ना. धों. महानोर

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कर्तव्यदक्षतेच्या आणि रसिकवृत्तीच्या या आठवणी.. त्यांच्या ज्येष्ठ सुहृदाच्या शब्दांत!

‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे।’ या महाकवी तुकारामांच्या अभंगाप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात हे असं कठोर सज्जनशक्तीच्या व्यक्तीला प्रत्यक्ष करणं कठीणच. हे खरं असलं तरी, अनेक क्षेत्रांत निर्मळपणानं आणि निर्भयपणानं आयुष्यभर व्रतस्थ राहून कार्य करणारे थोडे का होईना, मी पाहिले. त्यांच्या सहवासाचं भाग्य मला लाभलं. अतिशय महत्त्वाच्या, जबाबदारीच्या व संवेदनशील अशा महाराष्ट्राच्या पोलीस खात्याच्या सर्वोच्च पदी पोहोचलेल्या माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना मी दीर्घकाळ पाहिलं.

पोलीस खात्यातील अतिशय कर्तव्यदक्ष माणूस. सामान्य माणसांना आपला आधार वाटावा, भीती न वाटता मोकळेपणानं संवाद व्हावा, असा हा माणूस. शिस्तप्रिय, गुंड-भ्रष्टाचारी-व्यभिचारी यांचे कर्दनकाळ. राजकीय दडपणाला बळी न पडणारे आणि राज्याच्या भल्यासाठी चार हिताच्या गोष्टीही राज्यकर्त्यांना जवळून सांगणारे अरविंद इनामदार. परवा ते आपल्यातून निघून गेले, याचं खूप खूप दु:ख आहे. अतिशय जवळचे, चांगले मित्र निघून जाताना पाहताना मी नको तेवढा उदास होत आहे. महिन्याभरापासून रुग्णालयात आहे, पण हे मित्राचं निघून जाणं अधिक त्रास देणारं. गेल्या वर्षीचा विराट दुष्काळ आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना छिन्नविच्छिन्न करून टाकणारा ओला दुष्काळ एकीकडे अन् राज्यात अपार चेष्टा व पोरखेळ चालविणारी मंडळी दुसरीकडे. छानच चाललंय. असो.

अरविंद इनामदार हे वाचन करणारे ग्रंथप्रेमी; चांगल्या साहित्यिक-कलावंतांशी, समाजकार्य करणाऱ्या मंडळींशी नातं ठेवून असलेले होते. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी काही काळ त्यांच्याकडे होती. त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नामवंत साहित्यिक, कलावंत, विचारवंतांची भाषणं व संवाद घडवून आणताना त्यांना मी पाहिलं. कविराज कुसुमाग्रजांविषयी त्यांना अपार प्रेम व आदरभाव होता. त्यांच्या लहानशा घरी आणि त्यांच्याकडे सतत गर्दी असणाऱ्या अनेक चांगल्या मंडळींच्या सहवासात ते नाशिकला असताना नित्य असत. पोलीस व पोलिसांमधला माणूस सर्वार्थानं समृद्ध असावा, ही त्यांची भावना होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर असताना त्यांनी पोलीस व समाज एकत्र आणून चौकटीबाहेरचं कामही केलं. नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये त्या-त्या ठिकाणचे अनेक क्षेत्रांतील जाणते विचारशील लोक त्यांनी एकत्र आणले. साधा पोलीस, अधिकारी व वरिष्ठ अशा साऱ्यांना एकत्र घेऊन पोलिसांसंबंधी लोकांना भीती किंवा दुरावा का वाटतो, याबद्दल मोकळी चर्चा घडवून आणत. त्यातूनच आकाराला आलेला ‘पोलीस माझा मित्र’ हा समाज व पोलीस यांचं नातं निर्माण करू पाहणारा त्यांचा उपक्रम मी प्रत्यक्ष पाहिला.

राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठीचं ओंगळ तोडाफोडीचं राजकारण- विशेषत: १९८० च्या दशकात मी आमदार असताना जवळून पाहिलं. ५४ पकी ५० आमदार अनेक मार्गानी फोडले, विकत घेतले गेले. त्या काळात गृह मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे साध्या वेशात इनामदार कुठल्याही आमदार निवास व परिसरात फिरत असत, पत्त्यांच्या क्लबमध्ये दुरून निरीक्षण करत. आमदारांचं साग्रसंगीत पेयपान झालं, की सगळं टेप करून मुख्यमंत्री व संबंधितांना अहवाल देत असत. जनतेनं निवडून दिलेल्या या महाभागांचा व्यवहार पाहताना ते उदास होत आणि संतापही अनावर होत असे. मग नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनारी माणसं कमी झाली की मला तिथं घेऊन जात.

बऱ्याचदा माझ्याकडे  नामवंत लेखक भाऊ पाध्ये असायचे. भाऊंचं ऐकताना इनामदार मोठय़ानं हसताना आपण पोलीस अधिकारी आहोत हे विसरून जात. तेही काही किस्से सांगत. मी थेट पळसखेडच्या ‘झूठ बोलणे मजा आहे’, ‘ठकबाजी’ या गोष्टी सांगत असे आणि प्रचंड हास्यकल्लोळात गप्पा होत.

औरंगाबादलाही इनामदार काही काळ एसपी म्हणून होते. संगीतकार व गायक नाथराव नेरळकर आणि त्यासारख्यांकडे ते गाणं ऐकायला जात. नागपूरला होते. माझ्याकडील साहित्यिक, गायक-गायिका मित्रमंडळी त्यांना वेळ असेल तेव्हा ते जोडून घेत. मग नागपूरला रामटेकच्या परिसरात मेघदूत व अनेक गाण्यांचा-कवितांचा िधगाणा. अजिंठा तसेच औरंगाबादला जायकवाडीच्या अथांग जलाशयाजवळ सुंदर आकाश, वनश्री व देशोदेशीचे पक्षी पाहणी असे ते छान दिवस. ‘गांधारी’ ही माझी कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर पाच वर्ष लोटली, त्या कादंबरीचं सर्वत्र उत्तम स्वागत झालं. एका वृत्तपत्रात पहिल्या पानावर दररोज कादंबरीवर ‘अश्लील’ असा शेरा टाकून लिखाण येऊ लागलं. एक-दोन संघटना आणि काही लेखक मंडळी त्यापाठी होती. काही काळानं खेड परिसरातील एक-दोन खेडी आणि तिथली काही माणसं, पुढारी यांनी मला धमकीची पत्रं व प्रत्यक्ष खूप काही त्रास देणं सुरू केलं. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यासाठी आणि तंबी देण्यासाठी ते तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक असलेल्या अरविंद इनामदारांकडे वकिलांसह पोहोचले. इनामदारांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. चार दिवसांनी बोलावून तुम्हाला न्याय देतो म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी मला बोलावून घेतलं. मी व माझा मित्र चंद्रकांत पाटील औरंगाबादच्या त्यांच्या कार्यालयात गेलो. चर्चा झाली. मला चार ओळींचा संरक्षणासाठीचा अर्ज द्यायला सांगितलं. ‘‘आपण इथंच बसा, मी लगेच येतो,’’ म्हणून ते अध्र्या तासात परतले आणि म्हणाले, ‘‘बघा, आता वर्दी काढून माणसाचे कपडे घालून आलोय. मनमोकळे बोलू..’’ आणि दिलखुलास गप्पा रंगल्या.

१९७७ साली माझ्या वडिलांचं निधन झालं. अशिक्षित, आधी शेतमजूर आणि नंतर लहान शेतकरी असे माझे वडील. मी, माझी आई, भावंडं यांचं दु:ख वेचायला लोक येत होते. पण जेमतेम दहा-बारा लोक बसतील असं आमचं घर. माझ्या खूपच वेगळ्या अडचणी होत्या. इनामदारांना त्या सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी बघतो.’’ औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, धुळे अशा नजीकच्या जिल्ह्य़ांतून गाडय़ांची, पुढाऱ्यांची रीघ लागली होती. घरापर्यंत पोहोचणं कठीण. घराभोवती आधीच गावपुढाऱ्यांनी गोंधळ घातला होता. इनामदारांनी पोलिसांना सांगितलं, ‘‘लोक काहीही बोलले तरी बोलायचं नाही आणि कोणालाही पुढे येऊ द्यायचं नाही.’’ गदारोळ तीन तास चालला, पण सारं पार पडलं.

