लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांच्या वाचनातून ‘लोकसत्ता’ने त्यांना आदरांजली वाहिली. लोकमान्यांचे हे अग्रलेख सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिले गेले, तरी ते आजही कालसुसंगत ठरतात..

भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत, गणितज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि शब्दप्रभू संपादक.. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची अशी बहुपैलू ओळख. पण त्यांनी इंग्रजांविरुद्ध खऱ्या अर्थाने एकच शस्त्र उपसले. ते होते लेखणीचे. या लेखणीचा जाज्वल्य आविष्कार म्हणजे ‘केसरी’ हे दिनपत्र. ‘केसरी’मुळेच आयुष्यभर निशस्त्र राहिलेल्या टिळकांना, ते जणू सशस्त्र क्रांतिकारक असल्यासारखे इंग्रज सरकार बिचकून होते. कारण सरकार उलथवून टाकण्याइतपत असंतोष प्रकटू शकेल, अशी ‘केसरी’तील अग्रलेखांची बहुव्यापी ताकद एतद्देशियांनीच नव्हे, तर इंग्रजांनीही ओळखली होती. त्या अग्रलेखांचे कालजयित्व, विद्यमानकालीन संबद्धता इतकी अस्सल, की त्यांतील अनेक उतारे स्वतंत्रपणे वाचल्यास आजही जणू सद्यस्थितीवर सपासप कोरडे ओढल्यासारखे अभिप्रायसम भासतात. जे आज संबद्ध वाटते, ते साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी टिळकांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले. याचाच अर्थ टिळक निव्वळ वर्तमानाचा नव्हे, तर भविष्याचाही सूक्ष्म आणि तीक्ष्ण वेध घेत होते. त्यांचे तत्कालीन सरकारवर आणि काही वेळा एतद्देशियांच्या नाकर्तेपणावर आसूड ओढणारे अग्रलेख दर्शवतात टिळकांचे द्रष्टेपण. पण ते आजही कालसंबद्ध ठरतात यातून दिसते ते आपलेच करंटेपण! शिक्षण व्यवस्था, विद्यापीठे (युनिव्हर्सिटय़ा), उद्योग आदींवरील त्यांचे भाष्य आजही ताजे ठरते. त्याचे एक कारण म्हणजे कालौघातील किरकोळ बदल सोडल्यास टिळकांची मराठी आजही बहुअंतरांस भिडण्याची क्षमता बाळगून आहे. टिळकांची भाषा लालित्यापेक्षा विचारसौष्ठवाला प्राधान्य देते. ‘जज्ज-बालिष्टरासच नव्हे, तर माळावरच्या शेतकऱ्यालाही’ उमजावी, हे टिळकांच्या लेखणीचे उद्दिष्ट होते. सरकारास धोरणव्यंग दाखवून देतानाच जनतेस विचारसिद्ध आणि आचारप्रवृत्त करणे हे ध्येय होते.

हे अग्रलेख वाचणे ही निराळीच अपूर्वाई. ते ऐकणे म्हणजे तर पर्वणीच. एकाच वेळी गंभीर, परंतु रसाळ अशा वाणीतून उद्भवलेले या अग्रलेखांचे वाचन हे कोणत्याही पाठ-पठणापेक्षा लाखमोलाचे. कायिक-वाचिक अभिनयसंपन्न, रंगपट व चित्रपटांविषयी जाणीवसमृद्ध असण्याबरोबरच वैचारिक बैठकही पक्की असलेले सर्वश्री चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, अजित भुरे, सचिन खेडेकर, प्रमोद पवार यांनी केलेले लोकमान्यांच्या अग्रलेखांचे वाचन ही या राष्ट्रनेत्याला त्याच्या स्मृतिशताब्दीदिनी वाहिलेली अनोखी शब्दांजली ठरली!

