‘त्यांची’ भारतविद्या : प्रदीप आपटे

जॉन ग्रिफिथमधला जागरूक, सक्षम कलाकार आणि भाष्यकार दोन्ही तुल्यबळ होते. त्याने लिहिलेले अहवाल आणि अजिंठा चित्रांवरील द्विखंडी ग्रंथात त्याची साक्ष आढळते. पण आज त्या चित्रांची छायाचित्रेच अधिक उरली आहेत…

मुंबईकर सहसा खूप घाईत असतात. त्यामुळे विशेष कौतुक वाटाव्या अशा वास्तू अगदी नेहमीच्या वावरण्यात असूनही नीट न्याहाळल्या जात नाहीत. त्यात गर्दीचा रेटा स्वस्थचित्ताने निरखून बघण्यात आणखी मोडता घालतो. आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच आधीचे व्हिक्टोरिया टर्मिनस ऊर्फ ‘व्ही टी’. या इमारतीची आखणी आणि त्यावरची बाह््य  सजावट मोठी वैशिष्ट्यपूर्ण आणि कलाकुसरीची आहे. तीच गत मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचीदेखील. या दोन्ही वास्तूंचा एक सजावटकर्ता म्हणजे जॉन ग्रिफिथ. पण अशा थोराड करामती वास्तुकलेखेरीज तो अजरामर झाला आणखी एका विशेष कर्तृत्वासाठी. कॅप्टन रॉबर्ट गिलने जवळपास १८ वर्षे खपून केलेली ‘अजिंठा’ची प्रतिकृती चित्रे आगीत भस्म झाली. त्या यत्नांची आणखी एक पुनरावृत्ती होणार होती. त्याचा मुख्य कर्ता-करविता कर्णधार हा जॉन ग्रिफिथच होता.

आता ज्याला रॉयल आर्ट कॉलेज म्हणून ओळखले जाते त्या ‘गव्हर्नमेंट स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये त्याचे शिक्षण झाले होते. तिथे त्याचा एक समवयस्क सहाध्यायी होता. जॉन किपलिंग. हा शिल्पकलातज्ज्ञ होता. (जॉन किपलिंगने आपल्या मुलाला ग्रिफिथच्या हवाली करून टाकले होते. तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कथाकार कवी ‘जंगलबुक’कार रुडयार्ड किपलिंग) सर जमशेदजी जीजीभाय यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून १८५७ साली एक कला विद्यालय सुरू झाले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट. तिथे हे दोघेही प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अर्थातच जेम्स बर्गेसचा या सगळ्या वर्तुळाशी आणि घडामोडींशी निकट संबंध असायचा. अजिंठा चित्रांची प्रतिकृती करून जतन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरले. १८७२ साली मुंबई सरकारने याची योजना आखली. त्याची धुरा जॉन ग्रिफिथकडे सोपविण्यात आली. हा उद्योग १८७२ ते १८८५ पर्यंत सुरू होता. प्रत्येक वर्षीच्या कोरड्या मोसमानुसार होणाऱ्या प्रगतीचे तपशीलवार अहवाल मुंबई सरकार आणि आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे धाडले गेले आहेत.

ग्रिफिथकडे पाहिजे त्या दर्जाची हुनर असणाऱ्या विध्यार्थ्यांचा चमू होता. १८७२ मध्ये पहिली तुकडी अजिंठ्यात दाखल झाली. त्यामध्ये पेस्तनजी बोमजी, ई. डिसुझा, दिनकर मोरेश्वर, जगन्नाथ अनंत यांचा समावेश होता. ग्रिफिथला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आत्मविश्वास तर होताच, पण फार आत्मीयता होती. ‘‘दिनकर मोरेश्वर आणि जगन्नाथ अनंत यांना दिलेले मासिक वेतन कमी आहे. त्यांच्या तोडीचे कुणी दोन देशी कलाकार प्रांतभरात शोधून मिळणार नाहीत’’ असा त्यांचा कैवार त्याने मुंबई सरकारकडे मांडलेला आढळतो. तिसऱ्या मोसमापर्यंत हे सगळे आपल्या कामात तरबेज होऊन भलतेच रुळले. त्यांना कामे वाटून दिलेली होती. त्याचे वेळापत्रक आखलेले होते. प्रत्येक मोसमाअखेरीस ग्रिफिथ त्याचा परीक्षण करणारा आढावा घेत असे. ठोकळमानाने सांगायचे तर १८७२ ते १८७६ मध्ये मोठ्या आकृती खुद्द ग्रिफिथने स्वत: केल्या किंवा ग्रिफिथच्या देखरेखीखाली केल्या गेल्या; तर छतावरील चौकटी बव्हंशी विद्यार्थ्यांनी बनविल्या. त्यानंतरच्या काळात हळूहळू विधार्थ्यांनी बरीचशी कामे सांभाळली.