१९८७ साली ४ जुलैला अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलिया यांचं संयुक्त मोठं साहित्य संमेलन न्यू जर्सीला होतं. पु. ल. देशपांडे अध्यक्ष अन् मी प्रमुख पाहुणा. २८ जूनला मला हे कळवून सरळ शरद पवार मुंबईला घेऊन गेले. मुंबईचे तेव्हाचे पोलीस आयुक्त अरविंद इनामदार होते. पवारांनी त्यांना सांगितलं, ‘‘१ जुलला हे अमेरिकेत न्यू जर्सीला पाहिजेत. ८ जुलला परत. मुंबईतूनच व्हिसा-पासपोर्ट, गृह खात्याचा अहवाल, गावचे-जिल्ह्य़ाचे पत्र, मुलाखत हे सारे काय ते करा.’’ अन् १ जुलला मी पवारांसोबत अमेरिकेत पोहोचलो!

इनामदार कवितांचे दर्दी. िहदी, उर्दू, मराठी- भाषा कोणतीही असो, समोर बसून रसिकतेनं दाद देत. त्यांच्या भाषणातही अनेकदा कविता, शेरोशायरी, गझल ओसंडून वाहायच्या. भरडय़ा आवाजातलं त्यांचं भाषण भारदस्त असायचं. त्यासोबत कुठला तरी नवा विचार, राष्ट्रीय एकता याबद्दल बोलायचे.

१९९० च्या दशकाआरंभी जळगावात उघड झालेल्या सेक्स स्कॅण्डलचे महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पडसाद उमटले. अनेक अर्थानी हादरा देणारा तो काळ. प्रत्यक्ष जळगावात दोन मातब्बर मंत्र्यांचे गट एकमेकांविरुद्ध पेटून उठलेले. वृत्तपत्रातील लेख-अग्रलेख, ऑडिओ-व्हिडीओ यांची खरी-खोटी, काही वास्तवातलीही रेलचेल जळगावात आणि महाराष्ट्रात चाललेली होती. सामाजिक संस्था, स्त्रियांच्या विचारशील संघटनांनीही आवाज उठवला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रदीर्घ चर्चा झाली. सगळेच तसे अस्वस्थही होते. तेव्हा या प्रकरणी चौकशी व तपासासाठी नि:पक्षपाती, बेधडक अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने अरविंद इनामदार आणि त्यांच्यासोबत कर्तव्यदक्ष अशा मीरा बोरवणकर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली होती. अनेक क्षेत्रांतल्या लोकांच्या मुलाखती, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद, छायाचित्रे, पुरावे इत्यादी जमवून त्यांनी शासनास अहवाल सादर केला. माझ्या दृष्टीने इनामदारांच्या एकूण कामांपकी हे अत्यंत महत्त्वाचं, जबाबदारीचं आणि गंभीर काम होतं, ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडलं.

प्रत्यक्ष शासकीय कामाच्या वेळीही ते सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीनं वागत. नाठाळांशी मात्र खास त्यांच्या कठोर शब्दांत. कार्यालय किंवा प्रशासकीय कामाव्यतिरिक्त सार्वजनिक कार्यक्रमांत भेटीगाठी-गप्पा मारताना त्यांचा खास शब्द ‘देवा’ असा होता. ‘‘काय देवा, सध्या कसं चाललंय ते सांगा..’’, ‘‘देवा, तुम्ही मात्र भारी निघालात. आम्हालाही कळले नाही..’’ अशा प्रकारे ‘देवा’ हा त्यांचा खास परवलीचा शब्द. पण माझ्याशी खासगीत बोलताना ते म्हणत, ‘‘तुम्हाला नुसतं ‘देवा’ म्हणून चालणार नाही, तर नामदेवा..!’’