विद्यापीठ परीक्षांचा घोळ सध्या सुटता सुटत नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याची तयारी आणि इच्छाशक्ती दाखवलेली आहे. पण.. प्रागतिक महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या सरकारांनी कोविडमय वातावरणात विद्यापीठीय परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवलेली आहे. देशातील बहुतेक विद्यापीठांत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे. जागतिक विद्यापीठांशी स्पर्धा ही तर दूरची बाब, पण देशातच रोजगारप्रवण शिक्षण देण्यात ही विद्यापीठे काय भूमिका बजावतात, याचे विश्लेषण करण्याची वेळ आली आहेच. या पार्श्वभूमीवर ११८ वर्षांपूर्वी टिळकांनी ‘सरकारी हमालखाने’ या अग्रलेखात अत्यंत परखड विवेचन केलेले दिसते. ‘नोकऱ्यांपेक्षा ग्रॅज्युएटांची संख्या दुपटी-तिपटीने वाढली तेव्हा अर्थातच आपल्यास मिळालेल्या शिक्षणाचा अपुरेपणा आणि निरुपयोगिता विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागली आणि त्याचबरोबर प्रचलित असलेल्या राज्यकारभाराच्या धोरणांकडेही त्यांचे लक्ष जाऊ लागले.’ आज नोकऱ्यांची, ‘ग्रॅज्युएटां’ची संख्या लाखांनी तरी वाढलेली असेल, पण समस्या तिथेच उभी आहे!

त्या अग्रलेखातील आणखी काही अत्यंत उद्बोधक उतारे.. ‘ज्यास खरे शिक्षण म्हणतात तशा प्रकारचे शिक्षण हल्लीच्या संस्थातून आम्हांस बिलकुल मिळत नाही’..  किंवा ‘युनिव्हर्सिटय़ा म्हणजे कनिष्ठ प्रतीच्या सरकारी नोकऱ्यांकरिता लागणारे उमेदवार तयार करणाच्या टांकसाळी किंवा हमालखाने होत असे शब्दांनी नाही तरी कृतीने तरी सरकार स्पष्ट दर्शवीत आहे’.. हे विचार सद्यस्थितीविषयीची जाण अधिकच घनगंभीर करून जातात.

‘आमच्या बुद्धीस खरोखर उतरती कळा लागली आहे काय?’ या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी विद्यार्थ्यांमधील पिढीनुरूप तुलनेच्या संकल्पनेवर टीका केली आहे. पण ‘हल्लीच्या अभ्यासाचे दडपण इतके काही मोठे आहे, की चांगला विद्यार्थीदेखील त्याखाली दडपून जातो’ हे वर्णन आजच्या परिप्रेक्ष्यातही लागू होतेच. नवीन शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. पण त्यासाठी जवळपास साडेतीन दशके वाट पाहिली गेली. त्याच्या अंमलबजावणीचा मुहूर्त ठरलेला नाही. या धोरणातील अधिक-उणे वेचण्याची प्रक्रिया तर आता कुठे सुरू झालेली आहे. त्यात ‘बिकट अभ्यासक्रम नेमिल्यामुळे अभ्यास नेमिणाराचा इष्ट हेतू तर साधला नाहीच. पण त्याच्या उलट मात्र परिणाम झाला’ असे याच अग्रलेखात टिळकांनी लिहून ठेवल्यागत फसगत होणार नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी असे महत्त्वाकांक्षी धोरण राबवणाऱ्या विद्यमान सरकारची आहे. शिक्षणविषयक या अग्रलेखांमध्ये व्यक्त झालेली मते काही निव्वळ टीकात्मक ठरत नाहीत, ती बऱ्याच अंशी मार्गदर्शकदेखील ठरू शकतात. कारण निव्वळ आरामखुर्चीत बसून हितोपदेश करणे किंवा उणीदुणी काढणाऱ्यांपैकी टिळक नव्हतेच. त्यांनी स्वत: डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूलसारख्या शैक्षणिक संस्था काढल्या, चालवल्या. इंग्रज सरकारविरोधी असंतोष उभा करायचा असेल, तर निव्वळ स्वदेशी व राष्ट्राभिमानाचा जागर पुरेसा नाही, त्यासाठी दर्जेदार शिक्षणही महत्त्वाचे असते हे त्यांना ठाऊक होते. भारतातील ‘नेटिव्हां’ना सुशिक्षित करण्यामागील इंग्रज सरकारचा हेतू कधीच शुद्ध नव्हता हे त्यांनी सप्रमाण, सोदाहरण दाखवून दिले. शिक्षणविषयक कुठले तरी कमिशन ‘बसवले’ की आपली जबाबदारी संपली, अशी त्यावेळच्या सरकारची धारणा असे. पण इंग्लंड किंवा युरोपात मिळत असलेले उच्च दर्जाचे प्रयोगाग्रही व रोजगाराभिमुख शिक्षण इंग्रजांनी कधीही भारतीयांच्या वाटय़ाला येऊ दिले नाही, हे टिळकांनी या अग्रलेखात स्पष्ट केले आहे. शैक्षणिक धोरणे सरकारनेच राबवायची, तर मग अशा सरकारचा हेतू उन्नत आणि उदात्त असावा लागतो. अन्यथा सुमारीकरण आणि ‘ग्रॅज्युएटांच्या टांकसाळी’ ठरलेल्याच! त्यावेळच्या परिस्थितीत आणि आताच्या वास्तवात किती तफावत आढळते?

