कारण इथे खास व्यक्तींची ऊठबस चालते. घरासमोरची जागा म्हणजे ‘दिवाणे आम’. ती आम लोकांसाठी. डॉक्टर भांडारे होते तेव्हा दोघं दिवाणे खासमध्ये बसून चहा पीत, गप्पागोष्टी करत. आता या ठिकाणी दुपारी ब्रिजचा डाव रंगतो. या जागीही १५/२० जण आरामात बसू शकतील अशी व्यवस्था आहे. ही सीटिंग अरेंजमेंट मुलींच्या जुन्या पलंगांमधून जन्माला आलीय.

ब्रिज खेळताना पत्ते टाकण्यासाठी जे टेबल वापरलं जातं ते पन्नास वर्ष जुनं आहे. हे टेबल म्हणजे शिवाजी पार्कच्या घरात असताना अंगावर बुद्धिबळाचा पट चितारलेला एक शोपीस होता. चेंबूरला आल्यावर त्याच्या प्रत्येक पायाशेजारी दुसरा थोडा लांब पाय लावून त्याचं सेंटर टेबल झालं आणि आत्ता पत्ते खेळताना थोडी अधिक उंची हवी म्हणून आणखी चार पायांची भर पडून ते बारा पायांचं झालंय. अर्थात वर टेबलक्लॉथ (तोही जुन्या चादरीचा) असल्याने हे पुनर्जन्म सुहासिनीताईंनी सांगितल्यावरच कळतात. दिवाणे खासचा उपयोग कपडे वाळत घालण्यासाठीही होतो. इथेच एका बाजूला जुन्या कडाप्प्याचं  पार्टिशन घालून एक आयताकृती कप्पा केलाय. ज्यात झाडांना लागणारी माती भरून ठेवलीय, ज्यायोगे उभ्या उभ्या कुंडय़ा भरता येतात.

बेडरूमला जोडलेल्या बाथरूममध्ये एका भिंतीवर ताटलीच्या आकाराची दोन सुरेख पेंटिंग्ज् दिसतात. ही बरण्यांची, प्लास्टर ऑफ पॅरिसची झाकणं असून रंग देऊन त्यांचा कायापालट केलाय हे समजल्यावर आपला ‘आ’ वासलेलाच राहतो आणि नंतर ‘दिवाणे खास’मधून बाहेरच्या बाजूने ‘दिवाणे आम’पर्यंत जाईस्तोवर तो मिटण्याची संधीच मिळत नाही. या वाटेवरच एक आडोसा बघून एक बैठकव्यवस्था केलेली दिसते. ही खास सोय माळी, शिंपी, सुतार, भंगारवाला.. अशा जोडलेल्या माणसांसाठी!

मागच्या भागात जे बेसिन आहे ते राजस्थानी डिझाइनने नटलेल्या दोन मोठय़ा कुंडय़ा (त्यातील वरचीचं बूड कापून) एकावर एक ठेवून बनवलंय. त्याच्या मागे भिंतीवर जे पाइप आहेत तेही कलरफुल करून त्यांच्या आसपास शंखिशपल्यांची रंगीबेरंगी सजावट केलीय. इथली पार्टशिन्स सुहासिनीताईंच्या आधीच्या घरातील चटईच्या पडद्यातून साकार झाली आहेत.

बागेतील झाडं आणि त्यामध्ये ठेवलेल्या विविध वस्तू यातील कोणामुळे कोणाला शोभा आलीय हे ठरवणं कठीण.

वडिलोपार्जति जमीन खणताना कामगारांना मिळालेले ३ चिरे सुहासिनीताईंनी देव मानून झाडामाडात उभे केलेत. झालंच तर  बेडूक, बदक, कुत्रे.. अशा नकली प्राण्यांपासून गणपती, शंकर, बुद्ध.. अशा देवादिकांच्या मूर्तीपर्यंत अनेक गोष्टी बागेत चपखल जागी मांडलेल्या दिसतात. जसं.. बेलाच्या झाडाखाली शंकर, दूर्वाच्या शेतात गणपती. धबधब्याच्या दगडांवर बेडूक याप्रमाणे. छोटं जातं, रगडा, विविध आकारांचे वरवंटे.. अशा पारंपरिक वस्तूही बागेत आपला आब सांभाळून बसलेल्या दिसतात. विशेष प्रसंगी सुरू करण्यात येणाऱ्या छोटय़ा धबधब्यापाशी जे बगळे उभे आहेत तीही सुहासिनीताईंची करामत. म्हणाल्या, ‘‘सोप्पं आहे. प्रथम वायरने वाकवून आकार द्यायचा आणि त्यावर व्हाइट सिमेंट बसवत जायचं. वाळल्यावर रंग दिला की झालं!’’

