दिवस : २५ ऑगस्ट १९९१, स्थळ : हेलसिंकी (फिनलंड). हेलसिंकी विद्यापीठात द्वितीय वर्षांत संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांने विद्यापीठाच्या इंटरनेट ग्रुपवर एक ई-मेल लिहिला. आपल्या वाचकांशी थोडय़ा संवादानंतर त्याने एक घोषणा केली.
‘‘मी एक छंद म्हणून एप्रिलपासून संगणकाच्या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करत आहे. आज ती प्राथमिक स्वरूपात तयार आहे..’’ यापुढे जाऊन त्याने ई-मेलवाचकांना त्या संगणक प्रणालीवर ऐच्छिक सहयोगाचे आवाहन केले होते. त्या विद्यार्थ्यांचे नाव होते – ‘लायनस टोरवल्ड्स’ आणि त्या संगणक ऑपरेटिंग प्रणालीचे नाव होते – ‘लायनक्स’.
लायनस टोरवल्ड्सचा छंद असलेल्या लायनक्स सव्र्हर ऑपरेटिंग प्रणालीचा आजच्या घडीला जागतिक बाजार हिस्सा हा ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गार्टनर संशोधन पत्रिकेच्या अहवालाप्रमाणे लायनक्सची वाढ इतर सर्व सव्र्हर ऑपरेटिंग प्रणालींपेक्षा प्रचंड अधिक वेगाने होत आहे. महाजालातल्या (म्हणजेच World Wide Web किंवा सर्वसामान्य भाषेत इंटरनेट) अग्रेसर अशा गुगल, अॅमेझॉनसारख्या अतिबलाढय़ डिजिटल कंपन्या, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजसारख्या वित्तीय संस्था आज त्यांच्या सव्र्हरवर संपूर्णपणे लायनक्सचा उपयोग करत आहेत.
वरील घटनेच्या एक दशक आता पुढे येऊ या. जानेवारी २००१ मध्ये जिम्मी वेल्सने विकिपीडियाची (इंटरनेटवरील ज्ञानकोश) निर्मिती केली. हा काही पहिलाच ऑनलाइन ज्ञानकोश नव्हता; पण जिम्मी वेल्सने ज्ञानकोशनिर्मितीच्या पद्धतीमध्ये एक महत्त्वाचा बदल केला होता. त्याने विकिपीडियाला भेट देणाऱ्या कोणत्याही वाचकाला तेथे उपलब्ध असलेल्या माहितीत बदल करण्याचा अधिकार बहाल केला आणि हे सर्व त्याची जात, पात, वय, लिंग वा शैक्षणिक पात्रता न बघता!!
२००४ सालापर्यंतच (म्हणजे जन्मल्यानंतर फक्त तीन वर्षांच्या आत) विकिपीडियाचा ज्ञानसाठा हा एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि एनकार्टाच्या (जे त्या वेळचे जगातले सर्वात मोठे ज्ञानकोश होते) एकत्रित ज्ञानसाठय़ापेक्षा जास्त झाला.
आज विकिपीडियावर केवळ इंग्रजी भाषेत ५५ लाखांवर लेख उपलब्ध आहेत आणि २९९ भाषांत उपलब्ध असलेला जगातील हा एकमेव ज्ञानकोश आहे. एवढा विस्तृत कारभार असलेल्या विकिपीडियामध्ये किती लोक पूर्णवेळ नोकरी करत असतील? केवळ ३००! जिमी वेल्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्यांची मदार आहे ती त्यांच्या साडेचार लाख वापरकर्त्यांवर!
