‘भारतपुत्रा’चे स्मृतिशतक

सुखवस्तू पारशी कुटुंबात ४ ऑगस्ट १८४५ रोजी जन्मलेले फिरोजशहा १८६४ मध्ये पदवीधर झाले.

पालिकांच्या स्वायत्ततेसाठी आग्रह धरणारे नेते फिरोजशहा मेहता

दादाभाई नौरोजी यांच्या वसाहतवादाविरोधी आर्थिक विचारांना कृतीत आणणारे आणि मुंबईच नव्हे तर सर्व पालिकांच्या स्वायत्ततेसाठी आग्रह धरणारे नेते फिरोजशहा मेहता यांची स्मृतिशताब्दी उद्या, ५ रोजी आहे..
‘फिरोजशहा मेहता हे मला हिमालयाप्रमाणे, लोकमान्य हे महासागराप्रमाणे आणि गोपाळकृष्ण गोखले हे गंगा नदीप्रमाणे भासले,’ असे महात्मा गांधींनी आत्मचरित्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती बद्रुद्दीन तय्यबजी, दिनशा वाच्छा व फिरोजशहा मेहता हे तिघे जण ‘ब्ल्यू बॉइज ऑफ बॉम्बे’ म्हणून प्रसिद्ध होते, तेव्हाचा हा विसाव्या शतकाच्या आरंभाआधीचा आणि सुरुवातीचा काळ. त्या काळात दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, व्योमेशचंद्र बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल हे ख्यातनाम भारतीय नेते, त्याचबरोबर भारताचे हितचिंतक विल्यम वेडरबर्न, चार्ल्स ब्रॅडले, सर हेन्री कॉटन तसेच काँग्रेसचे संस्थापक अॅलन ह्यूम यांसारखे नामवंत नेते होऊन गेले. यांपकी दादाभाई नौरोजींना फिरोजशहा गुरू मानत. स्वत: फिरोजशहा हे एक श्रेष्ठ आणि दूरदर्शी विचारवंत होते.
फिरोजशहा हे स्वत:ला पूर्णपणे आपण भारताचे पुत्र आहोत, असे मानत. पारशी समाज हा परकीय असून या समाजाला भारताच्या जडणघडणीत स्थान नाही, ही कल्पना त्यांनी कधीच बाळगली नाही. एका विशिष्ट प्रसंगी त्यांच्या काही मित्रांनी वेगळे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिरोजशहा यांनी ऐतिहासिक निवेदन करून मित्रांच्या निदर्शनास त्यांची चूक आणून दिली : ‘पारशी समाजाने आपले अस्तित्व आणि हितसंबंध या देशातील इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत, असे समजणे केवळ स्वार्थी व संकुचितच ठरणार नाही, तर आत्मघातकी ठरेल. आपला समाज लहान असला, तरी समंजस व कल्पक आहे. सबब, आपण या देशातील इतरांपासून अलग न राहता, समान हितसंबंध आणि परस्पर सहकार्याच्या दृष्टीने पाठपुरावा करायला हवा. तसे झाले नाही, तर या देशाच्या उभारणीत आपली रास्त भागीदारी राहणार नाही. मी प्रथम भारतीय व नंतर पारशी आहे.’
सुखवस्तू पारशी कुटुंबात ४ ऑगस्ट १८४५ रोजी जन्मलेले फिरोजशहा १८६४ मध्ये पदवीधर झाले. १८६५ मध्ये रुस्तमजी जमशेदजी जिजिभॉय यांनी पाच भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्यासाठी दीड लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या पाच जणांत फिरोजशहा होते. पण या मदतीचा फायदा त्यांना फार काळ मिळाला नाही. रुस्तमजी यांना व्यापारात मोठी खोट आली आणि फिरोजशहा यांना मिळणारी मदत बंद झाली.
इंग्लंडमध्ये फिरोजशहा चार वष्रे होते. त्या काळी, दादाभाई नौरोजी यांच्याबरोबरचा परिचय त्यांना फार उपयुक्त ठरला. ब्रिटिश वसाहतवादामुळे भारतीय भांडवलाचे (नैसर्गिक साधनसामग्री आणि श्रमाचे) कसे शोषण होते, अशी वैचारिक मांडणी करून ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ठरलेले दादाभाई तेव्हा इंग्लंडमध्ये भारताची बाजू मांडण्याची पराकाष्ठा करीत होते. दादाभाईंच्या प्रेरणेमुळे फिरोजशहांनी ‘द एज्युकेशनल सिस्टीम्स ऑफ इंडिया’ या विषयावर आपला प्रबंध सादर करून भारतात प्राथमिक शिक्षणापासून तांत्रिक आणि विद्यापीठातील शिक्षण यांची सूत्रबद्ध व्यवस्था अमलात आणावी, अशी मागणी केली. १८६८ मध्ये ते बॅरिस्टर झाले व भारतात परतले. त्यानंतर त्यांनी मुंबईत हळूहळू जम बसविला; परंतु केवळ कायद्याच्या क्षेत्रापुरतेच आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता चळवळ्या फिरोजशहांनी राजकारण व समाजकारणाकडेही आपला मोर्चा वळविला. जॉर्ज यूल यांच्या अध्यक्षतेखाली अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनात आपले विचार मांडताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने फिरोजशहा म्हणाले, ‘तुम्हाला खरोखरच दूरदर्शी धोरणाची आखणी करायची असेल, तर इतिहास हेच सांगेल की, राष्ट्राला नि:शस्त्र ठेवणे कधीच सुज्ञपणाचे ठरत नाही.’ ..भारतातील तरुणांना लष्करी शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. पर्यायाने, असा विचार त्यांनी सावरकरांच्या आधी मांडला होता.