केवळ शिक्षण नव्हे, तर अर्थ, उद्योग आणि व्यापार या विषयांवरही टिळकांनी विपुल, सखोल आणि मार्गदर्शक लिखाण केले आहे. शालेय वा विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये ‘धंदेशिक्षण’ दिले जावे याविषयी ते आग्रही होते. ‘पुण्यातील पहिली चिमणी’ या अग्रलेखात त्यांनी त्या विद्यानगरीतील पहिल्या कापडगिरणीचे अतिशय उदार अंतकरणाने स्वागत केले आहे. ही गिरणी मुंबईतील गिरण्यांपेक्षाही वैविध्यपूर्ण ठरणार असे कौतुकोद्गार त्यांनी व्यक्त केले होते. उद्यमशीलता आणि लोकसहभाग औद्योगिकरणासाठी महत्त्वाचे असतात हे सांगतानाच, ‘एखाद्याने कोणताही नवा धंदा काढला असता दुसरे शेकडो लोक त्याचे अनुकरण करून तोच धंदा करावयास लागतात. गिरणीच्या धंद्यातही तोच प्रकार नजरेस येतो’ हे त्यांनी १८९३ मध्ये लिहून ठेवले होते! ‘आम्हास लागणारे कापड मँचेस्टर येथे तयार व्हावे व चिनी-जपानी लोकांस लागणारे कापड आम्ही मुंबईस तयार करावे, असला खो-खोचा व्यापार कधीही शाश्वत राहावयाचा नाही’ हा इशारा आयात-निर्यात प्राधान्यक्रमावर भाष्य करतो.

टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे मैत्र, मतभेद, राजकीय विचारसरणी यांवरून आजही मराठी सारस्वतात आणि समाजमाध्यमांच्या जंगलात गट-तट पडलेले आढळून येतात. ‘आगरकर’ या अग्रलेखात त्यांनी सुधारककारांशी नेमक्या कोणत्या मुद्दय़ावर मतभेद झाले, याविषयी फेरविवेचन केलेले आहे. यानिमित्ताने आगरकरांसारख्या निस्पृह व्यक्तीमागे त्यांच्या पश्चातही भक्तगण कसे जमा होतात, हे सांगताना आंधळ्या व्यक्तिपूजेवर प्रहार केले आहेत. तर ‘पुनश्च हरि ओम’ हा अग्रलेख राजद्रोहासारख्या, आजही चिवटपणे टिकून राहिलेल्या मुद्दय़ावर ऊहापोह करतो. कायदेमंडळ व न्यायमंडळ यांच्यात राजद्रोहाच्या व्याख्येविषयी मतैक्याचा तेव्हा अभाव असल्याने  टिळकांना  शिक्षा झाली होती. तो व्याख्यागोंधळ पूर्णत: संपुष्टात आला आहे, असे ठामपणे म्हणता येत नाही.

लोकमान्य टिळकांचे असे अनेक अग्रलेख सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिले गेले. त्यांतील फारच थोडे कालबाह्य़ ठरतात. आज लोकमान्य असते, तर आजही तितकेच असंतुष्ट असते. त्यांना असंतोषाचे जनक ठरवून भारतीयांनी जबाबदारी झटकली, असे म्हणाले असते?

लोकमान्यांची प्रेरणा डोळ्यापुढे ठेवून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची स्थापना झाली . ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्यांना भारतीय नागरिकांना स्वराज्याकडून सुराज्याकडे न्यायचे होते. या सुराज्याकडे नेण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी कार्यरत आहे. लोकमान्यांचे काम पुढे नेणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशी संधी मिळेल त्या ठिकाणी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा सक्रिय सहभाग असेल.

– सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

‘स्वराज’पासून ‘आत्मनिर्भर भारत’पर्यंत गेल्या १०० वर्षांत भारतवर्षांने महान प्रवास केला आहे. स्वदेशी आणि स्वराजचा आत्मसिद्धीचा मंत्र ज्या महान माणसाने आपल्यात जागवला, त्या लोकमान्यांचे शंभरावे पुण्यस्मरण करणारा एकमेवाद्वितीय असा संग्रा विशेषांक ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केला आहे. यातील सर्व लेख  काळानुरूप लोकमान्यांची महती आणि ओळख करून देणारे आहेत यात शंका नाही. लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन!

– गिरीश चितळे, मे. बी. जी. चितळे डेअरी

‘लोकसत्ता एकमेव लोकमान्य’ हा अंक संग्राह्य़ झाला आहे! लोकमान्य टिळकांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या लेखांतून व्यक्त होतात. अशा एकमेव, अद्वितीय लोकमान्यांचे शंभरावे पुण्यस्मरण करताना ‘लोकसत्ता’सह ऑडिओ बुक्स पार्टनर म्हणून सहभागी होऊन लोकमान्य टिळकांना अभिवादन करताना ‘स्टोरीटेल’ला सार्थ अभिमान वाटतो !

– प्रसाद मिरासदार, स्ट्रीमिंग हेड, मराठी, स्टोरीटेल

लोकमान्य टिळक हे आपल्या सर्वाचेच आदर्श राहिलेले आहेत. आज आपण करोना महामारीशी झुंज देत आहोत. परंतु १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची साथ आली होती, त्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. टिळकांनी ‘केसरी’मधून ब्रिटिश अधिकारी रँडसाहेबाविरोधात लिहिलेला अग्रलेख महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य टिळकांनी मराठी पत्रकारितेत फार मोठे योगदान दिले. १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता, त्या वेळी टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. लोकमान्यांनी १८९३ साली गणेशोत्सव आणि १८९५ मध्ये शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सामाजिक सण म्हणून साजरे केले. हे उपक्रम आजही ऊर्जा देतात. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’ प्रकाशित करीत असलेल्या विशेषांकास मनापासून शुभेच्छा!

– उषा काकडे, ग्रॅव्हिटस कॉर्प.

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे १९२० साली निधन झाले. यंदा त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ने काढलेल्या ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकाचे शीर्षक अगदी सार्थ आहे. कारण लोकमान्यांच्या विचारांचा संचार कुठल्या क्षेत्रात नव्हता? राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक संबंध, धर्म, अर्थकारण, शेती, उद्योग, पत्रकारिता, वेदांचे अभ्यासक अशी खूप मोठी यादी होईल. पण त्यांचा लखलखीतपणे दिसणारा पैलू म्हणजे या देशावर असलेले त्यांचे प्रेम, भक्ती आणि परकीयांच्या जोखडातून जनतेला बाहेर काढण्याचा एकमेव ध्यास. हा ध्यासच त्यांना लोकमान्यता देऊन गेला! विशेषत: तरुणांनी देशसेवेत यावे, यासाठी त्यांनी चतु:सूत्री मांडली- स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण  व बहिष्कार. आज १०० वर्षांनंतर ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला जातो, त्याचे मूळ या चतु:सूत्रीत आहे.

– कुणाल टिळक, द टिळक क्रोनिकल

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी लांडगे आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णरावजी भेगडे यांच्या वतीने मी ‘लोकसत्ता एकमेव लोकमान्य’ या अंकाचे मन:पूर्वक स्वागत करतो. हा अंक अत्यंत देखणा आणि संग्राह्य़ झाला आहे. आमच्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष लोकमान्य टिळक यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारा हा अंक आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरता या सार्वकालिक महत्त्वपूर्ण मुद्दय़ांची पायाभरणी १९०६ साली लोकमान्य टिळकांनी या संस्थेच्या माध्यमातून केली, याचा आम्हाला अभिमान आहे. कौशल्यविकसन, तंत्रशिक्षण, संशोधन, रोजगाराभिमुखता यांतील योगदानाद्वारे संस्थेचा लोकमान्यांच्या या पवित्र आठवणींना मानाचा मुजरा!

– डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