वर उल्लेखलेल्या दोन्ही यशोगाथांमध्ये काही साम्यस्थळे आहेत. लायनक्स आणि विकिपीडिया या दोघांची मूळ निर्मिती जरी काही मूठभर लोकांनी केली असली (लायनक्सच्या बाबतीत तर फक्त लायनस टोरवल्ड्सने!) तरी दोघांचीही वाढ ही जगभरातील तंत्रज्ञ किंवा वापरकर्त्यांच्या ऐच्छिक सहयोगामुळे झाली आहे. हे लोक भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेले आहेत व आपापल्या सोयीनुसार मोकळ्या वेळेत त्यांनी योगदान दिले आहे. दुसरे म्हणजे या आज्ञावली व ज्ञानकोशाच्या उत्पादन आणि वितरण प्रक्रियेच्या सक्षमीकरणात इंटरनेटचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच १९९१ साली (जेव्हा इंटरनेट बाल्यावस्थेत होते व केवळ मूठभर संस्थांमध्ये उपलब्ध होते) जन्मलेल्या लायनक्स प्रणालीला मुख्य प्रवाहात येण्यास ६-७ वर्षे लागली, तर २००१ साली उदयास आलेल्या विकिपीडियाला केवळ १-२ वर्षांतच अमाप लोकप्रियता लाभली. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही प्रयोगांत ज्ञाननिर्मितीच्या पारंपरिक आणि चाकोरीबद्ध प्रक्रियेला पूर्णपणे फाटा देण्यात आला होता. ही एक मुक्त व लोकशाही पद्धतीवर आधारलेली अशी व्यवस्था होती; जिने उच्च दर्जाचे काम मोठय़ा प्रमाणावर व कमी वेळेत करून दाखवले होते.
ज्ञाननिर्मितीच्या या संकल्पनेला ओपन सोर्स (मुक्त स्रोत) असे म्हटले जाते. या लेखमालिकेत आपण याच ओपन सोर्स संकल्पनेचे आणि व्यवस्थेचे सखोल विवेचन करणार आहोत. याच ओपन सोर्स चळवळीने आज क्रांतीचे रूप धारण केले आहे. एके काळी व्यावसायिक जगाच्या परिघाबाहेर उभ्या असलेल्या या चळवळीने आज प्रस्थापितांविरुद्ध फक्त बंडच केले नाही, तर प्रस्थापितांना शह देऊन काही प्रमाणात तरी आपल्या तत्त्वांचा अंगीकार करण्यास भाग पडले आहे. जगभरात विखुरलेल्या पण समविचारी अशा काही हौशी प्रोग्रॅमर्सनी प्रस्थापित व रूढीबद्ध बौद्धिक संपदेच्या विरोधात इंटरनेटने बहाल केलेल्या व्यासपीठाचा खुबीने वापर करून, आपल्या फावल्या वेळेत केलेल्या या उद्योगाने सॉफ्टवेअर जगतातल्या मायक्रोसॉफ्टसारख्या अनभिषिक्त सम्राटांना जो जबर धक्का दिला तो खरोखरच विस्मयचकित करणारा आहे. म्हणूनच ओपन सोर्स संकल्पनेच्या अधिक तपशिलात जाणे, त्याच्या तत्त्वांचा ऊहापोह करणे, ओपन सोर्स चळवळीचा इतिहास समजून घेणे व एकंदर या चळवळीचा सामाजिक परिणाम तपासणे अतिशय रंजक व प्रेरणादायी आहे. तसेच या विषयाला मानवशास्त्रीय, व्यवस्थापन, सामाजिक, आíथक, तात्त्विक आणि ऐतिहासिक अशा विविध पलूंनी अभ्यासणेदेखील खूप उद्बोधक आहे.
कुठलाही प्रकल्प असू दे, त्याचे व्यवस्थापन हे एक गुंतागुंतीचे प्रकरण आहे. ओपन सोर्स प्रकल्पात ही गुंतागुंत खूप जास्त प्रमाणात आहे. यात काम करणारे गट भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेले आहेत. काही मूठभर मंडळी सोडली तर कोणीही या प्रकल्पांमध्ये पूर्णवेळ काम करत नाही, पण त्याचबरोबर कोणी, अगदी कोणीही, आपले योगदान प्रकल्पामध्ये देऊ शकतो. त्यामुळे हे गट आपल्यात समन्वय कसा साधतात, मतभेद कसे मिटवतात व एकंदर गुंतागुंतीचे व्यवस्थापन कसे करतात हेदेखील आपण विस्तृतपणे पाहू.