आयुष्यभर मी माझ्या लहानशा खेडय़ात, शेतीवाडीत काम करतो आहे. तो माझा छंद आहे. त्यात जे जगलो, पाहिलं, भोगलं तेच कवितेत-साहित्यातून मांडलं. महाराष्ट्र, देश, परदेशातील मराठी रसिकांनी नितांत प्रेम, आशीर्वाद मला दिले. मी कुणाचं काही हिरावून घेतलेलं नाही. पण १९९८ साली- ‘कविता लिहिणं बंद करा. भाषण बंद करा. नाही तर शेतात तुमच्या पत्नीसह आम्ही तुम्हाला खतम करू,’ असं म्हणणारं आणि आणखी दोन विकृत अश्लील पत्रं आली. काही नको त्या हालचालीही दिसत होत्या. इनामदार तेव्हा पोलीस महासंचालकांच्या सर्वोच्च पदावर होते. त्याआधीच त्यांनी गुप्तचर पोलिसांमार्फत मला कल्पना देऊन काही पोलीस शेतावर पाठवले. कुठून तरी बातमी राज्यभर पसरली. मुख्यमंत्र्यांचं पत्र-फोन, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री दिवसभर पळसखेडला माझ्या शेतात. त्यांना जे काही सत्य दिसलं त्याप्रमाणे गावातील सात-आठ तरुणांना अटक केली. नंतर प्रकरण न्यायालयात गेलं. आम्ही मानसिकदृष्टय़ा खचून गेलेलो. माझ्या घराभोवती पोलीस संरक्षण आलं. पण मला हे सारं नको होतं. गावातल्यांना सोडण्यासाठी व खटला मागे घेण्यासाठी मी न्यायालयाला विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. मी आहे त्या ठिकाणी निर्भयपणानं पुन्हा कामाला लागलो. सांगायला हरकत नाही, पण त्या वेळी राज्यकर्त्यांपेक्षा मी अरविंद इनामदारांशी आत्मीय भावनेनं बोललो. त्यांची-माझी चर्चा झाली. हे प्रकरण पुढे गेलं असतं, तर मी व माझ्यानंतरची पिढी, गाव दावा-दुश्मनीमध्ये अडकून विद्रूप झालं असतं. दीर्घ चर्चा-विचारान्ती मला इनामदारांचं व्यवहारी शहाणपण मोलाचं वाटलं.

दोन-तीन वर्षांतून एकदा तरी भेटायचं, काव्यशास्त्रविनोद करायचा, अशी त्यांची-माझी आनंदयात्रा. सुंदर दिवस होते ते. त्यांच्या मुलीचा विवाह अगदी मोजक्या, जवळच्या लोकांमध्ये छान साजरा केला गेला. मुंबईला ‘ताज’मध्ये काही राजकीय मंडळी, आयुष्यभराचे घनिष्ठ स्नेही आणि साहित्यिक, कलावंत असे निवडक लोक निमंत्रित केले होते. तरीही सगळी संख्या दोनशेच्या वर नव्हती. सगळ्यांशी थोडं का होईना, बोलणं, स्वागत करणं अगदी कौटुंबिक पद्धतीनं इनामदारांनी केलं. मला व माझ्या पत्नीला दुसऱ्या दिवशी दुपारी घरी यायचा आग्रह त्यांनी केला. मला संकोच वाटला, तरीही आम्ही त्यांच्या घरी गेलो. इनामदार व फक्त बाईसाहेब यांशिवाय कोणीच नाही. निरामय शांत असे आम्ही चौघे. दोन भक्कम मोठे लाडू त्यांनी आम्हाला दिले आणि हिला एक जरतारी पठणी. मला एक शब्दही बोलू दिला नाही. थेट बाहेर सोडायला आले. माझ्याजवळ पोटापुरती जगवणारी शेती, माझी कविता असं इवलंसं आहे; परंतु अरविंद इनामदारांसारखे निर्मळ, निस्सीम प्रेम करून जिवलग झालेले मित्र-स्नेही ही माझ्यासाठी सर्वोच्च गोष्ट आहे. इनामदारांच्या आठवणींचा झोका तर थांबत नाही. थांबतो.