News Flash

पुनर्वसन यात्रा

देशाचा राजकीय पटल गेली दोन-चार र्वष शांत शांत होता.

देशाचा राजकीय पटल गेली दोन-चार र्वष शांत शांत होता. पण, आता पटलावर पुन्हा हालचाल दिसू लागलीय. सर्वपक्षीय ‘मध्यस्थ’ अमर सिंह यांनी स्वतचं पुनर्वसन करायचं ठरवलेलं आहे. समाजवादी पक्षाचं नेतृत्व अखिलेश यांच्याकडं गेल्यापासून अमर सिंह यांना राजकारणात वाली राहिलेला नाही. मुलायम सिंह यांची पक्षातील सद्दी संपल्यात जमा आहे. वडिलांना मुलाशी जुळवून घ्यावं लागतंय. तसं नसतं तर गेल्या आठवडय़ात सपाच्या दिल्लीत झालेल्या सभेला मुलायम यांना उपस्थित राहण्याची गरज वाटली नसती. स्वतच्या भावाची साथ सोडून त्यांनी अखिलेशचं बोट धरलेलं आहे. अखिलेशच्या सपामध्ये जुन्या ‘मध्यस्थां’ना जागा नाही आणि मुळं नसलेल्या राजकारण्याला ‘आधारा’शिवाय वाटचाल नाही करता येत. अमर सिंहांची ही विवंचना ओळखून भाजपनं त्यांना ‘आधार’ द्यायचं ठरवलेलं दिसतंय. खुद्द पंतप्रधानांनी अमर सिंहांच्या कर्तृत्वाला आपल्या भाषणात जागा दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘बदलत्या संघाची ओळख’ करून देणाऱ्या तीन दिवसांच्या तीन-तीन तासांच्या व्याख्यानमालेला अमर सिंह यांनी हजेरी लावली. अमर सिंह यांनी आता पुढचा राजकीय प्रवासही सुरू केलेला आहे. ते ‘सपा’चे नेता आणि क्रमांक एकचे राजकीय वैरी आझम खान यांच्याविरोधातील ‘यात्रे’ला निघाले आहेत. यात्रेचं नेतृत्व अमर सिंह करतील आणि यात्रेकरू असतील ‘युवा हिंदू वाहिनी’चे खंदे कार्यकर्ते. या वाहिनीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वर्चस्व आहे. ‘दिल्ली ते लखनौ’ यात्राप्रवासात अमर सिंह सपाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांना भेटी देतील. भाजपसाठी सपाच्या विरोधात मतपेरणी करतील असा कयास आहे. अमर सिंह यांना या ‘पुनर्वसन यात्रे’चं फळ काय मिळतं बघायचं..

पाकिस्तानी ‘मदत’

भारताचा शत्रूदेश पाकिस्तान एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही ‘मदत’ करत असावा! निदान दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांच्या बोलण्यावरून तरी तसाच अर्थ निघतो. ‘राफेल’च्या मुद्दय़ावर आठवडाभर काँग्रेसने सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन, ट्वीट करून भाजपला भंडावून सोडलंय. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक आरोपाला प्रत्त्युतर देण्याशिवाय भाजप पर्यायच उरलेला नाही. त्यात पाकिस्तानची ‘मदत’ पहिल्यांदा भाजपला मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या ‘राफेल’ तोफांचं पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने तोंडभरून कौतुक केलं. राहुल हेच भारताचे पुढचे पंतप्रधान असतील असं भाकीत केलं. पाक आणि काँग्रेस भाजपविरोधात एकाच भाषेत बोलत आहेत, असं ट्वीट या माजी मंत्र्याने केलं होतं. ‘राफेल’ व्यवहाराचं समर्थन कसं करायचं या विवंचनेत असणाऱ्या भाजपला हे ‘भाकीत’ बळ देऊन गेलं. ‘राफेल’वरच्या एका पत्रकार परिषदेत सदासर्वदा आवेशात असणारे भाजपप्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर आरोप केला तो असा : पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील विचारांचं समान सूत्र हा योगायोग नव्हे, हे षड्यंत्र आहे.. चार दिवसांनी भाजपला साह्य़ करणारा पाकिस्तान काँग्रेसच्याही ‘मदती’ला आला. दोन वर्षांपूर्वी भारतीय जवानांच्या विशेष पथकाने पाकच्या हद्दीत शिरून अतिरेक्यांचे तळ उध्द्वस्त केले. हा ‘पराक्रम दिवस’ भाजपने देशभर तीन दिवस साजरा केला. त्यावरून काँग्रेसने टीका केली. प्रवक्ता सुरजेवाला यांनी भाजपवर केलेला प्रहार असा : पंतप्रधान मोदी-भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जोडी आणि पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ‘आयएसआय’ यांच्यात महाआघाडी झालेली आहे. मोदी सरकार जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचे राजकारण करत आहे.. जसे नेते तसे प्रवक्ते.

क्लिनिक की, आयुष्मान?

अर्थसंकल्पातील महत्त्वाकांक्षी विमा योजना अर्थात ‘आयुष्मान’ वाजतगाजत प्रत्यक्षात आली. या योजनेचं आयुष्मान खरंच किती आणि ती कोणाकोणाच्या आयुष्याला लाभणार आहे, हे आता तरी सांगता येणं अशक्य आहे.  ‘आयुष्मान’सारख्या सरधोपट योजनेपेक्षा प्रादेशिक स्तरावर आजारांचा प्राधान्यक्रम ठरवून विमा योजना लागू करायला हवी. हे तज्ज्ञांनी सांगून झालेलं आहे. पण, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना मोदींची योजना अव्हेरता येणार नाही. मात्र हे बंधन दिल्लीतल्या केजरीवाल सरकारवर नाही. या सरकारने ‘आयुष्मान’चं कवच धुडकावून लावलेलं आहे. त्यामुळे ‘आप’विरोधात भाजपचा राग खदखदतोय. करोल बागमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटनात शहांनी केजरीवालांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’वर तोफ डागली. दिल्लीच्या गरीब मोहल्ल्यांमध्ये केजरीवाल सरकारनं चालवलेल्या दवाखान्यांचा लोकांना खूप फायदा झालेला आहे.  म्हणून ‘आयुष्मान’ला केजरीवालांनी प्राधान्य दिलेलं नाही. या उद्घाटनात शहांनी, ‘कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘मोहल्ला क्लिनिक’मध्ये उपचार होऊ शकतात का?’, हा प्रश्न करून भाजपच्या रागाला वाट करून दिली. त्यावर, ‘आयुष्मान हा पांढरा हत्ती आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनाच या योजनांचा लाभ मिळणार मग कशाला हवी ही योजना?’, या केजरीवालांनी दिलेल्या उत्तरावर भाजपला प्रत्युत्तर सुचलेलं नाही. ‘मोहल्ला क्लिनिक’ची उपयुक्तता गरीब दिल्लीकरांनी प्रत्यक्ष अनुभवली असल्यानं निदान आता तरी भाजप ‘आयुष्मान’ योजना दिल्लीकरांच्या गळी उतरवण्यात अपयशी ठरला आहे.

‘वारकरी’ गेहलोत

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुका दोन-अडीच महिन्यांवर आल्या असल्यानं काँग्रेसच्या मुख्यालयात वर्दळ वाढलेली आहे. ‘२४ अकबर रोड’वर फेऱ्या मारल्याशिवाय तिकीट मिळत नाही हे पक्क्या काँग्रेसवाल्याला माहिती असतं. दीनदयाळ मार्गावर भाजपच्या मुख्यालयात गेलात तर सारं कसं शांत शांत. काँग्रेसमध्ये तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी केलेले इच्छुकांचे ‘कष्ट’ भाजपमध्ये कधीच पाहायला मिळणार नाहीत!.. काँग्रेसच्या पक्षसंघटनेची जबाबदारी आहे ती अशोक गेहलोत यांच्या खांद्यावर. सध्या गेहलोत हे काँग्रेसमधील सर्वात ‘बिझी’ पदाधिकारी बनलेले आहेत. त्यांचं एक पाऊल असतं दिल्लीत आणि दुसरं राजस्थानमध्ये. त्यामुळं पक्षाचं राष्ट्रीय राजकारण आणि प्रादेशिक राजकारण अशा दोन्ही आघाडय़ा त्यांना सांभाळाव्या लागतात. ते मुरलेले काँग्रेसी असल्यानं त्यांना तारेवरची ही कसरत अंगवळणीच पडलेली आहे. राजस्थानच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी पक्षानं सचिन पायलट यांच्यावर सोपवली असली तरी गेहलोत यांचं नेतृत्व राजस्थान काँग्रेसला नाकारता येत नाही. राजस्थानमध्ये सत्ता मिळण्याची आशा काँग्रेसला वाटत असल्यानं गेहलोत यांना राजस्थानातील स्थान ढळमळीत होऊ द्यायचं नाही. राजस्थानचं मुख्यमंत्रिपद पुन्हा गेहलोत यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेहलोत सध्या दिल्ली-जयपूरचे ‘वारकरी’ बनलेले आहेत.

– दिल्लीवाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 1:29 am

Web Title: loksatta chandni chowkatun 9
Next Stories
1 सोबती पालक संघटना
2 मदतीचा आश्वासक ओघ
3 सेवाव्रतींच्या कार्याला दाद
Just Now!
X