20 April 2019

News Flash

युवा स्पंदने : उच्चशिक्षणाचा उपयोग काय?

..हा प्रश्न आजच्या मराठी तरुणांना पडतो, त्याचे एक कारण म्हणजे कालबाह्य़ आणि असंबद्ध अभ्यासक्रम..

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

..हा प्रश्न आजच्या मराठी तरुणांना पडतो, त्याचे एक कारण म्हणजे कालबाह्य़ आणि असंबद्ध अभ्यासक्रम..

मॅक्स वेबर, कार्ल मार्क्‍स, ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमील दरखाईम असा जगभरातील विचारवंतांचा पाठय़क्रम कृष्णा वैद्य यांनी पूर्ण केला. समाजाकडे बघण्याची, त्यात कसे आणि कोणते बदल व्हावेत, अशी दृष्टी विकसित झाली. मग पीएच. डी. केली. विषयही ग्रामीण भागातील अस्वस्थता टिपणारा- ‘आधुनिकीकरणाचा कोळी (मच्छीमार) समुदायावर होणारा सामाजिक- आर्थिक परिणाम’. या विषयावर दोन वर्षांपूर्वी प्रबंध सादर केलेला. तो अभ्यास कृष्णा वैद्य यांनी गुंडाळून एका फडताळात टाकला. आता ते शेती करतात, कारण समाजशास्त्र शिकल्यानंतर थेट नोकरी देणारे दार काही उघडत नव्हते. असेही अध्यापनाशिवाय या विषयाची नोकरीची उपयुक्तता किती? – उत्तर फार तर दोन दरवाजांजवळ येऊन थांबते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी उभ्या असणाऱ्या भल्यामोठय़ा रांगेत स्वत:ला उभे करायचे किंवा उच्चशिक्षण क्षेत्रातला कोणी तरी संस्थाचालक पैसे घेऊन मेहेरबान होतो का, याची वाट बघायची. अगदीच कामाची निकड असेल तर तासिका तत्त्वावर पाच ते आठ हजार रुपयांत महिना काढायचा, एवढाच पर्याय. तो नाकारून कृष्णाने शेतीची वाट धरली. अलीकडेच दुष्काळावर मात करता यावी म्हणून वांगे लावले. शेजारच्या गावात तीन कॅरेट वांगे विकले. सध्या ठोक बाजारभाव दहा ते १५ रुपये रुपये किलो. एके दिवशी बाजारात वांग्याची आवक जास्त होती. त्या दिवशी तेव्हा हाती साडेतीनशे रुपये आले. तेव्हा समाजशास्त्र शिकलेल्या कृष्णाला वाटले आपण शिकलो काय आणि का?

मराठी विषयात नेट, सेट उत्तीर्ण झालेले आणि पी.एचडी. करणारे नंदकुमार उदार हे अहमदनगर जिल्हय़ात एका खासगी शिक्षणसंस्थेत आठ हजार रुपयांमध्ये तासिका तत्त्वावर  शिकवतात. भाषेची सारी कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. भाषांतराची कामे मिळतात का, याचा शोध घेतला. आठ हजार रुपये महिना रकमेवर नोकरी करणारे नंदकुमार उदार सांगत होते- ‘‘अहो, एवढय़ा पगारात भागणार कसे? सहयोगी प्राध्यापक अशी बिरुदावली लागूनही एकाच खोलीत राहतो. घरचे लग्न कर म्हणून मागे लागले आहेत; पण कोण देणार पोरगी?’’ ज्यांना तासिका तत्त्वावर काम मिळाले आहे त्यांची ही अवस्था, मग मराठीत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे काय?

समाजशास्त्र असो वा मराठी, राज्यशास्त्र वा भूगोल, कृष्णा असो वा नंदकुमार.. ही उदाहरणे काही नवे प्रश्न घेऊन उभे आहेत. याची उत्तरे शिक्षणव्यवस्थेला माहीत आहेत की नाही? खरे तर मराठीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना प्राध्यापक, मुद्रितशोधक, भाषांतरकार अशा संधी आहेत खऱ्या; पण त्याहीपेक्षा मोडी वाचणाऱ्यांची गरज अधिक आहे. पण मोडी लिपी हा मराठीच्या अभ्यासक्रमाचा भाग नसल्याने ती शिकण्यासाठी स्वतंत्र कोर्स (शिक्षणक्रम) पूर्ण करावा लागतो. पदव्युत्तर शिक्षणानंतरही अर्थार्जनासाठी पायावर उभे राहता येत नाही. कारण प्रचलित शिक्षण पद्धतीमधील काही विषय कालबाहय़ ठरू लागले आहेत. म्हणूनच विचारवंत वाचल्यानंतर आणि त्या विषयावरील पी.एचडी.पर्यंतचे शिक्षण कष्टाने पूर्ण केल्यानंतरही अर्थार्जनासाठी कृष्णा वैद्यला पुन्हा शेतीत जावे लागते आणि नंदकुमार उदार यांना कमी पैशांत राबावे लागते.

