अशोक तुपे

गेल्या काही दिवसांत कांद्याएवढे आणखी दुसरे कुठलेही पीक चर्चेत राहिले नसेल. वाढलेले दर, मग पुन्हा घसरण, साठेबाजी, केंद्र-राज्यांची धोरणे, त्यातील बदल या साऱ्यांनी या पिकाला सतत चर्चेतील स्थान मिळत आहे. यामुळे शेतकरीही या पिकाकडे मोठय़ा प्रमाणात वळला आहे. मात्र ही लागवड करताना काय काळजी घ्यावी याची उपयुक्त माहिती..

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

देशात कांद्याचे उत्पादन मागील वर्षी २६७ लाख टनावर  झाले आहे. राज्यात ९० लाख टनापेक्षा जास्त उत्पादन होते. राज्यात आता कांदा उत्पादकांना पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आता बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगण, मध्यप्रदेशात कांदा लागवड वाढत आहे. राज्यात नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांबरोबर धुळे, नंदुरबार, बीड, सातारा, औरंगाबाद, लातूर आदी जिल्ह्यातही लागवड वाढत आहे. उसापेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना कांद्यात मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले आहेत. मात्र सरकारचे धरसोडीचे धोरण, बदलते हवामान यामुळे या पिकाला मोठी झळ बसत आहे. दुसरीकडे हे पीक घेताना उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा अमर्याद वापर, सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण, स्वयंघोषित सल्लागार व पैसे कमविण्यासाठी गरज नसताना खते व रासायनिक औषधांचा वापर यामुळे या पिकात काही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

यंदा रब्बी व उन्हाळी कांद्याच्या लागवडीची तयारी जोरात सुरू आहे. पण शेतकऱ्यांना रोपवाटिका तयार करण्यापासून अडचणींचा मुकाबला करावा लागला. मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कांद्याचे दर वाढलेले होते.त्यामुळे कांद्याचे घरगुती बियाणे तयार करताना आर्थिक कारणामुळे अडचणी आल्या. त्यात बियाणे शेतात काढणीच्या अवस्थेत असल्याने गारपीट झाली. साहजिकच यंदा बाजारात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. बनावट बियाणे बाजारात विकले गेले. खरिपात लागवड करण्यासाठी तयार केलेले तसेच रांगडय़ा कांद्याचे बियाणे हे रब्बी हंगामाकरिता विकले गेले. तसेच मागील वर्षांचे बियाणे या वेळी विकण्यात आले. कृषी विभागाने धाड  टाकू न असे बनावट बियाणे विकणारे पकडले पण त्यांची संख्या मोजकी होती. यंदा रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांना निकृष्ठ बियाणे ही मोठी समस्या होती. बहुतेक बियाणे कंपन्यांनी किमती दुप्पट ते चौपट दराने वाढविल्या. बाराशे ते अडीच हजार  रुपये किलोने दरवर्षी विकले जाणारे बियाणे हे चार ते पाच हजार रुपये दराने विकले गेले. काही भागात तर सहा हजार रुपये दराने बियाणे विकण्यात आले. मोठा काळाबाजार झाला. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. रोपवाटिका तयार झाल्यावर आता हवामानाचे संकट आले आहे. एक तर सततच्या पावसामुळे रोपवाटिका उशिरा तयार झाल्या. त्यामुळे एक महिना लागवडी उशिरा होणार आहेत. हंगाम लांबला तरी अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. आता एक महिन्याची रोपे झालेली आहेत. पण गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ हवामान आहे. काही भागात पाऊ स पडला आहे. या हवामानामुळे रोपवाटिकेत कांदा रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मावा, तुडतुडे, थ्रीप्स याचा प्रादुर्भाव  झाला आहे. जमिनीतील बुरशी वाढली आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोपे अचानक मारतात. पिवळा रंग येतो. अशा एक ना अनेक समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे.

रोपवाटिकेत रोपे दर्जेदार तयार व्हावीत म्हणून शेतकऱ्यांनी कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. विचित्र हवामानात रोपांवर टॉनिक किंवा पोषक फवारू नये. त्यामुळे अधिक रोग धावण्याची शक्यता असते. तसेच ह्युमिक अ‍ॅसिड, फॉलिक अ‍ॅसिड तसेच अनेक सिविड एक्सट्रॅक्ट वापरली जातात. त्याची गरज नसते. त्याने काही समस्या तयार होतात.फार तर गरज असेल तरच सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारली तर चालू शकेल. आता रोपांची लागवड होईपर्यंत अधिक सजग राहणे गरजेचे आहे.