भंगारातून उचलून इथे आणलेल्या प्रत्येक वस्तूची एक स्वतंत्र कथा आहे. राजस्थानी शिपायांच्या दीड फूट उंचीच्या प्रतिकृती, विविध आकारांच्या टोपल्या, पूर्वी रेल्वे स्थानकांवर सिग्नलसाठी दाखवत तो लालटेन दिवा.. अशा बेवारसपणे कुठे कुठे पडलेल्या वस्तूंना इथे आत्मसन्मान लाभला आहे. आता तर भंगारवालेच त्यांच्याकडे एखादी विशेष वस्तू आली की स्वत:हूनच सुहासिनीताईंना फोन करतात.

झाड लावण्यात कुंडी हवीच अशी अट इथे दिसत नाही. काही रोपं फुटलेल्या (पण रंगवलेल्या) पाइपमध्ये, काही जुन्या झाडांच्या सुटलेल्या ढलप्यात तर काही शंखांमध्ये वस्ती करून आहेत. मधमाश्यांचं रिकामं पोळंही एका सुक्या फांदीखाली अलगद विसावलंय.

बागेत कुंडय़ा किती आहेत यांची तर गणतीच नाही. कोपऱ्यात बांबूचं बेट, पुढे सीताअशोक आणि पाहू तिकडे मनीप्लान्टचे वळसे! बंगल्याच्या गेटबाहेर दोन्ही बाजूला डोलणारी हिरवाई तर आपलं दारातच सहर्ष स्वागत करते. सुहासिनीताईंच्या या बागेला आजवर अनेक पुरस्कार मिळालेत.

दर्शनी भागातील एका भिंतीचा मधला पट्टाही सुहासिनीताईंनी आपल्या अदाकारीने श्रीमंत केलाय. या सजावटीची त्यांनी सांगितलेली कृती अशी.. सुकलेल्या शेण्यांची पावडर करून त्यात चुना मिसळला की छान बाइंडिंग तयार होते. या मिश्रणाचं भिंतीवर डिझाइन करून ते सुकल्यावर नैसर्गिक रंगांनी रंगवून वर आरसे लावले की ‘कोण होतीस तू.. (चांगल्या अर्थाने) काय झालीस तू..’ इतका बदल! या नटलेल्या भिंतीला लागून पार्टी प्रसंगी जेवण मांडण्यासाठी एक कट्टा केलाय. त्याखालचं कपाट म्हणजे रद्दी, चपला बूट, बागेची हत्यारे यांचं घर.

झोपाळ्याच्या बाजूच्या लाकडी खुर्च्याही खूप जुन्या. भावनगरच्या जुन्या बाजारातून आणलेल्या. या खुर्च्याना मागे आणखी एक पाय (पाचवा) लावून त्यांना तरुण केलंय. खुर्च्यावरील कुशन्सही स्पंजच्या जुन्या गाद्यांचे तुकडे कापून बनवलेली. त्यांच्या कव्हरांसाठी जुन्या रंगीबेरंगी चादरींचा उपयोग. लाकडी पट्टय़ांनी बनवलेल्या फ्रेम्स आणि त्यामध्ये पानं, फुलं, पक्षी यांची रचना असे स्वहस्ते बनवलेले शोपीस तर जागोजागी टांगलेले!

उंचावरील कुंडय़ांना पाणी घालताना झोक जाऊन पडू नये म्हणून आधारासाठी ‘दिवाणे आम’मधील छतामधून प्लॅस्टिकच्या रंगीत दोऱ्या सोडण्याची कल्पनाही भन्नाट! या दोऱ्यांखेरीज या छताच्या पुढच्या बाजूला प्लॅस्टिकच्या लांबलचक गुंडाळ्या आडव्या टांगलेल्या दिसल्या. ही व्यवस्था पावसाची झड आत येऊ नये यासाठी. यातही दोन प्रकार. पारदर्शक पडदे दिवसा सोडायचे आणि गडद रंगाचे रात्री. काम झाल्यावर गुंडाळ्या वर!

डॉ. सुहासिनी भांडारे यांचं घर म्हणजे एक धडा आहे ‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीचे पाईक असणाऱ्यांसाठी. उशांचे अभ्रे कालांतराने पायपुसणी म्हणून वापरणाऱ्यांची आपण चेष्टा करतो. पण काहीही फेकायचं नाही हे तत्त्व धरून सुहासिनीताईंनी केलेला अनेक वस्तूंचा कायापालट बघताना आपल्या (फेक दो) विचारांची लाज वाटते एवढं नक्की.

waglesampada@gmail .com