आजकाल मुंबईत मोकळी पटांगणे दिसत नाहीत, पण या कॉम्प्लेक्समध्ये मुलांना खेळायला छान मोकळी जागा आहे. दिवाळीत आम्ही सर्वानी इथे खूप मजा केली. इथल्या या कम्युनिटी हॉलमुळे आज आपल्याला इतक्या सर्वाना आरामात एकत्र जमता आले. यजमान दाम्पत्य त्यांच्या मुंबईतील एका मोठय़ा वास्तुसंकुलाचे तोंडभरून कौतुक करीत होते. निमित्त होते त्यांनी नवीन घेतलेल्या आलिशान फ्लॅटच्या वास्तुशांतीचे. ते सर्व ऐकल्यावर मला अलीकडेच दक्षिण मुंबईतील एका नावाजलेल्या जुन्या चाळींमध्ये शानदारपणाने साजऱ्या झालेल्या सांस्कृतिक सोहळ्याची आठवण झाली.आजही मध्य आणि दक्षिण मुंबईत जिथे जिथे चाळी आहेत तिथे असे उत्सव नित्यनेमाने आणि उत्साहाने साजरे केले जातात आणि ज्या ठिकाणी ते साजरे होतात ती चाळींसमोरची लांबलचक आयताकृती किंवा चौकोनी जागा म्हणजे चौक. मात्र आता चाळींबरोबरच चौकही नामशेष होत चालले आहेत किंवा जिथे अशा चाळी असतील तिथले चौक आता मोटारींच्या अतिक्रमणाने आक्रसत चालले आहेत.
बैठय़ा किंवा एकमजली चाळींसमोर अंगण हा प्रकार असतो किंवा असायचा म्हणावे लागेल. परंतु ३ किंवा ४ मजली चौकोनी किंवा काटकोनात असलेल्या दोन किंवा तीन चाळींच्या मध्ये सामायिक मोकळी जागा म्हणजेच चौक हे सर्व चाळकऱ्यांचे सांस्कृतिक निधान असे. फरसबंद असल्याने हिरवाई किंवा वृक्षांची छाया वगरे प्रकार अजिबात नसत. मात्र तळमजल्यावरच्या बिऱ्हाडकरूंनी डालडाच्या डब्यात लावलेल्या तुळस किंवा इतर फुलझाडांमुळे थोडीशी हिरवाई नजरेला पडे इतकेच. पण तळमजल्यावर बिऱ्हाडकरू असले किंवा नसले तरी समस्त चाळकऱ्यांचा वर्षभर चौकात या ना त्या कारणाने वावर असायचाच. कदाचित त्या काळातील ते कम्युनिटी सेंटर म्हणता येईल. काय होत नसे त्या चौकात! श्रावणात गोकुळाष्टमीला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरच्या आमने-सामने कठडय़ांना दोरखंड बांधून दहीहंडी बांधली जाई (तो जमाना गोिवदावर मोठय़ा रकमेच्या बक्षिसांचा वर्षांव करणाऱ्या प्रायोजकांचा नव्हता.) चाळीतलीच बालगोपाळ मंडळी आणि तरुणाईकडून २-३ थर लावून १-२ प्रयत्नांत हंडी फोडली जाई. चाळकरी मंडळी त्यांचा उत्साह वाढवायला त्यांच्या पाण्यासाठीच्या हाका ऐकून वरून गॅलरीत कायम ठाण मांडून बसलेल्या मोठाल्या िपपातून पाण्याच्या घागरी(बादल्या) रिकाम्या करीत. चौक श्रावणसरींनी आणि गोिवदाच्या घागरींनी चिंब भिजून जाई. आठवडाभरात चौक विशेष पद्धतीने स्वच्छ केला जाई. कारण सात किंवा दहा दिवसांचा सार्वजनिक गणपती उत्सव चौकातच साजरा केला जाई. तेव्हा चौकाचे नेहमीचे रूप पालटून जाई. एका बाजूला स्टेज आणि एका बाजूला श्रीगणेशाचे छोटेसे मखर अणि या सर्वाचे पावसापासून रक्षण करायला ताडपत्रीचा मांडव. दहा दिवस सकाळ-संध्याकाळ आरत्या, मंत्रजागराने चौकाला मंदिराचे रूप येई. तसेच चाळकऱ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा शिवाय मान्यवरांचे नाटक, गायन, चर्चा यांसारख्या कार्यक्रमांच्या निमित्ताने चौकाचे रूपांतर कला मंदिरात होत असे. विसर्जनानंतर मांडव काढलेला चौक काही दिवस उदासवाणा वाटे. पण नवरात्रीची चाहूल लागली की नऊ नाहीतरी एका रात्री (शक्यतो शनिवारी) चौकाची साफसफाई होऊन दिवाबत्तीची खास सोय होत असे. कारण त्या रात्री चाळकरी मुली भोंडला खेळायला तिथे गोळा