loksatta-verdha01
पूर्वी मुंबईतील प्रत्येक थिएटरला स्वत:ची एक ओळख होती. स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग होता. ‘अलबेला’ बघताना धमाल हिट गाण्यांच्या वेळी पिटातील शेजारच्या माणसाने छोटय़ा पिशवीतून सोडा वॉटरच्या बाटल्यांचे बिल्ले उधळले होते. थोडय़ाच वेळात एका मागोमाग एक प्रेक्षक खरे पैसे फेकू लागला. सिनेमा संपला तेव्हा पिशवी घेऊन आलेला इसम पैसे गोळा करीत होता. पिक्चर त्याच्यासाठी ‘पैसा वसूल’ होता.

मागच्या आठवडय़ामध्ये छोकरीला ‘लायनकिंग’ दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये घेऊन गेलो होतो. एकाच मजल्यावर चार, पाच स्क्रीन असणाऱ्या, दिव्यांचा आणि येऊ घातलेल्या सिनेमांच्या जाहिरातीचा झगमगाट असणाऱ्या, ६० रुपयांचा एक समोसा आणि १०० रुपयांची पॉपकॉर्नची बादली मिळणाऱ्या थिएटर कॅन्टीनमध्ये मॅक्सिकन ‘नाचो’ही मिळत होते. आम्ही पूर्वी कॉलेजच्या जमान्यात थिएटरमध्ये पब्लिक हिरॉईनला ‘नाचो’ म्हणताना ऐकले होते. अंधेरीसारख्या भागामध्ये पूर्वी नवरंग, पिंकी, चंदन, संगम अशी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी सिनेमा थिएटर्स होती. पण या दहा-वीस वर्षांमध्ये मल्टिप्लेक्स नावाचा जो घाऊक बाजार उदयाला आला त्यामुळे त्याच एरियामध्ये आज २७ स्क्रीन्स आहेत. सत्तावीस गुणिले किमान चार एवढे शोज् रोज दळण दळत असतात. या अनेकमुखी राक्षसाला रोज खाद्य पुरविण्यासाठी वर्षांकाठी शेकडो सिनेमे तयार व्हावे लागतात. मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत जेथे वर्षांकाठी दहा-विस चित्रपट निर्माण होत होते तिथे आज १२० चित्रपट निर्माण होऊ लागले आहेत. अर्थात त्यामुळे मोजकेच चित्रपट शुक्रवार, शनिवार, रविवारच्या नंतर सोमवारी धापा टाकत ‘रनिंग’मध्ये असतात.
या साऱ्या झगझगटामध्ये ‘थिएटर’ नावाची संस्कृती लयाला गेली आहे. पूर्वी प्रत्येक थिएटरला स्वत:ची एक ओळख होती. स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग होता. त्याला धंद्याच्या भाषेमध्ये ‘वळण’ म्हणत असत.
aniv11अशा अनेक थिएटरमध्ये पाहिलेल्या, एन्जॉय केलेल्या आठवणी त्या अंधारलेल्या थिएटरमध्ये जाग्या होत होत्या पडद्यावर. ‘लायनकिंग’ची अक्षरे झळकली आणि बच्चे कंपनीने जल्लोश केला. बऱ्याच वर्षांनी मी सिनेमाने असे स्वागत बघत होतो. आणि अचानक मी २०-२५ वर्षे मागे गेलो.
‘स्टर्लिग मॅटिनी मेक इट ए हॅबिट’ अशी एक स्लाइड स्टर्लिग सिनेमाच्या पडद्यावर न चुकता झळकत असे आणि आम्ही लेक्चरला दांडय़ा मारून न चुकता थिएटरमध्ये पोहोचत असू. मेट्रो, न्यू एम्पायर, लिबर्टी, एक्सलसियर, स्टर्लिग, कॅपिटल, गोदीच्या रस्त्यावरील रेक्स या चित्रपटगृहांनी वेढलेल्या आमच्या जे. जे. स्कूलच्या परिसरातील चुकलेला फकीर हमखास कुठल्या तरी थिएटरमध्ये मिळत असे. मला तर एकदा आमच्या प्रोफेसरांनी कॉलेजच्या लिफ्टमध्ये भेटल्यावर आश्चर्याने पाहात विचारले होते ‘तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय! आपण भेटलो होतो का याच्या आधी कधी?’
मला मात्र खात्री होती की सरांनी मला वर्गात निश्चितच पाहिलं नसणार. कारण त्यांच्या तासाला आम्ही कुठल्या तरी थिएटरमध्ये बर्गमन, डेव्हिड लिन, कपोला, स्पिलबर्ग आदी मान्यवर आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांकडून धडे घेत असू.
