शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणार नसले तरी त्यांनाही मालमत्ता जाहीर करण्याबाबत निवडणूक आयागोला आदेश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे बंधूंनी केवळ मालमत्ताच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत हेही उघड करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मतदारांना राजकीय नेत्यांबाबत माहिती असावी आणि त्यांना जागरूकपणे मतदान करता यावे या उद्देशानेच ही मागणी करण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
‘सहकार संदेश’ या ठाणे येथील वृत्तपत्राचे संपादक श्रीप्रकाश नील यांनी ही याचिका केली असून ठाकरे बंधूंसह सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मालमत्ता, त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हे आहेत याची माहिती उघड करण्याविषयी निवडणूक आयोगाला आदेश देण्याची मागणी केली आहे. एखाद्या पक्षाचा नेता निवडणूक लढविणार नसला तरी त्याचे उमेदवार ही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळेच त्यांचीही मालमत्ता उघड झाली पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे.
मतदानासाठी बुधवारी सुट्टी
मुंबई : सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालयांबरोबरच खासगी क्षेत्रातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाटय़गृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉिपग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान दोन तासांची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल अशी सवलत कामाच्या वेळेत देण्याचे आदेश कामगार विभागातर्फे काढण्यात आले आहेत.