जगात आतापर्यंत घडलेल्या कुठल्याही चळवळी, उठाव वा क्रांती असोत, प्रत्येकाचे काही सेनापती असतात. ओपन सोर्स चळवळीतल्या अशाच काही अध्वर्यूशीसुद्धा आपण भेट घेऊ. मतमतांतरे प्रत्येकात होती, पण प्रत्येक जण ज्ञानाची कवाडे मुक्त करण्याच्या वेडाने झपाटलेला होता हे नक्की.
ओपन सोर्स संकल्पनेचा उगम सॉफ्टवेअरपासून झाला असला म्हणून ही संकल्पना केवळ तांत्रिक विषयापुरती मर्यादित आहे असे अजिबात नाही. तिचे उपयोजन विविध क्षेत्रांमध्ये करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले आहेत व आजही होत आहेत. जैवविज्ञान, औषधनिर्माण, आरोग्य, शैक्षणिक व संशोधन क्षेत्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवले गेलेत. अशा अनेक प्रयोगांचा व त्यांच्या यशापयशाचा विस्तृत आढावा आपण या सदरात घेणार आहोत.
सरतेशेवटी, ओपन सोर्स आघाडीवर आपण कुठे आहोत हे पाहणे अंतर्मुख करणारे आहे. भारताने पूर्वापारपासून मुक्त ज्ञानाचा, मुक्त समाजाचा पुरस्कार केला आहे व ओपन सोर्स संकल्पनेतली लोकशाही तत्त्वे भारतात घट्ट रुळलेली आहेत. असे असले तरीही दोन विरोधाभास स्पष्ट दिसतात. एक म्हणजे आपण आज स्वत:ला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता समजत असलो तरीही ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये (विशेषत: सॉफ्टवेअर) निवासी भारतीयांचा सहभाग अत्यल्प आहे. दुसरे म्हणजे, एवढय़ा वर्षांच्या अनुभवांवरून आपली मानसिकता ‘लोकशाही म्हणजे दिरंगाई’ अशी झाली आहे. ओपन सोर्स प्रकल्पांत मात्र (जे लोकशाही पद्धतीने राबवले जातात) चित्र संपूर्ण उलटे दिसते. आधी उल्लेखिलेल्याप्रमाणे हे प्रकल्प अतिशय कमी वेळेत पूर्ण केले जातात. भारताच्या बाबतीतल्या या दोन्ही विरोधाभासांची आपण या सदरात सविस्तर चर्चा करू.
आपल्या पहिल्या भेटीचा समारोप करताना एकच सांगावेसे वाटतेय की, जरी मी गेले एक दशकभर ओपन सोर्स संकल्पना आणि व्यवस्थेला अभ्यासलेय, रेड हॅटसारख्या १०० टक्के ओपन सोर्स सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीसाठी काम केलेय, आयआयटी मुंबई व आयआयएम बंगलोरमधील काही ओपन सोर्सवरील संशोधन प्रकल्पांत काम केलेय. तरीही मी स्वत:ला या विषयातला ‘तज्ज्ञ’ वगरे मानत नाही. मला या विषयात थोडासा अधिक अनुभव आहे इतकेच फार तर मी म्हणेन. पण एक नक्की सांगतो, या विषयामध्ये एखाद्या चौकस विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा माझ्यात भरपूर आहे. महाजालातील हे ‘मुक्तायन’ तुम्हा सर्वाच्या सहभागाशिवाय/ प्रतिसादाशिवाय पूर्ण होणार नाही. ही वर्षभराची सफर, माझ्यासकट आपल्या सर्वाना बौद्धिकदृष्टय़ा आनंददायी व बरेच काही नावीन्यपूर्ण शिकवणारी असेल याची मला खात्री आहे.
अमृतांशू नेरुरकर
amrutaunshu@gmail.com
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.