गिलची बचावलेली थोडी चित्रे आणि रेखाटने आणि ग्रिफिथने अनुसरलेली पद्धती यांची काही बाबतीत तुलना करता येऊ शकते. दोघांनीही मागविलेली आणि वापरलेली सामग्री बरीचशी मिळतीजुळती आहे. उदा. मोठे किन्तान, तैलरंग, विशिष्ट प्रकारचे कुंचले. प्रतिकृती बनविण्याची रीतदेखील बहुअंशी सारखी आहे. प्रत्येक चित्राचे अगोदर निखळ रेखांकन करून घ्यायचे ते किन्तानावर उतरावयाचे मग तैलरंगानी रंगवायचे. परंतु गिलच्या रंग आणि प्रकाश शैलीमध्ये खूप झळाळी आहे. याउलट ग्रिफिथने बुद्ध्याच झळाळी विहीनपणा राखलेला आहे. त्यासाठी तैलरंग पॅरिस मार्बल माध्यमात मिसळून वापरले आहेत. त्यामुळे ग्रिफिथच्या पद्धतीतील चित्रे मूळ चित्राशी अधिक साधर्म्य राखल्यागत आढळतात. अर्थात, दोघांनी वेगवेगळ्या काळात चित्रकाम केले. त्या दरम्यान मूळ चित्रातच काही ‘विघटित’ बदल झालेले होते.

गिलपेक्षा ग्रिफिथचे वेगळेपण आणखी दोन गोष्टींमध्ये आहे. ग्रिफिथच्या काळात बुद्धधर्म, त्याचा इतिहास, त्या संबंधीच्या प्रचलित कथा, जातककथेतील प्रसंग यांबद्दलची जाणीव बरीच वधारलेली होती. या चित्रांमधले ‘दृश्य वर्णन’ अधिक सार्थपणे समजू लागले होते. गिल उत्तम चित्रकार होता. परंतु जगभरातील अनेक ठिकाणच्या शैली आणि अजिंठ्यातील चित्रांतील शैली यातील भेदाभेद तुळावे आणि त्यावर टिपणे करावी असा त्याचा पिंड नसावा. अशा धाटणीच्या कुठल्याच प्रतिक्रिया, शेरे त्याच्या अहवालात, पत्रव्यवहारात फार आढळत नाहीत. आढळतात त्या तुरळकपणे! ग्रिफिथमधला जागरूक, सक्षम कलाकार आणि भाष्यकार दोन्ही तुल्यबळ होते. त्याने लिहिलेले अहवाल आणि अजिंठा चित्रांवरील द्विखंडी ग्रंथात त्याची साक्ष आढळते. सोळा क्रमांकाच्या लेण्याबद्दल लिहिताना गिल म्हणतो, ‘‘मरणासन्न किंवा रुग्णवत राजकन्या तिची शुश्रूषा करणाऱ्या दासी याचे कमालीचे यथोचित चित्रण या चित्रामध्ये आहे’’. त्याच चित्राबद्दल  ग्रिफिथचे वर्णन म्हणते ‘‘या प्रसंगातले दु:ख, विकार, करुण भावप्रसंगाचा मनोधर्म या चित्रामध्ये जसा व्यक्त केला आहे त्याला वरचढ तोडीचे चित्रण कलेच्या अवघ्या इतिहासात मिळणे दुरापास्त आहे. फ्लोरेन्सच्या चित्रकारांनी तो अधिक काटेकोर रेखला असता, व्हेनिसच्या कलावंतानी त्याचे रंग अधिक बेहतर साकारले असते… पण त्यापैकी कुणीच असे भाव चितारू शकले नसते.’’ ग्रिफिथचा जेम्स बर्गेस, जेम्स फग्र्युसन या संशोधकांशी गाढ परिचय होता. फग्र्युसनने या चित्रांबद्दल नोंदले होते, ‘‘यांची शैली अर्थातच आजच्या युरोपीय शैलीपेक्षा भिन्न आहे. पण जुन्या काळातील युरोपीय शैलीपेक्षा ती फारच उच्च दर्जाची आहे.’’ तर बर्गेसने लिहिले होते, ‘‘या बुद्धधर्मी कलाकारांना वैविध्याची गोडी आहे. कोपऱ्या कोपऱ्यातील आणि छतांवरील चौकटी बघा. एक अलंकारिक आकृती रेखायची आणि तिचीच पुनरावृत्ती करणारी मुद्रा गिरवत दुसरीकडे कोरत रेखत राहणाऱ्या आधुनिक अलंकारकर्त्यांनी या कलाकारांकडून जरा शिकावे.’’

ग्रिफिथमधला चित्रकला ‘उस्ताद’ जागा होऊन त्याने दिलेला अभिप्राय बघा : ‘‘भारतीय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अजिंठ्या लेण्यांमधील चित्रांसारखे दुसरे साधन नाही. या चित्रांमधली कलेत जिवंत रसरसपणा आहे. अवयवांच्या चित्रणात डौल आहे. गती आणि चापल्य आहे. उसळणारे झुंजणारे प्राणी आहेत, निमूटपणे ओझी वाहणारे प्राणीदेखील आहेत. उधळल्यागत उडणारे पक्षी आहेत. जणू ‘सृष्टीच्या ग्रंथातून’ थेट अवतरलेले आहेत.’’ ग्रिफिथ या चित्रकारीमधील दिमाखदार देखणेपणा आणि रेखीव चारुता पाहून फार उचंबळला होता. त्याच्या एका निरीक्षणामधे या कलाकारांबद्दलचे भारावलेपण व्यक्त होते – ‘‘हे लोक भलतेच दांडग्या कौशल्याचे असणार. गुंफांच्या उभ्या लंबरूप भागांवर त्यांनी ओढलेले रेषांचे फटकारे सुरेख आहेत. ते अतिशय लीलया ओढले आहेत. पण आडव्या छतावरदेखील त्याच लीलयेने त्यांनी काढलेले फटकार बघा. जरासुद्धा विचलित न होता तोच नेमकेपणा, तशीच रेखून बेतलेली सहज नाजूकरेखा! उभ्या लंबरूप पृष्ठभागावर असा हाताचा रेषाफटकार काढणे अवघडच, पण आडव्या छतावर तसा रेखाकार काढणे हजारपट अवघड असते. हा मला निखळ चमत्कार वाटतो’’, ‘‘दंड, कोपर, मांड्या यांचे त्रिभुज किंवा द्विभुज स्नायू, उराजवळचे स्नायू, पोटरी, गुडघे याचे रेखाटन शरीरविज्ञानाची जाण दर्शविते’’, ‘‘ग्रीक शैलीसारखी आदर्श रेखीव शरीराची त्यांना आस नाही उलट मानवी शरीराची निरनिराळी वैविध्यपूर्ण ठेवण त्यांना महत्त्वाची वाटते. उदा. बदामाच्या आकाराचे जाणीवपूर्वक लांबोडे मोठे डोळे, रुबाबदार देखणे हात व त्याच्या हालचाली अशा अनेक क्लृप्तींनी भाव उत्तम व्यक्त करताना आढळतात’’… त्याचे हे अभिप्राय अगदी सुरुवातीच्या काळामधले आहेत. त्याने व त्याच्या चमूने केलेली कितीतरी छोटीमोठी रेखाचित्रे, सर्वप्रकारचे रंगीत नक्षीकाम आणि अलंकरण, तेथील चित्रांचा संदर्भ अन्वय संबंधी उपयुक्त कथा आणि अन्य समालोचन यांनी मढलेला द्विखंडी ग्रंथ उपलब्ध आहे.

पण गिलच्या चित्रांवर आलेल्या अग्निसंकटाने ग्रिफिथच्या चित्रांनाही सोडले नाही. त्याच ‘व्ही अँड ए हॉल’ला पुनश्च एकदा आगीने ग्रासले. त्यात ग्रिफिथची बरीच चित्रे आगीने नष्ट झाली. पण हा अग्निकोप आधीच्याएवढा व्यापक नव्हता. बरीच बचावली. जी नष्ट झाली त्याचे छायाचित्रण करून ठेवले होते. ग्रिफिथच्या या ग्रंथाने उपजलेली अजिंठाबद्दलची उत्कंठा अधिक तेजाळली… ती अजूनही तेवत राहिली आहे.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com