दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून सत्तेवर आल्यानंतर ‘आप’ कडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण केजरीवाल रणछोडदास निघाल्याने तरुणाईचा अपेक्षाभंग झाला आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत केजरीवालांसह त्यांच्या प्रमुख नेत्यांचा पराभव झाला.कॉंग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांचेही पानिपत झाले, हीच त्यातल्या त्यात ‘आप’साठी समाधानाची बाब..
जं  तरमंतरच्या आंदोलनानंतर अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्तरावरील असंतोषाचे पुढारी म्हणून प्रचंड लोकप्रियतेने उभारून वर आले. इजिप्तच्या ‘तहरीर स्केअर’ आंदोलनाने मुबारकसारख्या ताकदवान नेत्याला नेस्तनाबूत केले होते. या पाश्र्वभूमीवर जंतर-मंतरकडे पाहिले जात होते. पुढे मुंबईत अशाच प्रकारचे तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न फसला. तोवर अण्णांचेही केजरीवाल कंपनीबद्दल मत बदलले होते. परंतु अण्णांच्या निवृत्तीनंतर ‘आम आदमी पार्टी’ अधिक आक्रमक झाली. पूर्ण बहुमत नसतानाही ‘आप’ने दिल्लीत सरकार स्थापन केले. ही घोडचूक ठरली. छोटय़ा गोष्टीही दिल्लीत ‘आप’ला जमल्या नाहीत. एव्हाना समाजवादी विचारांचे मेधा पाटकर यांच्यासारखे मोठमोठे नेते ‘आप’च्या वळचणीला आले. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. दिल्लीही पुढे होणाऱ्या राजकारणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ आहे, असे सर्वाना वाटत होते. खासकरून २५ वर्षांपेक्षा लहान असलेल्या ‘तरुण भारता’ला ‘आप’चा दणदणीत पाठिंबा मिळेल, अशी सर्वाचीच अपेक्षा होती. पण या लोकसभा निकालांच्या पाश्र्वभूमीवर तसे काही मतपेटीत घडले नाही. विविध राज्यांत निवडणुका लढवून चार जागांवर समाधान मानावे लागले. ही खास करून ‘तरुण भारता’ची घोर उपेक्षा ठरते. तसेच देशात काही चांगले घडावे, तुलनेत स्वच्छ कारभार, सरकार अनुभवायला मिळावा, अशी जी  ‘व्हाइट कॉलर्ड’ आणि पगारदार सज्जन वर्गाला आशा वाटत होती, ती फोल ठरली आणि केजरीवाल-बेदी आणि दिग्गज नेते हे ‘जुन्या बाटलीतील नवी दारू’ अशा प्रकारचे नेतृत्व आहे, हे जनतेच्या लक्षात आले. पहाट फुटून आशेची सोनेरी किरणे लोकांना दिसत होती, ती मृगजळासारखी होती. हा दारुण अपेक्षाभंग होता. मतदारांना ‘आप’कडून जशी स्वच्छ कारभाराची अपेक्षा होती ती पूर्ण होईल, असे वाटले नाही. लोकसभा निवडणुकांत ‘आप’चा डोलारा कोसळला. हे होणारच होते.
‘आप’चे पैसे कुठून येतात, हा प्रश्न अनेकांना पडला होता, रिलायन्स आणि वेदान्त (अनिल अग्रवाल) यांच्या स्पर्धेतून ‘आप’चा जन्म झाल्याचे काही लोक म्हणतात. सोनिया गांधींच्या काँग्रेससमोर ‘आप’चे खासदार उभे राहतील ही अपेक्षा होती. कारण सोनियांचे सरकार हे रिलायन्सधार्जिणे होते हे सर्वश्रुतच होते. अनिल अग्रवाल यांच्या कंपनीला कायम दुय्यम दर्जा दिला जात होता. ‘कोल-गेट’, कोळसा- पोलादांच्या खाणींमधील अनिल अग्रवाल (सेसागोवा- वेदान्त) यांची कोंडी होत होती, त्यांची वाढ खुंटली होती, असे ‘सेसागोवा’ या अग्रवालांच्या कंपनीला वाटत होते. त्यांच्याबरोबर कोळसा खाणीत दिग्गज नेते (दर्डासारखे) होते. गांधी कुटुंबाचे जावई, रॉबर्ट वडेरा, हेच सत्ताधीशासारखे वागत होते. २-जी, कोळसा खाणी, एकंदरीत आकाशात मोबाइल, टेलिफोन, जमिनीवर रिअल इस्टेट, जमिनीखालच्या खाणी इत्यादी असा सगळीकडे जळी-स्थळी-काष्ठी आणि पाषाणी फक्त भ्रष्टाचार मातला होता. परदेशी भांडवल परत निघून जात होते. अशा वेळी ‘कॉन्शस’ सदसद्विवेकबुद्धी असणारे सरकार नेतृत्व सामान्यांना ‘आप’मध्ये दिसत होते. पण वर म्हटल्याप्रमाणे मृगजळ ठरले.
‘आप’चे आंदोलन ‘गांधीगिरी’सारखे चालले होते. लोकांना मात्र आक्रमक पद्धतीचे, काँग्रेसला ठोकून काढणारे नेतृत्व हवे होते. हेच नेमके ‘मोदी-लाटेचे’ रहस्य होते. ‘आप’ पाण्याच्या वाफेप्रमाणे हवेत विरून गेल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. शेअर बाजारातसुद्धा केजरीवाल ही मारवाडी सटोडियांची प्रतिनिधी होती, तर ‘मोदी लॉबी’ ही गुजराती सटोडियांची लॉबी असे युद्ध शेअर बाजारात जोशात आले होते. त्यात गुजराती लॉबीचा विजय झाला. मोदींच्या मागे इंग्लंड-अमेरिका-कॅनडातील गुजराती एनआयआरचे सर्व प्रकारचे पाठबळ मिळत गेले. याचा मोदी-लाटेला खूप फायदा झाला.
मोदींनी मीडिया ब्लास्ट उडवला. पाचशे कोटींचा खर्च जाहिरातींवर झाला, असा अंदाज आहे. एवढय़ा लखलखाटात ‘आप’चा काजवा कुठून दिसणार? जितक्या कमी वेळात ‘आप’ लाट आली तितक्याच कमी काळात ‘त्सु-नमो’ लाटेसमोर ‘आप’चे पाणी वाफेसारखे उडून गेले हे या निवडणुकांच्या निकालातून दिसत आहे. पण तरीही ‘आप’ला दिसणारा आशेचा किरण म्हणजे केजरीवालांपेक्षा काही पटीने ताकदवान नेत्यांचे शिरकाण झाले आहे.
केजरीवाल यांना बरेच समदु:खी आहेत. पण हे सांत्वन होऊ शकते, राजकारण हे लढाऊ, आक्रमक आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांचे असायला हवे!