विद्यापीठांनी ठरवलेले अभ्यासक्रम आणि समाजव्यवहार यांचा परस्पर ताळमेळ नसेल तर नक्की काय होते? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व मुलाखती झाल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत दाखल होणाऱ्यांची संख्या दर्शवणारा तक्ता या आयोगाच्या वार्षिक अहवालात  देण्यात येतो. २६ जानेवारी १९५० ते ३१ मार्च १९५१ या कालावधीमध्ये ४२,७२७ जणांनी ही परीक्षा दिली होती. पैकी ९,८६७ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. भारतीय प्रशासन सेवेत तेव्हा ३७८३ जणांची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर या परीक्षेस बसणाऱ्यांची संख्या वाढत गेली. २०१५-१६ च्या अहवालानुसार ३४ लाख पाच हजार ९२७ उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ७०१६ जणांच्या शिफारशी करण्यात आल्या. ६५ वर्षांत ३३ लाख ६३ हजार २०० एवढे उमेदवार वाढले आणि उत्तीर्णतेची टक्केवारी केवळ दोन टक्के. या कालावधीत प्रतिवर्षी सरासरी ५१ हजार ७४१ उमेदवारांची वाढ आहे. या रांगेत कृष्णा किंवा नंदकुमार यांनी किती दिवस उभे राहावे? अध्यापनाशिवाय म्हणजे प्राध्यापैकीशिवाय एवढा एकच मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे. या परीक्षेत एखादा उत्तीर्ण होतो. त्याचे मोठे कौतुकही होते. रांगेत उभे असणारे पुन्हा प्रयत्न करत राहतात.

शाम वसंत गायकवाड स्पर्धा परीक्षेच्या रांगेत उभा राहिला. अपयशानंतर आता तो समाजसेवा शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अजूनही त्याला आशा आहे. स्पर्धा परीक्षेतील त्याची गती पाहून लातूरच्या शिकवणी वर्गातील एका प्राध्यापकाने त्याला दत्तक घेतले. पुस्तकांचा खर्च थोडासा कमी झाला. काही वर्षे लातूर शहरातील ‘वाडा’ हॉटेलमध्ये काम केले. तीन भाऊ, तीन बहिणी. एक बहीण कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली. त्याचा खोल परिणाम शामच्या आयुष्यावर झाला. खूप अभ्यास केला तरी आपल्याला काही मिळेल काय, याविषयी तो साशंक असतो. व्यवस्था बांधून टाकणारी असते, असे त्याचे तत्त्वज्ञान. समाजसेवा शास्त्रातील शिक्षण त्याला एखादी चांगली नोकरी देऊही शकेल, असे त्याला वाटते आहे. त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला. देशविदेशातील क्रांतीचा त्याचा अभ्यास आहे; पण राज्यशास्त्र त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यास उपयोगी पडत नाही. या शिक्षणाचा उपयोग करून त्याला एखादा कौशल्य विकसित करून देणारा वृत्तपत्रविद्या वा समाजसेवेचा अभ्यासक्रम शिकावा लागतो किंवा स्पर्धा परीक्षांच्या रांगेत थांबावे लागते.