मॅटिनीला लागणारे चित्रपट म्हणजे सेकंड रन असणारे, नेहमीच या ना त्या कारणाने गाजलेले प्रेक्षकवर्गही दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा चित्रपटाला आलेला आणि रसिक. तिकीट दर कॉलेजमधील तरुणांच्या खिशाला झेपणारा आणि इंग्रजी चित्रपट तर दोन तासांच्या आत संपणारा.
मुंबईच्या धावपळीमध्ये दोन तास पॉपकॉर्नसारखे जिरणारे, बऱ्याच तरुणांचे उत्तम चित्रपट पाहण्याचे वेड किंवा लाड मॅटिनीने आवर्जून पुरवलेले आहेत.
डॉ. झिवागो, सॅन्डर थेड, फिलियन रेनबो, फ्रेंच कनेक्शन, कॅट ओ नाइन टेल्स, कॉन्व्हर्सेशन, टेन कमान्डमेन्ट्स, गुड बॅड अ‍ॅण्ड अग्ली, फॉर ए फ्यू डॉलर्स मोर असे अनेक चित्रपट मॅटिनीने सकाळी सकाळी आमच्यासमोर उलगडले. व्ही. टी. स्टेशनच्या गर्दीतून अचानक आम्ही सारे मॅक्सिकोच्या रानात पोहोचत असू अथवा ‘सन डान्स किड’बरोबर कडय़ावरून पाण्यात उडय़ा मारत असू. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘गंगा जमुना’, ‘अलबेला’, ‘बरसात’ या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये चिंब भिजत असू. एकदा पडद्यावर पावसातील राज कपूर-नर्गिसचं गाणं सुरू झाल्यावर आमच्या एका मित्राने थिएटरमध्ये छत्री उघडून चित्रपट पाहण्यास सुरुवात करताच मागच्या रांगेतील तमाम पब्लिकने शिव्यांचा वर्षांव केला होता. अलबेलाच्या प्रत्येक गाण्याच्या वेळी कॉलेजकुमार पडद्यावरील गीता बालीबरोबर नाचण्यासाठी स्टेजवर धावत जात असे. ‘अमर अकबर अँथनी’मध्ये नोटांची माळ काढत स्टेजवर चढणारा अमिताभ प्रत्येक तरुणाला आपला वाटला होता. मॅटिनी शो, न्यू एम्पायरचा सामोसा आणि चहा किंवा विठ्ठलाची भेळ असा मेळ त्यानंतर अनेक वर्षांत जमलेला नाही.
सिंगल स्क्रीनच्या जमान्यामधील नामांकित म्हणावे असे एक थिएटर मुंबईमध्ये अजून आहे.
नागपाडय़ानंतर डाव्या बाजूला कामाठीपुऱ्याकडे ६५ नंबरची बस वळताना कोपऱ्यावर जुन्या बंगलीप्रमाणे भडक निळ्या हिरव्या रंगाचं अलेक्झांड्रा थिएटर लागतं. बस वळता वळता डोळ्यात सिनेमाच्या पोस्टरखाली सिनेमाच्या नावाचे हिंदी अनुवाद नजरेत भरतात.
‘बरसात में ताक धिना धिन’ (रायडर ऑन द रेन), ‘कुछ नरम नरम कुछ गरम गरम’ (ब्लो हॉट ब्लो कोल्ड), ‘सस्ता खून महेंगा पानी’ (नेव्हाडा स्मिथ), ‘हसींनो की टोलीया बरसाये गोलीयां’ (कॅलिफोर्निया गर्लस्) अशी अनेक नावं असतात. ही नामांतरे करणाऱ्या माणसाला जवळून पाहायचं असेल तर महत्प्रयासांनी मिळालेली बस वाऱ्यावर सोडून उतरायचं आणि समोरच्या राज ऑइल मिलच्या पाहायचं असेल तर महत्प्रयासांनी मिळालेली बस वाऱ्यावर सोडून उतरायचं आणि समोरच्या राज ऑइल मिलच्या शेजारी मिळणारा लोकल कोकाकोला म्हणजे ‘फालसा’ नावाचा ‘काला खट्टा’ प्यायचा आणि शांत होऊन सोडय़ाच्या ढेकरा देत थिएटरच्या लायनीत उभं राहायचं. बुकिंग ऑफिसच्या आजूबाजूची भिंत थुंकून लाल झालेली, बॉक्स ऑफिसची फळी पैसे आणि तिकिटं घेऊन देऊन गुळगुळीत काळी पातळ झालेली, बाजूच्या जाळीच्या दरवाजातून आत गेलं की समोरच्या खांबावर एका वहीच्या पानावर चित्रपटाची रूपरेषा खास बम्बैया हिंदीमध्ये लिहिलेली वाचायची. या गोष्टीतलं वर्षांनुवर्षांचं हमखास भरतवाक्य म्हणजे ‘आगे, परदेपर देखिए.’
