|| अ‍ॅड. तन्मय केतकर

खासगी मालक किंवा सोसायटी कोणासही विकासकाने केलेले व्यवहार झटकता किंवा नाकारता येणार नाहीत. म्हणून पुनर्विकास करताना विकासकरारापासून ते प्रकल्प पूर्णत्वापर्यंत प्रत्येक बाबतीत खासगी मालक/ सोसायटी यांनी लक्ष ठेवणे, व्यवहार आणि महत्त्वाच्या आर्थिक बाबींची  माहिती घेणे आवश्यक आहे.

शहरातील मोकळ्या जागा संपत आल्याने आता हे पुनर्विकासाचे युग आहे. सर्वसाधारणत: सोसायटीने विकासक नेमावा, विकासकाने पुनर्विकास पूर्ण करावा आणि नवीन इमारत सोसायटीच्या स्वाधीन करावी, अशी एकंदर प्रक्रिया असते. मात्र बहुतांश पुनर्विकास प्रकल्प एवढ्या सरळपणे पूर्ण होत नाहीत. विलंब, सोसायटी-विकासक वाद असे अनेक संभाव्य प्रश्न उद्भवतात. सोसायटी-विकासक वादामुळे समजा सोसायटीने विकासकास निष्कासित केले तर त्या विकासकांकडून जागा घेतलेल्या ग्राहकांचे काय, हा महत्त्वाचा प्रश्न महारेरा पुढे एका प्रकरणात उद्भवला होता.

या प्रकरणात १. अशा ग्राहकांना ताबा मिळण्याचा अधिकार आहे का? २. अशा ग्राहकांना विलंबाकरता व्याज मिळण्याचा अधिकार आहे का? हे दोन सर्वात महत्त्वाचे प्रश्न होते. महारेरा प्राधिकरणाने- १. सोसायटीने विकासकास अधिकार दिलेले असल्याने सोसायटीदेखील विश्वस्त म्हणून जबाबदार आहे, २. सोसायटी-विकासक वादामुळे विकासकास निष्कासित केल्याच्या कारणावरून विकासकाने आजपर्यंत केलेल्या व्यवहारांची जबाबदारी सोसायटीला झटकता किंवा नाकारता येणार नाही. ३. विकासक नेमणुकीपासून प्रकल्प पूर्णत्वापर्यंत सगळ्या गोष्टी वेळेवर पूर्ण होण्यावर लक्ष ठेवणे ही सोसायटीचीदेखील प्रवर्तक (प्रमोटर) म्हणून जबाबदारी आहे, या महत्त्वाच्या निरीक्षणांच्या आधारे दोन्ही प्रश्नांना होकारार्थी उत्तर देऊन ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण केलेले आहे.

हा निकाल सोसायटी पुनर्विकासा संबंधित प्रकरणात दिलेला असला तरी हेच तत्त्व खासगी जमिनीच्या विकासास/ पुनर्विकासास लागू होणार हे जवळपास निश्चिात आहे. साहजिकच खासगी मालक किंवा सोसायटी कोणासही विकासकाने केलेले व्यवहार झटकता किंवा नाकारता येणार नाहीत. म्हणून पुनर्विकास करताना विकासकरारापासून ते प्रकल्प पूर्णत्वापर्यंत प्रत्येक बाबतीत खासगी मालक/ सोसायटी यांनी लक्ष ठेवणे, व्यवहार आणि महत्त्वाच्या आर्थिक बाबींची  माहिती घेणे आवश्यक आहे. अशी माहिती नसेल आणि जर विकासकाशी वाद उद्भवला तर नक्की किती व्यवहार किंवा इतर बाबींची आर्थिक बाबींची जबाबदारी आपल्यावर येणार आहे याची कल्पनाच  खासगी मालक/ सोसायटी यांना असणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

tanmayketkar@gmail.com