आपले स्वयंपाकघर दिवसेंदिवस अधिकाधिक आधुनिक होत आहे. अत्याधुनिक उपकरणांमुळे आपले जीवन सुलभ आणि स्वयंपाकाचा अनुभव रंजक बनत आहे. भारतातील प्रत्येक आधुनिक स्वयंपाकघरात आढळणारे एक सर्वात आवश्यक उपकरण म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. परंतु बहुतांश लोक मायक्रोवेव्ह ओव्हनचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा, हे समजून न घेताच सर्वोत्तम मायक्रोवेव्ह ओव्हनची खरेदी करतात. त्यामुळे, तुमच्या मायक्रोवेव्हचा सर्वाधिक उपयोग होण्यासाठी काही टिप्स-
* सर्वप्रथम, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ बनवणे कशा प्रकारे वेगळे ठरते आणि निरनिराळ्या प्रकारचे कोणते मायक्रोवेव्ह ओव्हन उपलब्ध आहेत हे जाणून घ्यायला हवे :
* तीन प्रकारचे मायक्रोवेव्ह ओव्हन असतात- सोलो, ग्रिल आणि कन्व्हेक्शन. सोलो मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मॅग्नेट्रॉन असतात. त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी सोडल्या जातात आणि यामुळे उष्णतेमार्फत अन्न शिजवणे शक्य होते. ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अतिरिक्त हीटिंग कॉइल असते. तिचा वापर रोस्टिंग व ग्रिलिंग यासाठी केला जातो. तिसरा आणि सर्वाधिक वापरला जाणारा मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे कन्व्हेक्शन. त्यामध्ये अतिरिक्त हीटर व पंखा असतो. यामुळे सर्व बाजूंनी हीटिंग केले जाते आणि बेकिंगसाठी गरजेचा असलेल्या ब्राउनिंग इफेक्ट दिला जातो.
* त्यामुळे मूलभूत सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन आणि ग्रिल+कन्व्हेक्शन यातला प्रमुख फरक म्हणजे, शिजवण्याबरोबरच, ग्रिल, रोस्ट व बेक करण्याची क्षमता.
* मायक्रोवेव्हचा वापर केल्याने ऊर्जेमध्ये बचतही होतो. त्यामुळे विजेचा वापर कमी केला जातो. भांडय़ाच्या तुलनेत त्यातील अन्न मायक्रोवेव्हमधील ऊर्जा जलद शोषून घेत असल्याने, स्टोव्हवर अन्न शिजवण्याच्या तुलनेत, मायक्रोवेव्हमध्ये शिजवणे जलद होते.
* खर्चाच्या बाबतीतही, सिलिंडरसाठी दरमहा ४००-६०० रुपये खर्च करावा लागतो, तर मायक्रोवेव्ह दरमहा जास्तीत जास्त ३६ युनिटचा वापर करतो. त्यासाठी दरमहा अंदाजे १८० रुपये खर्च येतो.
मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करीत असताना विजेमध्ये बचत करण्यासाठी काही टिप्स :
* बॅचेसमध्ये शिजवणे : ओव्हनमधील सर्व जागा आणि उष्णता यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी एकाच वेळी शक्य तितके अन्न शिजवावे. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून एकाच वेळी जास्तीत जास्त पदार्थ शिजवता येतील.
* उष्णता वाया जाऊ नये म्हणून, अन्न शिजवत असताना वारंवार ओव्हनचे दर उघडणे टाळावे.
ओव्हनचे दार स्वच्छ ठेवावे, जेणेकरून अन्न कसे शिजत आहे, हे पाहण्यासाठी ओव्हनचे दार उघडावे न लागता दारातूनच पाहता येईल.
* तुमचा ओव्हनची कार्यपद्धती समजून घ्या :
प्री-हीटसाठी किती वेळ लागतो ते समजून घ्या, म्हणजे योग्य तापमान निर्माण झाले की तुम्ही अन्न शिजवण्यासाठी सज्ज व्हाल.
* काचेच्या / सिरॅमिकच्या डिशचा उपयोग करा : ओव्हनमध्ये वापर करण्यासाठी या डिश अतिशय सकार्यक्षम असतात आणि अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेले तापमानही कमी केले जाते.
* पदार्थाचे लहान तुकडे करा : यामुळे अन्न लवकर शिजले जाईल.
* अन्न शिजवण्यासाठी कन्व्हेक्शन मोडचा वापर करावा. यामुळे स्टॅटिक कुकिंग पर्यायाच्या तुलनेत ओव्हन कमी तापमानावरही वापरून चालेल.
* मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवण्यासाठी चार मूलभूत मोडचा वापर करता येतो :
* मायक्रो मोड हीटिंगमार्फत शिजवण्यासाठी वापरला जातो.
* ग्रिलचा उपयोग रोस्टिंग व ग्रिलिंगसाठी केला जातो
* कॉम्बिनेशन मोड कुकिंग+ग्रिलिंगसाठी वापरला जातो
* कन्व्हेक्शन मोडचा वापर बेकिंगसाठी केला जातो
तसेच, प्रत्येक वेळी पदार्थ बनवून झाल्यानंतर, ओव्हनची आतील बाजू ओलसर कापडाने पुसून घेणे गरजेचे असते. स्प्रे आणि अन्य तीव्र क्लीनरचा उपयोग करणे कटाक्षाने टाळावे. स्वच्छ असलेल्या मायक्रोवेव्हमुळे आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण होणे टाळता येते आणि मायक्रोवेव्हचे आयुष्यही वाढते.
* बाउलभर पाण्यामध्ये लिंबाचे दोन तुकडे पिळून पाच मिनिटांवर मायक्रो मोडवर ठेवता येतील. पाच मिनिटांनी बाउल बाहेर काढा आणि ओव्हनचा आतील भाग पुसून घ्या. यामुळे ओव्हन स्वच्छ होतोच, शिवाय त्यातील वासही नाहीसा होतो.
वरील टिप्सचा अवलंब केल्यावर, तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग करून उत्तमोत्तम पाककृती घरच्या घरी बनवता येतील, असा विश्वास वाटतो.
लेखक : राकेश सिआल
(प्रॉडक्ट ग्रुप हेड- मायक्रोवेव्ह ओव्हन श्रेणी, गोदरेज अप्लायन्सेस).