जगात या एकमेव थिएटरमध्ये सिनेमाची रूपरेषा लिहून नोटीस बोर्डावर नोटीस लावल्याप्रमाणे लावत असावेत. गावी इंग्लिश चित्रपटाची गोष्ट मोठय़ा बोर्डावर पेंटरकरवी लिहून घेत असत. त्यातलाच प्रकार. बऱ्यापैकी हस्ताक्षर असणाऱ्या पण चांगल्यापैकी ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्यांला मास्तर हमखास ‘काही नाही तर सिनेमाची पोस्टर रंगवून पोट भरणार हा’ म्हणून ऐकवत असत. हा महान ‘ढ’ इथे या थिएटरमध्ये भेटेल की काय असं वाटणारं एकूण वातावरण. आलेला प्रेक्षक बऱ्याच वेळा दुकटा, एखादा पान खाऊन तोंड रंगवलेल्या ‘नववधू’बरोबर खिदळत असणारा. इंग्रजीचा गंध नसणारा. पण प्रत्येक नटाला चेहऱ्याने ओळखणारा. अशी तोंडओळख ठेवणारी माणसंच या नटमंडळींना ‘फेस व्हॅल्यू’ देतात.
कसलाच बुरखा नसणे ही या थिएटरची खासियत. इथे येणारी जोडपी कशासाठी आली आहेत हे डोअर कीपरपासून कॅन्टीनवाल्यापर्यंत सर्वाना ठाऊक असते. त्यामुळे चोरीचा मामला नाही. ‘खाली फोकट बॅटरी मारा तो मार खायेगा पोपट’ म्हणून एखादा हीरो डोअर कीपरला दम देऊनच स्थानापन्न होतो.
नेहमीची नसणारी आणि केवळ चित्रपट बघण्यासाठी आलेली माणसं कपडय़ा, बोलण्यावरून लक्षात आली की हाच डोअर कीपर आपणहून तुम्हाला तिकिटं चेंज करून पंख्याखालची पुढे मागे खुच्र्या मोकळ्या असलेली जागा शोधून देईल.
‘क्या करेगा साब, बदनाम बस्ती है ना, शरीफ लोगों का खयाल करना पडता है,’ म्हणून पुन्हा सिनेमाला येण्याचा आग्रह याच थिएटरमध्ये होऊ शकतो.
नळबाजार, चोरबाजार, भेंडीबाजार या बाजारांच्या बगलेला मुंबईत आणखी एक रंगीतसंगीत बाजार आहे जो संध्याकाळी पाणी मारून ताज्या केलेल्या गजऱ्यांच्या वासाबरोबर दरवळू लागतो. या बाजारात जाणाऱ्या रसिकांची पावलं गोल देवळाच्या उजव्या अंगाला वळण्याऐवजी डाव्या अंगाला वळली की ‘पिला हाऊस’मध्ये पोहचत असत. याच पिला हाऊसच्या मागच्या गल्लीमध्ये पंढरपूरहून आलेला अनवाणी मकबूल फिदा हुसेन हा जगप्रसिद्ध कलाकार एकेकाळी सिनेमांची पोस्टर्स रंगवत असे.
खास नीळ घालून निळा केलेली, चुना फासलेली, अधेमधे जुन्या नक्षीकांमाची पुसत जाणारी पट्टी गडद रंगाने रंगवलेली आणि कपाळावर नवरीने बाशिंग बांधावं तसं सिनेमाचं पोस्टर लावलेली इमारत दिसली तर ‘ये पिला हाऊस है क्या’ म्हणून विचारायला हरकत नाही. आजूबाजूच्या ‘वेश्यानगरी’मध्ये ही एकमेव वास्तू मंगल कार्यालयासारखी वाटे. कारण याच पिला हाऊसमध्ये दारा सिंग आणि काकडीसारखी कोवळी मुमताज यांचे ‘सी ग्रेड’ चित्रपट लागत असत. कार्यकर्ते मीटिंगफिटिंग आणि चर्चासत्र होऊन संत्रस्त झाल्यावर पिला हाऊसमध्ये खास मुमताजला बघण्यासाठी येत. तेव्हा मुमताज ए ग्रेड नटी म्हणून नावारूपाला यायची होती. खरं म्हणजे नावारूपाला यायच्या आधी ती अधिक चांगली होती आणि रूप दाखवण्यासाठी नावालाच कपडे घालत होती. दारा सिंग टारझन किंवा फौलाद आणि मुमताज जेन म्हटल्यावर ‘क्या बात है?’ म्हणत पब्लिक थिएटरवर तुटून पडत असे.
