बाल्कनीसाठी फ्लोिरग निवडताना नेहमी घरातील आतल्या भागापेक्षा वेगळे आणि गुळगुळीत नसणारे घ्यावे. थोडय़ा गडद मातकट रंगाच्या टाइल्स बाल्कनीला शोभून दिसतात. रफ शहाबाद किंवा कोटा, तांदूर लाद्यादेखील स्वस्तात बाल्कनीला छान रूप प्रदान करतात. जर तुम्हाला लाकडाचे फ्लोिरग आवडत असेल तर बाजारात व्ह्रिटीफाइड टाइल्समध्येच वूडन डिझाइनच्या टाइल्सदेखील उपलब्ध आहेत.

काल सहजच मागे प्रसिद्ध झालेले सगळे लेख काढून वाचायला घेतले. आत्तापर्यंत कोणकोणते विषय झालेत आणि कोणते राहिलेत याचा आढावा घेत असताना स्वयंपाक खोलीबद्दलचा लेख हाती लागला. त्यात स्वयंपाक खोलीला मी हृदयाची उपमा दिली आहे, ते वाचून मलाच हसू आले आणि मनात विचार आला, खरंच जर घर हे एक शरीर असेल आणि स्वयंपाक खोली हे त्याचं हृदय तर मग या शरीराचं नाक कोणतं?

विचार आला मनात आणि लगेचच डोळ्यांसमोर आली ती बाल्कनी. तसं पाहायला गेलं तर खिडकी हे देखील उत्तर यायला काहीच हरकत नव्हती, पण बाल्कनी ती बाल्कनीच. खिडकीच्या बाहेर आपल्याला घेऊन जाते आणि बाहेरच्या मोकळ्या वातावरणाचा आणि घरातील सुरक्षिततेचा एकत्रित अनुभव देते त्या बाल्कनीची तुलना घरातील इतर कोणत्याच भागाशी नाही होऊ शकत.

हल्ली घरे लहान झाल्याने म्हणा किंवा अधिक जागेच्या हव्यासापायी म्हणा बरेच वेळा बाल्कनीचे स्वतंत्र अस्तित्व मिटवून तिला बैठकीच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये समाविष्ट केले जाते. परंतु ज्या घरांना बाल्कनीचे स्वातंत्र्य जपण्याची इच्छा असते, अशांसाठी मात्र बाल्कनीला सुंदर बनविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सुरुवात आपण बाल्कनीच्या फ्लोिरगपासून करू. बाल्कनीसाठी फ्लोिरग निवडताना नेहमी घरातील आतल्या भागापेक्षा वेगळे आणि गुळगुळीत नसणारे घ्यावे. थोडय़ा गडद मातकट रंगाच्या टाइल्स बाल्कनीला शोभून दिसतात. रफ शहाबाद किंवा कोटा, तांदूर लाद्यादेखील स्वस्तात बाल्कनीला छान रूप प्रदान करतात. जर तुम्हाला लाकडाचे फ्लोिरग आवडत असेल तर बाजारात व्ह्रिटीफाइड टाइल्समध्येच वूडन डिझाइनच्या टाइल्सदेखील उपलब्ध आहेत. याच्या उपयोगाने आपण बाल्कनीला एखाद्या डेकचा लुक देऊ शकतो. पण आपल्याला जर अगदी वेगळेपणाची आवड असेल तर मोझॅइक डिझाइनचा पर्याय उत्तम परिणाम साधू शकतो. बाजारात अनेक नामांकित कंपन्यांच्या मोझ्ॉइक बॉर्डर्स आणि फ्लोिरग उपलब्ध आहेत. आपण फक्त आपल्याला हवी ती रंगसंगती आणि डिझाइन निवडायचे. आपल्या बाल्कनीच्या मापाप्रमाणे ते बसवून देण्याची जबाबदारीही या कंपन्या घेतात.

जी गोष्ट फ्लोिरगची तीच बाल्कनीच्या भिंतींनाही लागू होते. टाइल्स किंवा एखादा मोझॅइक डिझाइनचा पॅटर्न लावूनही आपण बाल्कनीच्या भिंतींना झटपट आणि टिकाऊ  पद्धतीने सजवू शकतो. टाइल्स लावण्याचा फायदा हाच की एकदा लावल्यानंतर पुढे अनेक वर्षे मेन्टेनन्स करावा लागत नाही, पण सगळ्यांनाच या पर्याय रुचेल असे नाही. अशांसाठी एक्सटेरिअर पेंटमध्येदेखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय बाहेरच्या भिंतींना टेक्श्चर देणारी प्लास्टरसदृश काही उत्पादनेदेखील बाजारात मिळतात. याचा पातळ थर आपल्याला हव्या त्या डिझाइन टेक्श्चरमध्ये भिंतीवर लावला जातो. हे टिकाऊ  तर असतेच. शिवाय वरून आपल्याला हव्या त्या रंगात रंगवताही येते.

आता बाल्कनी म्हणजे घराचा बाहेरचा भाग त्यामुळे कोणाला असे वाटू शकते, इथे कशाला फॉल्स सीलिंग? पण आता आपण या गैरसमजातून बाहेर येऊ या. बाल्कनीतही सुंदर फॉल्स सीलिंग होऊ  शकते. बाल्कनी व्यवस्थित तीनही बाजूंनी बंद असेल तर सर्वसाधारण जिप्सम बोर्डचे फॉल्स सीलिंगदेखील आपण करू  शकतो. याखेरीज लाकूड किंवा बांबू वगैरेसारखी सामग्री वापरून केलेले नावीन्यपूर्ण फॉल्स सीलिंग आपल्या बाल्कनीचे रुपडेच पालटून टाकेल. सध्या बाजारात फायबर सिमेंट बोर्ड हा एक नवीन प्रकारदेखील फार प्रसिद्ध झाला आहे. या बोर्डचे वैशिष्टय़ म्हणजे तो दणकट असून वापरायला मात्र फार सोपा आहे. हा बोर्ड लांबट पट्टय़ांच्या स्वरूपात किंवा ८ फूट ७ ४ फूट असा मोठय़ा आकारात उपलब्ध असतो. यावर निरनिराळी डिझाइन्स टेक्श्चरच्या स्वरूपात कोरलेली असल्याने फिक्स केल्यावर लगेचच रंग लावला की काम पूर्ण. या बोर्डचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो फ्लोिरग, भिंती किंवा सीलिंग कुठेही लावता येतो. त्यामुळे एक्सटेरिअर फॉल्स सीलिंग साठीदेखील फायबर सिमेंट बोर्डचा एक वेगळा पर्याय म्हणून आपण विचार करायला हरकत नाही.

फॉल्स सीलिंगसोबतच ओघाने येते ते लायटिंग. बाल्कनीत लाइट्स लावताना ते घराच्या आतील भागातील लाइट्सपेक्षा कमी प्रखर असतील याची काळजी घ्यावी. शक्यतो एखादा वॉल लाइट किंवा हँगिंग डिझाइनमधले कंदीलसदृश लाइट्स घेतल्यास छान परिणाम पाहायला मिळतो. डेकोरेटिव्ह लाइट्सवर जास्त खर्च करायचा नसल्यास फॉल्स सीलिंगमध्ये स्पॉट लाइट्स बसवूनदेखील आपण काम भागवू शकतो.

आता बाल्कनी सजविण्याचा शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण वळू या. बाल्कनीत लावायची झाडे. झाडे लावणे जितके सोपे तितकीच त्यांची निगा राखणे अवघड. म्हणूनच झाडे निवडताना निगा राखण्यासाठी सोपी जातील तसेच सदाहरित दिसतील अशी झाडे निवडावीत. बाल्कनी मोठी असेल तर एक कोपरा झाडांच्या कुंडय़ांसाठी राखून ठेवायला हरकत नाही. पण बाल्कनी लहान असेल तर मात्र व्हर्टिकल गार्डनसारखा पर्यायसुद्धा आहे. यामध्ये एखादी संपूर्ण भिंतच बगीचा म्हणून सजवता येते. भिंतींवर एकावर एक कुंडय़ांची रचना असल्याने अत्यंत कमी जागेत उत्तम बगीचा तयार होतो, त्यामुळे हल्ली याला बरीच पसंती मिळते. याखेरीज टांगायच्या कुंडय़ादेखील आपल्या बाल्कनीची शोभा वाढवतात. यातदेखील हल्ली मातीला पर्याय म्हणून कोकोपीटचा वापर केला जातो, ज्यामुळे कुंडय़ांचे वजन हलके राहते.

पण बरेच वेळा असंही होतं, की बगीचा तर आवडतो पण झाडांची निगा राखणे त्यांना वेळेवर पाणी घालणे. कामे करणे अवघड असते. मग काय करायचे? पर्याय आहे, कृत्रिम झाडांचा. सुदैवाने हल्ली बाजारात खऱ्या झाडांनाही लाजवतील अशी कृत्रिम झाडे मिळतात. ती फक्त एकदा लावली की झाले काम. या झाडांसोबतच आपण बाल्कनीमध्ये कृत्रिम गवताचा लॉनदेखील लावून घेऊ  शकतो, जेणेकरून आपली बाल्कनी एका परफेक्ट बगीच्यात रूपांतरित होईल. तर, चला करू या आपली बाल्कनी सुंदर आणि घराचे नाक होईल अधिकच उंच.

(इंटिरियर डिझायनर)

गौरी प्रधान ginteriors01@gmail.com