होत. कर्णकर्कश्श बँजोच्या तालावरचा दांडिया तेव्हा प्रचलित झाला नव्हता. ऐलमा पलमाचा आवाज वीरेपर्यंत चौकात पुन्हा दिव्यांचा सरंजाम होई, कारण असे कोजागिरी पौर्णिमा. बऱ्याचशा चाळींना कौलारू छप्पर असल्याने गच्चीवर चंद्रप्रकाशात कोजागिरी साजरी होण्याऐवजी हक्काचा चौकच या गेट-टू-गेदरला उपयुक्त ठरे. त्यामुळे चंद्रप्रकाशाबरोबर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात स्थानिक कलाकारांच्या कलांची प्रशंसा करीत सर्व चाळकरी भेळ आणि केशरी दूध किंवा जायफळ लावलेल्या कॉफीचा आस्वाद घेत. पाठोपाठ चौकाला वेध लागत मोठय़ा सणाचे, दिवाळीचे. उंच टांगलेल्या एका भल्यामोठय़ा कंदिलाने चौकाचे अस्तित्व ठळकपणे नजरेत भरे. चाळीतील लहानथोर चौकात जमून फटाक्यांच्या माळा, भुईचक्र लावीत तेव्हा चौक झगमगून अणि दणाणून जाई. फाल्गुनात फरसबंदी चौकात विटांचे चौकोनी कुंड बांधून त्यात होळी पेटवली जाई. आपल्या चौकातली होळी सर्वात मोठी व्हावी म्हणून बालगोपाळांची खूप आधीपासून धांदल उडे. तोंडावर पालथा हात ठेवून बो.बो. अशा त्यांनी ठोकलेल्या बोंबांनी चौक दणाणून जाई. धडाधड पेटलेल्या होळीच्या ज्वाळांनी चौकाचा आसमंतधगधगीत प्रकाशाचा होई, याशिवाय अनेकदा सण-उत्सव नसतानाही टीव्हीचे आगमन होण्यापूर्वी मोठा पडदा लावून प्रोजेक्टरवर जेव्हा चाळकरी चित्रपट पाहायला चौकात जमत तेव्हा चौकाचे रूपांतर थिएटरमध्ये होत असे. चौकाचा आणखी एक मोठा उपयोग कधी कुणाकडे धावपळीत कार्य निघाले आणि कार्यालयाची सोय जमणार नसेल तर चौकातच जरा शोभिवंत मांडव टाकून चाळकऱ्यांच्या मदतीने ते कार्य पार पडत असे. चाळीतील मुलांसाठी चौक म्हणजे हक्काचे क्रीडांगण असे. तिथल्या खांबांचा उपयोग खांब-खांब-खांबोळीसारख्या देशी खेळासाठी होई तसेच बॅडिमटनसाठी त्याचे नेट बांधायला होई. शिवाय सायकल शिकताना आणि पडताना चौकासारखी हक्काची जागा दुसरी कुठे सापडणार. स्थानिक कलाकार आणि खेळाडूंप्रमाणेच पोटार्थी कलाकारांनासुद्धा चौकाचा मोफत आश्रय मिळे. शिवाय चाळकऱ्यांसमोर खेळ करून त्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची भ्रांतही मिटे. त्यात बुगू-बुगू म्हणून प्रश्नांची उत्तरे देणारा भोलानाथ असे किंवा नवरात्रीच्या रात्री कवडय़ांच्या माळा घालून हातात पेटते पलिते घेऊन नाच करून पसे मागणारे भुत्त्ये येत किंवा शिमग्यात तोंडे रंगवून सोंगे येत. हमखास गर्दी जमवणारा, छातीची धडधड वाढवणारा खेळ म्हणजे डोंबाऱ्यांचा. ढोलकीच्या तालावर हातात आडवा बांबू धरून दोरावरून तोल सावरणाऱ्या डोंबारणीवर कौतुकाचा, चिल्लरचा आणि जुन्या-पान्या कपडय़ांचाही वर्षांव होत असे.
कालांतराने २ किवा ३ खोल्यांत राहणाऱ्या चाळकऱ्यांचा कल त्याहून मोठय़ा किंवा स्वतंत्र ब्लॉककडे वळू लागला आणि हळूहळू मुंबईतील चाळी नामशेष होत तिथे मोठमोठे टॉवर्स आणि गृहसंकुले आकार घेऊ लागली. चाळींबरोबरच तिथले चौक, पटांगणे हद्दपार झाली. काळाच्या ओघात हे सर्व अपरिहार्यच
आहे. चाळ-संस्कृती लोप पावली तरी कदाचित नवी संकुल संस्कृती जन्म घेईल. परंतु मुंबईच्या चाळीच्या इतिहासात या चौकांची, त्यांनी निभावलेल्या आजच्या भाषेतील कम्युनिटी सेंटरची तसेच सांस्कृतिक केंद्राची भूमिका दखल नक्कीच घ्यावी लागेल.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा