नवऱ्याने आत्महत्या केलेली, शेती असूनही नसल्यासारखी. तेव्हा तिच्यासमोर एकच मार्ग होता स्वकष्टाचा. तिने तो स्वीकारला रिक्षा चालवून. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत कारंज्यासारख्या खेडय़ाच्या ठिकाणी दहा सीटर रिक्षा चालवत आत्मविश्वासाने जगणारी ती, आज स्वत:ही ताठपणे उभी आहे आणि मुलांनाही सुरक्षित आयुष्य देते आहे. ती आजची नवदुर्गा आहे, कुसुम चौहान.  
‘म्या माझ्या जीवावर ही दहा सीटर रिक्षा चालवते. बाई माणूस आहे म्हणून कायबी खपवून नाही घेणार आणि लोकांनी खेटून बसण्यासाठी मी गाडी नाही घेतली. तेव्हा नीट बसायचं रिक्षात,’ असं प्रवाशांना बिनदिक्कत सांगणाऱ्या कुसुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असते. मुलांना सुखात ठेवण्याची जिद्द असते. एक बाई दहा सीटर रिक्षा एकही अपघात न करता चालवू शकते हा इतरांसाठी संदेश असतो.
    वाशिम जिल्हा आणि करंजा तालुक्यातील महागांव-लोहगाव येथे राहणारी ही ३२ वर्षीय  कुसुम श्रीचंद चौहान, दहा सीटर ऑटो रिक्षा चालवणारी बंजारा समाजातील धाडसी स्त्री. आज कणखर झालेल्या कुसुमचा हा आत्मविश्वास अनेकदा डळमळीत झाला होता, कारण समाजाचे अनुभवच तसे होते. पण त्यांना न जुमानता ती ठामपणे उभी राहिली आणि आपल्या मुलांना तिने मार्गी लावलं. कुसुमचं जीवन म्हणजे न संपणारी संघर्ष यात्रा आहे. अकाली आलेलं वैधव्य, दोन मुलांची जबाबदारी, टाळता न येणाऱ्या इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, शेतीचं अत्यल्प उत्पन्न; त्यामुळे उद्या खायचं काय हा भेडसावणारा प्रश्न आणि त्यातच व्यसनाधीन नवऱ्याने करून ठेवलेले २०-२२ हजार रुपयांचे कर्ज, सासरच्या लोकांच्या आधाराचा अभाव. केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेली कुसुम आई-वडिलांच्या आधाराने जगण्याची धडपड सुरू करते. स्वत:ला सावरत कुटुंबाला सावरण्याचा निश्चय करते. समाजाच्या चौकटीत न बसणारा निर्णय घेते- ‘मी रिक्षा चालवणारच.’ बाईला तिच्या सुप्त क्षमतांची जाणीव कसोटीच्या क्षणीच होते. कुसुमचं स्त्री असणं तिच्या रिक्षा चालविण्याच्या निश्चयाच्या आड येऊ देत नाही. यातच कुसुमचं वेगळेपण आहे.
    बार्शी टाकळी येथील गुलाम नबी आझाद कॉलेजमध्ये १२ वी कला शाखेत शिकणारी चार मोठय़ा भावंडांतील लाडकी धाकटी बहीण कुसुम. १९९७ साली लग्न होऊन महागांव-लेहगांवला आली. पतीचे शिक्षण बी.ए. घरी सहा दीर, सासरची थोडीफार शेती. मोठय़ा जावांबरोबर कुसुम शेतात कामाला जाई. लग्नानंतर थोडे दिवस चांगले गेले. विदर्भातला दुष्काळी भाग. बेताची शेती, त्यात वाटण्यासाठी घरात भावा-भावांत भांडणे होत. परिणामी कुसुमचा नवरा दारू पीत असे. दोनदा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न पण केला. वैतागून नवरा-बायको दोन मुलांसह कुसुमच्या माहेरी येऊन राहिले. काही दिवस बरे गेले, पण कुसुमच्या नवऱ्याला कशातच यश येईना. निराशेच्या क्षणी कुसुमच्या नवऱ्याने विषप्राशन करून मृत्यूला कवटाळले. दोन मुलांची आई असलेली कुसुम अनाथ झाली आणि परतीचे दोर कापलेली लढाई सुरू झाली.
वडिलांनी दोन एकराचा तुकडा दिला. मोलमजुरी करत, शेतात राबत कुसुम आई-वडिलांच्या सोबतीने पण स्वतंत्र राहून दिवस कंठू लागली. शेतीतून फारसं पीक येत नव्हते. कुसुमच्या मनात ‘आपण रिक्षा चालवावी’ हा विचार जोर धरू लागला. त्याला कारणेही तशीच होती. विदर्भातील शेती बेभरवशाची. दुष्काळ पाचवीला पुजलेला.  रिक्षा काही निसर्गावर अवलंबून नव्हती. ती ठरावीक उत्पन्न देईलच याची तिला खात्री होती. शिवाय तिने तिच्या भावांनाही रिक्षा चालवताना पाहिले होते.
 तिचा विचार तर पक्का झाला, पण रिक्षा शिकविण्यास कुणीच तयार नव्हते. कारण तिचा रिक्षा ड्रायव्हर बनण्याचा निर्णय समाजाच्या चौकटीत बसणारा नव्हता, त्यातच विधवा बाईने रिक्षा चालवणे म्हणजे आक्रीतच.  कुसुमने शक्कल लढवली. वडिलांशी बोलून नात्या-गोत्यातील लोकांकडून कर्ज घेऊन एक सेकंड हँड रिक्षा घेतली. ड्रायव्हर ठेवला आणि त्याला सांगितले, गाडीत रोज अर्धा लिटर डिझेल राखून घरी ये. मला रिक्षा शिकायची आहे. कुसुमचे ट्रेनिंग रोज सुरू झाले. १५ व्या दिवशी कुसुमने रिक्षा रस्त्यावर आणली, कमाईच्या उद्देशाने. पण एक बाई रिक्षा चालवते याचे कौतुक होण्याऐवजी लोक तिच्या रिक्षात बसायचे टाळत. रिक्षावाल्याची रांग असे. तिचा नंबर आला तरी लोक मागच्या रिक्षासाठी थांबत. म्हणत, ‘ही बापय थोडीच हाय! हिला कसं जमणार रिक्षा चालवायला? ही बाई अ‍ॅक्सिडेंट करून आम्हाला मारून टाकेल.’ ड्रायव्हर भाऊ म्हणत, ‘गप घरात बैस, दुसरे लगीन करूया. तुझ्या रिक्षामुळे आम्हाला जेलात जावे लागेल. माणसांचा जीव जाईल.’ कुसुम शांत राहून घरच्यांच्या, समाजाच्या तिखट प्रतिक्रिया  झेलत राहिली, पण गाडी रस्त्यावर चालवायचे काही थांबवले नाही. शेवटी इच्छित परिणाम झालाच. सुरुवातीला घाबरणाऱ्या, टाळणाऱ्या बायाबापडय़ा बापयही कुसुमच्या रिक्षात बसू लागले. खवचट नजरा संपून कौतुक वाटय़ाला येऊ लागले. नियमित कमाई घरी येऊ लागली. रोजचा डिझेल खर्च जाऊन ३००, ४०० रुपये घरी येऊ लागले. सीझनला धंदा चांगला होऊ लागला. तीन वर्षांत तिने रिक्षाचे ९० हजारांचे कर्ज फेडले. बँकेत शिल्लक पडली. कुसुम सांगते, मी लोकांचा विचार केला असता, घाबरले असते तर माझी पोरेबाळे उपाशी राहिली असती. या धंद्यात वाईट अनुभव पण येतात, पण लोक आता मला वचकून असतात. सुरुवातीला पोलीस, आरटीओचाही त्रास झाला. पण वृत्तपत्रात माझी बातमी आली, माझा सत्कार झाला. तेव्हा त्यांचा त्रास बंद झाला.    अर्थात आजही तिला पुरुषी अनुभव येतातच. ती सांगते, ‘‘आजही कधीमधी दारुडे माझ्या ड्रायव्हर सीटच्या डाव्या-उजव्या बाजूला बसतात. मुद्दाम धक्के देतात. मी लगेच गाडी थांबवते. मागच्या प्रवाशांना म्हणते, भाऊ यांना खाली उतरवा. दारू पिऊन झिंगून पडले तर माझ्यावर नाव येईल. तुम्ही लोकांनी मला खेटून बसण्यासाठी गाडी नाही घेतली. प्रवाशांशी दोन हात करून धंदा कसा करावा हे मला आता जमतंय. याशिवाय माझ्या गाडीखाली बेडूक पण मेला नाही की कुणाला धक्का पण नाही दिला अद्याप. मी रिक्षा चालवते तेव्हा पोटातलं पाणी पण हलत नाही.’’  
   अशी ही कुसुम अन्य आठ आत्महत्याग्रस्त विधवा महिलांबरोबर विदर्भातील ‘एकल महिला किसान’ संघटनेच्या वतीने कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेत महिला उद्योजकता शिबिराच्या निमित्ताने आली होती आणि खूप समरसून पॉप कॉर्न, शेंगदाणा चिक्की, राख्यांचे प्रकार करायला शिकत होती. कुसुमला किराणा दुकान टाकायचे आहे. दसऱ्याला नवीन रिक्षा घ्यायची आहे. मुलांना खूप शिकवायचं आहे. डोळ्यात खूप स्वप्ने आहेत.     ब्रेकमुळे हाताला पडलेले घट्टे दाखवत जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहत प्रोत्साहनपूर्ण वातावरण नसताना एक बाई खंबीरपणे जगू शकते हा संदेश आपल्या कृतीतून ती देते आहे. अनेकींना जगण्याची प्रेरणा देते आहे. कुसुमसारख्या नवदुर्गेला दंडवत.
 संपर्क : ०९९२२७३३१९२
आपणही पाठवू शकता आपल्या आजूबाजूच्या दुर्गाविषयी, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अशा स्त्रियांचा माहितीवजा लेख ८०० शब्दांपर्यंत आम्हाला पाठवा. पाकिटावर वा ई-मेल पाठवल्यास सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहा. सोबत त्यांचा फोटो आणि संपर्क क्रमांकही पाठवावा. आमचा पत्ता- प्लॉट नं. ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. आमचा ई-मेल durga.loksatta @expressindia.com