विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेसच्या वतीने आघाडी तुटल्यावर प्रथमच संपर्क साधण्यात आला, पण राष्ट्रवादीने काँग्रेसला मदतीचा हात देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री वर्षां गायकवाड यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा म्हणून वर्षां गायकवाड यांनी सायंकाळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी विधान भवनात चर्चा केली. आमदारांशी चर्चा करून मग निर्णय कळवू, असे पवार यांनी गायकवाड यांना सांगितले. मात्र, राष्ट्रवादीने काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळून लावला. काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य असताना उभय एकत्र आले तरी सदस्यसंख्या ८३ होते. याचाच अर्थ उभयता एकत्र आले तरी पक्षाच्या उमेदवाराला विजयाची संधी नाही. असे असतानाही वर्षां गायकवाड या पाठिंब्यासाठी शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची बाब पक्षाच्या काही आमदारांना रुचली नाही. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन गट पडले होते. पुरेसे संख्याबळ नसल्याने निवडणूक लढविण्यात काहीच अर्थ नाही, असे काही आमदारांचे म्हणणे होते. उगाचच सदस्यसंख्येपेक्षा कमी मते पडल्यास टीका सुरू होईल, अशी भीती पक्षाच्या नेत्यांना आहे. मात्र, मतदान झालेच तर आपलाही उमेदवार िरगणात असावा, अशी काही जणांची मागणी होती. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची उद्या सकाळी १० वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे विधिमंडळ पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.