03 August 2020

News Flash

मतभेदांची युती कायम

शिवसेनेने जागावाटपाची दिलेली वेगवेगळी सूत्रे फेटाळून लावत भाजपने आक्रमक भूमिका घेत किमान निम्म्या जागांचा आग्रह कायम ठेवला.

| September 21, 2014 04:40 am

शिवसेनेने जागावाटपाची दिलेली वेगवेगळी सूत्रे फेटाळून लावत भाजपने आक्रमक भूमिका घेत किमान निम्म्या जागांचा आग्रह कायम ठेवला. शिवसेना किमान १५५ जागा लढण्यावर ठाम असून भाजपनेही घटकपक्षांच्या वाटपासह २८८ जागांवर उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या रविवारी नवी दिल्लीत होणाऱ्या बठकीत उमेदवार यादीला मंजुरी दिली जाणार आहे, तर शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीची रविवारी बठक होत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीच्या भवितव्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. युतीचे भवितव्य अजूनही टांगणीला लागले आहे व तोडगा निघणे अवघड दिसत आहे. त्यामुळे युती तोडणार की मत्रिपूर्ण लढतीचा पर्याय अजमावणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
युती अभेद्य असल्याची ग्वाही गेले काही दिवस भाजप-शिवसेना नेत्यांनी दिली असली तरी जागावाटपाच्या मुद्दय़ावरून मतभेद कायमच आहेत. भाजप-शिवसेना नेत्यांचे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी दिवसभरही बठकांचे सत्र सुरू होते. युतीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्याशी खासदार पूनम महाजन यांच्या वरळी येथील निवासस्थानी चर्चा केली. घटकपक्षांना एकही जागा न देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव होता; पण हे त्यांचा विश्वासघात केल्यासारखे होईल आणि त्यांना मंत्रिपद दिल्यावर विधान परिषदेची जागा कोणी द्यायची, याचा वाद नंतर करण्यापेक्षा आणि खात्रीची जागा देण्यापेक्षा विधानसभेच्या जागा सोडणेच श्रेयस्कर असल्याचे भाजपने स्पष्ट केले.
त्यानंतर शिवसेनेने भाजप ११७, शिवसेना १५५ आणि स्वाभिमानी पक्ष ७ आणि अन्य पक्षांना ९ जागा असा प्रस्ताव दिला. जुन्या सूत्रानुसार भाजपकडे ११९ व शिवसेनेकडे १६९ जागा होत्या. घटकपक्षाला प्रत्येकी ९ जागा गेल्यावर भाजपसाठी ११० जागा उरत होत्या. त्यात ७ ने वाढ करण्याचा शिवसेनेचा नवीन प्रस्ताव होता आणि शिवसेनेच्या वाटय़ाच्या जागा १५९ वरून ४ ने कमी करून १५५ करण्याची तयारी दाखविण्यात आली, मात्र भाजपची मागणी १३५ जागांची असून एवढय़ा कमी जागा स्वीकारण्यास भाजपने नकार दिला.
युतीच्या शिल्पकारांपकी एक असलेल्या ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांच्या निवासस्थानी युती टिकविण्यासाठी झालेली ही बठक निष्फळ ठरली. युती तुटल्यास घटकपक्षांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून अधिक जागा देण्याचे आश्वासनही दिले आहे. तिढा सुटत नसल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकत्रे व सर्वसामान्यही आता चिडले असून ज्यांना जागावाटप करता येत नाही, ते सरकार कसे चालविणार, असा सवाल करीत आहेत.

भ्रष्ट आघाडीला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी महायुती अभेद्य रहावी, अशी भाजपची भूमिका आहे. महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अभेद्य असलेली युती किती जागा लढवाव्यात किंवा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाच्या या प्रश्नांवर तुटू नये असे आम्हाला वाटते. गेल्या पाच निवडणुकांमध्ये ५९ जागा शिवसेनेला व १९ जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. या जागांवर आघाडीचे विशेषत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे कधीच न जिंकलेल्या ७८ जागांची आदलाबदल केली पाहिजे. उदाहरणार्थ तासगाव-कवठे महंकाळ ही सेनेकडील जागा भाजपला मिळाली तर, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव करता येऊ शकतो. त्यात बदल केला नाही, तर त्याचा आघाडीलाच फायदा होईल.                                                        
विनोद तावडे, भाजप नेते

चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच!
’सकाळी पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी सुरू
’सेनेकडून जागावाटपाचा कोणताच प्रस्ताव नाही. रविवारी आमची उमेदवारांची पहिली यादी केंद्रीय नेत्यांना पाठविणार आहोत. युतीबाबतचा फैसला दिल्लीतून नव्हे, तर मुंबईतूनच आणि आपणच करणार. असा निवडणूक प्रभारी ओम माथुर यांचा दावा.
’खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी सेना-भाजपच्या नेत्यांची एक अनौपचारिक बैठकही झाली, पण तासभराच्या चर्चेनंतर तोडग्याविनाच ती संपुष्टात आली.
’दुपारी मात्र, सेनेकडून नवा प्रस्ताव आल्याची विनोद तावडे यांची घोषणा, भाजपने १२६ तर सेनेने १५५ जागा लढवाव्यात, भाजपने त्यातूनच राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई, शिवसंग्राम या तीन मित्रपक्षांना वाटप करावे, सात जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्याव्यात असा प्रस्ताव
आता घटक पक्षांच्या जागावाटपाचा घोळ !
रिपब्लिकन पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या महायुतीतील लहान पक्षांना एकही जागा न देता शिवसेनेने भाजपला १२५ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला आहे, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. त्यांनतर भाजपला ११७ व लहान पक्षांना १६ जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या नव्या प्रस्तावावरही भाजपमध्ये सहमती झाली नाही. मात्र, घटक पक्षांना एकही जागा देऊ नये, असा प्रस्ताव आम्ही पाठविलेलाच नव्हता, घटक पक्षांना शिवसेनेपासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप करीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपलाच धारेवर धरले.जागावाटपाच्या  वादावर तोडगा काढण्यासाठी  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक प्रस्ताव दिला. भाजपने १२५ जागा घ्याव्यात व लहान घटक पक्षांना एकही जागा देण्याची गरज नाही, त्यांना थेट मंत्रीपदे देता येतील असा हा प्रस्ताव होता. या संदर्भात आपण रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे यांच्याशी चर्चा केली. आमच्या जागांमुळे युती तुटू नये, अशी त्यांची भूमिका होती. परंतु त्यांना एकही जागा न देणे योग्य नाही आणि घटक पक्षांना ९ जागा द्यायच्या झाल्या तर भाजपच्या वाटय़ाला ११६ जागा राहतात. त्यामुळे शिवसेनेचा हा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे तावडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना-१५५, भाजप-११७, स्वाभिमानी शेतकरी संघटना-७ आणि रिपाइं, रासप व शिवसंग्राम यांना ९ जागा द्याव्यात, असा सुधारीत प्रस्ताव सेनेने दिला होता. मात्र त्यावरही एकमत होऊ शकले नाही.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2014 4:40 am

Web Title: differences over seat sharing between shiv sena and bjp
टॅग Seat Sharing
Next Stories
1 जिल्हा परिषदांत आज मित्रधर्म पाळणार?
2 प्रवेशापूर्वीच ठाकूर यांचा भाजपला इशारा
3 आक्रमक काँग्रेस राष्ट्रवादीला शेवटपर्यंत झुंजवणार?
Just Now!
X