बारावीमध्ये जरासे बरे गुण मिळाले की मुलाने विज्ञान शिकण्याचा पालकांचा आग्रह असतो. मग त्यातही उपयोगिता असणाऱ्या विषयाचा मार्ग बंद झाला की रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र असा गट निवडून ते शिक्षण घेणारे अनेक जण. तसे हे विद्यार्थी तळातले, पण गाळाच्या वरचे. बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगावराजाची पल्लवी गवई औरंगाबाद येथे वनस्पतीशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिच्या घरात पाच जण. अडीच एकर शेती. या वर्षी पाऊस नसल्याने रान नापेर राहिले. वडील वीज उपकरण दुरुस्तीचे काम करतात. आई शेडनेटमध्ये ‘पोलन’चे काम करते. एका बहिणीचे लग्न अलीकडेच झालेले. तेव्हा घरी पैसे कसे मागायचे, असा तिला प्रश्न पडतो.  विद्यापीठ परिसरात कमवा-शिकामध्ये ती खुरपणीही करते. तीन-चार हजार रुपये हाती लागतात. कधी तरी आजोबांकडे पैसे मागते. तिला शिकून काही तरी करून दाखवायचे आहे. तशी ती जिद्दी आहे; पण ती जो अभ्यासक्रम शिकते आहे, तो या विद्यापीठात १०० वर्षांपूर्वीचा आहे. गांडूळशेती, फूलशेती, औषधी वनस्पतींची लागवड, असे काही विषय वनस्पतीशास्त्रात नव्याने समाविष्ट करण्याची गरज होती; पण अशा शिक्षणासाठी आपल्याकडे स्वतंत्र शाखाच आहे, तो भाग कृषी शिक्षणाचा. त्यामुळे वनस्पतीशास्त्रवाल्यांनी कृषी क्षेत्रात कसा अभ्यास करायचा? त्यांना इकडे प्रवेश नाही आणि यांना तिकडे. वनस्पतीशास्त्र विभागात संशोधन करणारे अनेक विद्यार्थ्यांचे ध्येयच मुळात प्राध्यापक होणे एवढे असते.

अलीकडे ‘नीट’च्या अभ्यासक्रमात वनस्पतीशास्त्राचा २० टक्के भाग असतो. त्यामुळे काही खासगी शिकवणी वर्गात काम मिळेल, असे प्रयत्न केले जातात; पण अगदी त्या विषयामध्ये ‘डॉक्टरेट’ मिळविणाऱ्यांनाही आता जगण्यासाठी वेगळ्याच खटपटी कराव्या लागतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध अशी म्हण खरी, पण खरेच असे आहे?

१९३६ मध्ये ‘महाराष्ट्र धर्म’ या विनोबा भावेंच्या साप्ताहिकातील एका लेखाचा संदर्भ ८२ वर्षांनंतरही जशास तसा लागू पडेल असा आहे. एक देशसेवाइच्छुक व्यक्ती काम करण्यासाठी म्हणून आला. त्याला विचारले, ‘‘तुम्ही काय काम करू शकाल?’’ तो म्हणाला, ‘‘मी फक्त शिक्षणाचे काम करू शकेन.’’ ‘‘काय शिकवू शकाल? सूत कातणे, कापूस पिंजणे, विणकाम यापैकी काही?’’ असे कोणतेही काम मी केले नाही, असे तो सांगत होता.  ‘‘शांती, क्षमा, तितिक्षा कशी राखावी, हे शिकवाल काय’’ असा पुढचा प्रश्न केला गेला; पण शिकविण्याशिवाय आपल्याला काही येणार नाही, असा त्याचा दावा होता. शिक्षकांचे मानसशास्त्र कसे आहे, असा संवादरूपी लिहिलेला हा मजकूर आजही लागू पडतो. कोणतीही जीवनोपयोगी कर्तबगारी अंगी नसलेला, नवीन कर्तबगारी संपादन करण्यास स्वभावाने असमर्थ बनलेला आणि शिक्षणाची घमेंड बाळगणारा, पुस्तकात पुरलेला आळशी जीव असे शिक्षकाचे मानसशास्त्र असल्याचे वर्णन विनोबांनी केले होते. असे शिक्षण हे जीवनापासून तोडून वेगळे काढलेले मुर्दाड शिक्षण आणि शिक्षक म्हणजे ‘मृत-जीवी’ माणूस असे त्यांचे वर्णन होते. ते आजही लागू आहे का? कृष्णा, नंदकुमार आणि पल्लवी ही प्रातिनिधिक नावे आहेत. गावोगावच्या महाविद्यालयांत किंवा विद्यापीठांत स्थिती सारखीच आहे. त्यातून येणारी अस्वस्थता महाविद्यालयाच्या परिसरात, विद्यापीठांमध्ये अंगावर येते. याकडे डोळेझाक करण्याची आता सवय आपल्याला लागली आहे. अन्यथा उपयोगिता नसणाऱ्या काही विषयांच्या अभ्यासक्रमांत बदल झाले असते, कोटय़वधी तरुणांना बेरोजगार ही बिरुदावली लागली नसती.

शिक्षण मिळाले नाही, याचा पश्चात्ताप करणारी पिढी एके काळी होती. आता शिक्षण का घेतले आणि घेतले ते घेतले ते इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी या विषयांत का घेतले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

suhas.sardeshmukh@expressindia.com

First Published on January 31, 2019 12:51 am

Web Title: what is the use of high education