थिएटरमध्ये शिरताशिरता शर्ट काढून उघडय़ा अंगाने बसणारे लोक खास कामाठीपुऱ्यातील शिव्यांनी उकाडय़ाचा आणि मॅनेजरचा उद्धार करीत लाकडी खुच्र्यावर बसत असत. बसल्यावर खिशातील आगपेटीतील काडय़ा पेटवून लाकडी खुच्र्याच्या फटीमधील ढेकूण जाळून मारत असत. हिरोने व्हिलनच्या एका एका गुंडाला टिपून मारावा तसा तो ‘सीन’ असायाचा. त्याच वेळी त्यांच्या पाठीवर ‘धुम्रपान निषेध’, ‘आग रोको’ वगैरे स्लाइड्स नित्यक्रमाने झळकून जात असत. समोरच्या दिल्ली दरबारची स्लाइड बराच वेळ पडद्यावर राहिली की प्रेक्षकांतून ‘बिर्याणी खाया क्या रे फोकट में!’ म्हणून विचारणा होत असे.
चित्रपट ही जर काळ आणि अवकाश यांच्याशी खेळ करणारी कला असेल तर या दोघांच्या आणि प्रेक्षकांच्या संबंधांचे सजग आणि अत्यंत हजरजबाबी जाण असणारा प्रेक्षक अशाच ‘पिला हाऊस’सारख्या थिएटरमधून दिसून येतो. त्याच्या या जाणिवांचा आविष्कार अत्यंत रांगडय़ा पद्धतीने होत असतो. एकदा एका रटाळ ‘इंडियन न्यूज रीळ’ला वैतागून एक जण ओरडला होता ‘ए, ढकल!’ आणि त्याच्या सुरात सूर मिळवून अनेक जण ‘ए ढकल’ म्हणून ओरडू लागले. जेव्हा प्रोजेक्शनिस्टने इंडियन न्यूज बंद करून पडद्यावर चित्रपटाचे सेन्सॉर सर्टिफिकेट झळकविले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. रीळ संख्या ‘सोळा’, ‘सोळा रीळ’ म्हणून वाचण्याची एक सवय होती अनेकांना! पुढे एडिटिंग शिकताना ‘पेस’ सांभाळणे म्हणजे ‘ढकल’ हा माझा परवली शब्द झाला होता. लोखंडी जाळीचे दरवाजे. त्याला दोन्ही बाजूने खेचता येणारे आणि खेचल्यावर अंगावर काटा उभा करणारा आवाज करणारे, निळेकाळे पडदे. बाबा आदमच्या काळातले. मागच्यापुढच्या रांगेत बसलेल्यांचे पानाचे, तंबाखूचे, जर्दाचे आणि नळबाजारातील उग्र अत्तरांचे वास घेत आम्ही इथे पिक्चर बघत असू. ‘माँ मुझे तुम्हारे हाथ के रोटी की याद आ रही है’ असं म्हणत रूस्तमे हिंद दारा सिंग वर्षांनुवर्षे तुरुंगांचे गज वाकवीत असे. तीच मुमताज नंतर राजेश खन्ना आणि जितेंद्रसोबतही दिसत होती. तोच जगदीप तीच कॉमेडी ‘शोले’मध्ये करीत होता. मग पिला हाऊसची खासियत काय होती?
ती शोधून काढण्यासाठी आजही कोणी मला पिला हाऊसची टिकीट दिली तर मी उडय़ा मारत जाईन ‘पता नही क्या नशा पिलायी है पिला हाऊसने.’
पडद्यावरील अमजद खान आणि ‘मिनव्र्हा’मधील प्रेक्षक यांचा संवाद होत असे
‘कितने आदमी थे’
‘ पहले शो मे एक हजार’
‘उहूं’
‘फिर भी वापस आये?’
‘टिकट नही मिला!’
‘खाली हाथ!’
‘तो क्या उपर उठा के आयेंगे?’
सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अशी जुगलबंदी नेहमीच चालत असे.