काही भागात कांदा लागवड सुरू आहे. लागवड करण्यापूर्वी सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाले आहे. त्यामुळे गांडूळ खत, कोंबडी खत वापरले पाहिजे पण ही खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. शेणखत वापरणे आर्थिक दृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे रासायनिक खते ही वापरावी लागतात. मुळात कांद्याची मुळे ही उथळ असतात. त्यामुळे योग्य वेळी खते देणे आवश्यक असतात. नत्र, स्फुरद, पालाश ही खते द्यावी लागतात. पेशींना काटकपणा येण्यासाठी, कांद्याचा टिकाऊ पणा, आकर्षक रंग येण्यासाठी पालाशची गरज आहे. त्याकरिता गंधकयुक्त (सल्फरयुक्त) खतांचा वापर महत्त्वाचा ठरतो. हल्ली खतांचा बेसुमार वापर वाढला आहे. तर अनेकदा वेळेवर वापर केला जात नाही.जमिनीच्या मगदुराप्रमाणे खते दिली पाहिजेत. जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असेल तर मग सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरली पाहिजेत. हल्ली काही लोक सिलिकॉन, ह्युमिक अ‍ॅसिड, फॉलिक अ‍ॅसिड वापरण्याचा सल्ला देतात. पण त्याचा वापर सावधपणे करावा. या पोषकाचा वापर केल्याने जमिनीतील बुरशी वेगाने वाढते. तिच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे कांदा पातीवर बुरशी येते. करपा धावतो. मग फुलकिडे व मावा त्याचा अधिक प्रसार करतात. त्याकरिता माती परीक्षण करून कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या शिफारशी व सल्लय़ानुसार खतांचा वापर केला तर पैशाची बचत होऊ न उत्पादन वाढ होऊ शकेल.

कांदा लागवडीपूर्वी रोपे ही अ‍ॅझोस्पिरिलियम किंवा ट्रायकोडर्मा किंवा अ‍ॅझोटो बॅक्टर यामध्ये दोन तास बुडवून ठेवली पाहिजे. त्याआधी बुरशीनाशक व कीटकनाशकात रोपे बुडविली पाहिजेत. त्याने पिकावर करपा व रोग येत नाही. लागवड ही १० ते१५ सेंटीमीटरवर लावावी. कांदा अधिक काळ टिकला पाहिजे म्हणून लागवड करताना निम्मा युरिया द्यावा, नंतर निम्मा युरिया द्यावा. पन्नास दिवसाच्या पुढे युरिया देऊ  नये. खते ही एक ते दीड किंवा जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत द्यावी. त्यानंतर २१ दिवसांनी तणनाशकाची फवारणी करावी. पुढे कांद्यावर गरजेनुसार कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करावी. आता अनेक कंपन्यांनी टॉनिक बाजारात आणली आहेत. त्यात प्रचंड नफा मिळतो म्हणून दुकानदार ते शेतकऱ्याच्या गळी मारतात. बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, सूक्ष्म अन्नद्रव्ये व अनेकदा काही अ‍ॅसिड एकत्रित फवारण्यासाठी देतात. त्याने पिकावर रोग धावतो. मग पुन्हा त्यावर औषध फवारणी करावी लागते. हे एक दुष्टचR  आहे. हल्ली मार्केटिंगच्या जमान्यात नफेखोरी करणारे काही महाभाग शेतकऱ्यांना फसवत असतात. त्यात काही दुकानदार, सल्लागार सामील असतात. त्यांच्यापासून सावध राहण्याची अत्यंत गरज आहे.

निकृष्ट बियाणे, युरियाचा बेसुमार वापर व हवामानातील बदल यामुळे कांद्याला डोगळे निघतात. रात्रीच्या व दिवसाच्या तापमानात जर २० अंशाचा फरक असेल तर असे डोंगळे निघतात. तसेच, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर डोंगळे निघतात. त्यामुळे तांबे, जस्त, लोह, बोरॉन आदी सूक्ष्म अन्नद्रव्ये याची फवारणी कांदा पिकावर करावी.

देशात कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. तेरा लाख हेक्टरवर लागवड होते. आता दर एकरी उत्पादन वाढले आहे. पूर्वी दहा ते बारा लाख टन हेक्टरी उत्पादन होते. ते आता १६ ते १७ लाख टनावर गेले आहे. राज्यात उत्पादकता सर्वाधिक आहे. हे उत्पादन आता काही शेतकरी एकरी २० ते २५ टन घेत आहेत. एकरी उत्पादकता वाढली, क्षेत्र वाढले त्यामुळे अवघ्या पंधरा वर्षांत पन्नास लाख टनावरून उत्पादन अडीचशे टनावर गेले आहे. यावर्षी मार्चमध्ये निर्यातीला परवानगी दिली, पण सहा महिन्यांत निर्यातबंदी केली. त्यामुळे दर नियंत्रणात आले. सरकार हे तीस ते चाळीस रुपयांवर कांदा विकू द्यायला तयार नाही. अन महागाई वाढू नये म्हणून कांदा पन्नास रुपये विकू देणार नाही. त्याकरिता उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार कांदा निर्मिती हाच एक पर्याय आहे. पिकविलेला कांदा चाळीत साठविणे व योग्य दर आल्यानंतर विकणे तरच शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतील. सरकारच्या भूमिका, हवामानातील बदल, निविष्ठा विक्रेते, गंडा घालून नफेखोरी करणारे असे सारे कांदा उत्पादकांना अडचणीत  आणत असतात. त्यामुळे कांदा उत्पादकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.

ashok.tupe@expressindia.com