काही दिवसांपूर्वी वसई येथे सोसायटीचा नवीन होणारा सभासद हा मुस्लीम असल्यामुळे त्याला ठराव करून लेखी स्वरूपात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर सदनिका विक्रेत्या कांता पटेल यांच्या मुलाने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे पुढे या तक्रारीचे कसे कसे परिणाम झाले, सभासदांवर आलेली नामुष्की यावर सोबतच्या लेखात ऊहापोह केला आहे.
वसई येथील सोसायटींत नवीन होणाऱ्या मुस्लीम सभासदाला जागा न देण्याचा जो ठराव झाला, तो समाजाला बरेच काही शिकवून गेलाय.
वसईमध्ये हॅप्पी जीवन सोसायटी मध्ये सदनिका खरेदीदार हा मुस्लीम असल्याने त्याला सदनिका विकण्यास सोसायटीचा विरोध झाला. सदनिकेच्या मालक कांता पटेल यांनी सदर सदनिका विकार अहमद खान यांना ४७ लाखांना विकली. खान यांनी हा व्यवहार पक्का झाला म्हणून कांता पटेल यांना १ लाख रुपये टोकन मनी म्हणून दिले. परंतु या सोसायटींतील बहुसंख्य सभासदांनी एकत्र येऊन सदनिका खरेदीदार खान हे मुस्लीम असल्यामुळे सदनिका विकण्यास विरोध करणारा ठराव या निधर्मी राज्यात वेडय़ासारखा मंजूर केला. तसेच या पक्क्या झालेल्या व्यवहारासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी नकार दिला. ही इमारत जुनी होती. सदनिका पहिल्या मजल्यावर होती व खरेदीदार हा झालेल्या व्यवहारासंबंधी समाधानी असताना हा व्यवहार फिसकटत असल्याचे पाहून सदनिका मालकीण कांता पटेल यांच्या मुलाने माणिकपूर पोलीस ठाण्यांत सोसायटी/ पदाधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार केली. यावर पोलीसखात्याने धार्मिक भावना भडकविण्याचे कलम २९५ अ प्रमाणे हॅप्पी जीवन सोसायटीच्या दहा सभासदांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर सत्र न्यायालयाकडून या सर्व पदाधिकाऱ्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
आता या सदनिका विक्रीखरेदीचा घटनाक्रम पाहा.
- खरेदीविक्रीचा व्यवहार पक्का झाल्यावर खरेदीदार खान यांनी १ लाख रु. आगाऊ रक्कम कांता पटेल यांना दिली.
- सोसायटीने पटेल / खान यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यास विरोध केला.
- एवढेच नव्हे तर ४ सप्टेंबर रोजी सोसायटीने खास सभा बोलावून मुस्लिमांना इमारतींत घरे देण्यास विरोध करण्याचा ठराव मंजूर केला. यात तज्ज्ञांचा सल्ला घेतला नसल्याचे वाटते.
- या मंजूर झालेल्या ठरावाचे वैशिष्टय़ म्हणजे हा ठराव मंजूर होण्याअगोदर या सोसायटींत २ मुस्लीम सभासद कुटुंबे रहात होती. तसेच मराठी व पंजाबी सदस्यांनी ठरावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दोन्ही मुस्लीम सभासद गैरहजर होते. याचाच अर्थ उरलेल्या सर्व सभासदांनी ठरावाला पाठिंबा दिला.
- यावर कांता पटेल यांच्या मुलाने पोलीस स्टेशनला तक्रार केल्यावर पोलीसखात्याला याची दखल घ्यावीच लागली. नंतर पोलिसांनी उरलेल्या ११ सदस्यांवर गुन्हा दाखल केला.
यावर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखविताच ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सर्व सभासदांच्या डोळ्यांत अंजन पडले. त्यांना त्यांची चूक उमगली. तसे म्हणाल तर या सोसायटी मधील सभासद खरोखरच शहाणे व समजूतदार म्हणावे लागेतील. याचे कारण त्यांना त्यांची चूक कळल्याबरोबर व जामिनावर सुटल्याबरोबर सर्व सभासदांनी एकत्र येऊन खरेदीदार खान यांची त्यांच्या दुकानात जाऊन लेखी पत्र देऊन माफी मागितली. हेच शहाणपण काही सभासदांना अगोदर सुचले असते तर कदाचित हा प्रस्ताव बारगळून त्याचा ठराव पास झाला नसता. ही लेखी माफी घेऊन सर्व सभासद खान यांच्या दुकानात गेले व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी सोसायटी सभासदांनी चूक उमगण्याचे कबूल तर केलेच, पण असा वेडेपणा आयुष्यात पुन्हा करणार नाही, असेही खान यांना सांगितले. याशिवाय खान यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे सांगून कुठल्याच धर्माबद्दल आम्हाला आकस नाही हेही सांगितले. यावर खान यांनीही मनाचा मोठेपणा दाखवून सर्व काही विसरून गेल्याचे सांगून येणाऱ्या ईदनिमित्त सर्वाना जेवणाचे आमंत्रण दिले. शिवाय कोणाही सभासदाबद्दल आकस नसल्याचे सांगितले. वैशिष्टय़ म्हणजे वसईला इतर धर्मीय व खासकरून हिंदू व ख्रिश्चन लोक कमालीच्या सलोख्याने व गुण्यागोविंदाने रहात आहेत. हा झालेला प्रकार म्हणजे पुढच्यास ठेच व मागचा शहाणा असा आहे. म्हणून हा एक आदर्श धडा सर्व समाजालाच मिळाला आहे. याला विरोध करणाऱ्यांनी असा विचार केला असता की या अगोदर त्यांच्या सोसायटींत २ कुटुंबे मुस्लीम असून त्यांच्या सोसायटीत रहात आहेत, तर असा न्याय खान यांना देणे बरोबर आहे का? समाजात कितीतरी आंतर्धर्मीय विवाह झाले असून ती जोडपी गुण्यागोविंदाने रहात आहेत. या घटनेमध्ये खास म्हणजे या प्रस्तावाला विरोध करणारे कमालीचे शहाणे ठरले.
येथे हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या काही बाबी नमूद कराव्याशा वाटतात की १९२० च्या आसपास माणगांवला आमचे घर जळले. तेव्हा लोणशीच्या एका मुस्लीम व्यक्तीने वडिलांना नवीन घरासाठी लाकडे मोफत दिली. लग्नांत ताशेवाले खासकरून मुस्लीम असायचे. आपली हिंदू सून-मुलगी गरोदर असताना मुस्लीम बायका प्रेमापोटी लहानशी गोधडी शिवून द्यायच्या व वरती म्हणायच्या यो बाळाच्या लगीनमधी लुगडे द्यायचे हां! गणपती मखर करण्यासाठी मुस्लीम मित्र असायचे. अलीकडील काळातील पिढय़ांना असले काहीच बघावयास मिळत नाही हा काळाचा महिमा आहे. टीव्हीवर दिसत असलेली बुरखाधारी मुस्लीम स्त्रीची चहाची जाहिरात काय सांगते हे पण पाहा.
झाली ही घटना चांगलीच झाली. यामधून सोसायटी व सर्वचजण शहाणपण नक्कीच शिकतील. दोन्ही समाजांत धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक अशा सर्व प्रकारांची देवाणघेवाण वाढल्यास आपला समाज खरोखरच निधर्मी होईल.