पदडय़ावरील प्रसंगामध्ये कॉमेन्ट्स करणे हा अत्यंत मजेचा खेळ होता. काही काही कॉमेन्ट्स योग्य वेळ साधल्यामुळे हमखास हशा निर्माण करीत. शम्मी कपूरच्या सुपरहिट जमान्यामध्ये एका चित्रपटातील दृश्यात हिरॉईन शम्मीला ‘सुंदर’ ‘सुंदर’ सिनेमातील नावाने कडेकपारींमधून हाका मारत फिरत असते. कॅमेरा डोंगरदऱ्या आणि प्रतिध्वनी दाखवत फिरत असतो. अचानक प्रेक्षकांतून ‘बंदर’ म्हणून कुणीतरी हाळी दिली आणि पुढच्या क्षणी झाडाच्या फांदीला लटकलेला शम्मी कपूर पडद्यावर आला आणि प्रेक्षकगृहात हसून हसून पब्लिकने गोंधळ घातला.
कॉमेन्ट करण्यासाठी आवर्जून सिनेमा पुन्हा पुन्हा बघणारे अनेक जण असतात. आमचा काही मित्रांचा ग्रुप होता. त्यापैकी एखाद्याने कॉमेन्ट्सच्या शक्यता असलेला फालतू चित्रपट पाहिला की पुरी गँग ठरवून त्या सिनेमाला जात असे आणि कॉमेन्ट्स करून आपल्या परीने चित्रपट एन्जॉय करीत असे.
एका मागोमाग थिएटर पाडून त्याच जागेवर कलाबुती साडय़ा आणि कचकडय़ांच्या बांगडय़ा विकणाऱ्या दुकानाची आरास लावणाऱ्या माणसांना, ‘जला दो जला दो, ये दुनिया’ असं गुरुदत्तच्या स्टाईलमध्ये म्हणावंसं वाटलं.
बादल बिजली थिएटरची इमारत पाडत असताना मी तिथे उभा राहून पाहात होतो, जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. छप्पर पाडलं होतं. आणि काही भिंतींच्या अवशेषांवर घण घातले जात होते. सगळं भयाण भकास होतं. काजळाची डबी उघडावी आणि अचानक हातातल्या काजळाच्या डबीच्या जागी चुन्याची पांढरी शुभ्र, भगभगीत डबी निर्माण व्हावी असं काहीसं वाटत होतं. कारण याच थिएटरच्या काजळकाळ्या अंधारात अनेक स्वप्नं साकारली होती. हा आता दिसणारा पडद्याचा भाग आयुष्यात खरा सूर्यप्रकाश बघणार नाही असं वाटत होतं, कारण एका दिवसात चार पाच वेळा प्रत्येक खेळात होणारे सूर्योदय, सूर्यास्त बघत या पडद्याचा टाईम सेन्स गेला असावा असंच वाटत असे आणि एका अर्थी शब्दश: खरं होतं हे. काळ बदलत होता. स्वप्नं बघण्यासाठीसुद्धा कोणी या थिएटरमध्ये येत नव्हतं. याच पडद्यावर आपण ‘डॉ. झिवॅगो’ पाहिला होता. सारा माईल्सच्या पोटावर कान ठेवून गर्भातील पोराची हालचाल जोखणारा ओमर शरीफ अजून तस्साच उभा आहेसं वाटतंय. याच पडद्याच्या कोपऱ्यातून ‘आँधी’मधील संजीवकुमार ‘इस मोड से जाते है, कुछ तेज कदम रस्ते’ म्हणत हातात फुलं खेळवत येईल. ‘दीवार’मधील गोदीच्या गोदामात मारामारी करीत अमिताभ आता या खंडहरमध्ये येईल किंवा ‘वक्त’ मधील बलराज सहानी भूकंपानंतर आपल्या पोराबाळांना हुडकत या पडक्या अवशेषांमधून फिरू लागेल याची मनोमनी खात्री पटत होती.
याच थिएटरमध्ये ‘अलबेला’ बघताना धमाल हिट गाण्यांच्या वेळी पिटातील शेजारच्या माणसाने छोटय़ा पिशवीतून सोडा वॉटरच्या बाटल्यांचे बिल्ले उधळले होते. अंधारात चिल्लर उधळल्याचा आवाज होत होता. असं का म्हणून त्याला विचारल्यावर म्हणाला होता, ‘देखते रहो, आगे क्या होता है!’ थोडय़ाच वेळात एका मागोमाग एक प्रेक्षक खरे पैसे फेकू लागला. सिनेमा संपला तेव्हा पिशवी घेऊन आलेला इसम पैसे गोळा करीत होता. पिक्चर त्याच्यासाठी ‘पैसा वसूल’ होता.
मला मात्र या पाडल्या जाणाऱ्या थिएटरच्या अवशेषामध्ये थिएटर मालक पैसे शोधत फिरताना दिसत होता.