काँग्रेसच्या स्थापनेआधीच, १८७० पासूनच फिरोजशहांनी मुंबई महापालिकेच्या कामात रस घ्यायला सुरुवात केली. ते १८७२ मध्ये प्रथम सभासद म्हणून पालिकेवर निवडून गेले आणि लवकरच ‘फिरोजशहा मेहता म्हणजे मुंबई महापालिका’ हे समीकरण तयार झाले. पुढे त्यांनी मुंबई महापालिकेच्या घटनेत काही बदल सुचविणाऱ्या विधेयकाच्या (१८८८) मसुद्यात महत्त्वाची दुरुस्ती सुचवली. हे विधेयक म्हणजे महापालिकांची ‘हक्कसनद’ (मॅग्नाकार्टा) समजले जाते. या कायद्याने मुंबई महापालिकेला आपला कारभार स्वायत्तपणे करण्याचा हक्क आहे, हे तत्त्वत: प्रस्थापित झाले. याच सुमारास त्या वेळचे व्हाईसराय लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वायत्त प्रशासनाची योजना जाहीर केली. तिचे फिरोजशहांनी स्वागत केले. भारताच्या राजकीय प्रगतीतील हे पहिले पाऊल आहे, असे उदगार त्यांनी काढले.
काँग्रेसच्या, १८८९ व १९०४ मध्ये मुंबईत भरलेल्या अधिवेशनांचे ते स्वागताध्यक्ष होते. या अधिवेशनावर ५० हजार रुपये खर्च झाला. काँग्रेसच्या काही सभासदांनी ही पशाची उधळपट्टी असल्याची टीका केली. पण फिरोजशहा यांनी या खर्चाचे जोरदार समर्थन केले. हा खर्च ‘तमाशावर’ करण्यात आला, या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘काँग्रेस तीन दिवसांच्या अल्प मुदतीत जे कार्य करते, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे व पवित्र असे दुसरे कार्य नाही. सरकारने सुज्ञ व न्यायी धोरण स्वीकारावे, असे आवाहन करण्यासाठी हा खर्च झाला. अशा परिस्थितीत हा खर्च निष्कारण करण्यात आला, असे म्हणणे अयोग्य आहे.’
या अनुषंगाने य. दि. फडके यांनी फिरोजशहा मेहता यांच्यासंबंधी नोंदविलेले मत उद्धृत करण्यासारखे आहे : ‘फिरोजशहा मेहता हे उदारमतवादी विचारांचे असले, तरी त्यांचे पक्ष संघटनेबाबतचे व्यवहार हे प्राधिकारवादी नेत्यासारखे होते. भल्याबुऱ्या मार्गानी पक्ष यंत्रणेवरची आपली पकड घट्ट ठेवणाऱ्या काँग्रेसमधील आजच्या मठपतींचे फिरोजशहा हे आद्य आचार्य होते, असे म्हणावे लागेल.’ परंतु आज ही मिरासदारी केवळ काँग्रेसची राहिली नसून भाजप तसेच अनेक प्रादेशिक पक्षांनाही त्याची लागण झाली आहे.
स्वाभिमानी फिरोजशहा यांचे धोरणाच्या बाबतीत सरकारशी वारंवार खटके उडत, झगडे होत. असाच एक तीव्र झगडा ‘बॉम्बे लॅण्ड रेव्हेन्यू अॅक्ट’वरून झाला. या जमीन-महसूल विधेयकाला त्यांनी कसून विरोध केला. तरीही, ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा निर्धार जेव्हा स्पष्ट झाला, तेव्हा फिरोजशहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कायदे मंडळातून सभात्याग करून एकच खळबळ उडवून दिली. त्या काळात असे करणे म्हणजे एक साहस होते. यावर वर्तमानपत्रांतून बरीच टीका झाली, तेव्हा तीन लेख लिहून त्यांनी या कृतीचे समर्थन केले.
१८९२ मध्ये निवडणुकीच्या तत्त्वानुसार प्रांतिक कायदे मंडळांचा विस्तार करण्यात आला. तेव्हा बिनसरकारी सभासद म्हणून निवडून गेलेले फिरोजशहा हे पहिले भारतीय होते. मुंबई महापालिकेतर्फे ते बिनविरोध निवडून गेले होते. पुढे १८९५ मध्ये मुंबई कायदे मंडळाने मध्यवर्ती कायदे मंडळाचे सभासद म्हणून फिरोजशहा यांची निवड केली. प्रांतिक व मध्यवर्ती कायदे मंडळात ते सरकारवर सडेतोड टीका करीत. विशेषत: अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे संस्मरणीय ठरली.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्येही फिरोजशहा यांनी बरेच कार्य केले. तरुणपणापासूनच शिक्षण हा त्यांचा आवडता विषय होता. मुंबई विद्यापीठाशिवाय प्रांतिक कायदे मंडळे आणि मध्यवर्ती कायदे मंडळांमार्फत सरकारने शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, यावर फिरोजशाह यांचा भर होता. आजही आपण फिरोजशहा यांच्या कसोटीला उतरलो आहोत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.
त्याचबरोबर, फिरोजशहा हे स्वदेशीचे कडवे पुरस्कत्रे होते. विशेष म्हणजे स्वदेशीला चळवळीचे व्यापक स्वरूप येण्यापूर्वी त्यांनी स्वदेशीचा हिरिरीने पुरस्कार केला. के. टी. तेलंग वगरे काही मित्रांच्या साह्य़ाने त्यांनी साबण कारखाना चालू केला. पण हा उपक्रम निष्फळ ठरला. मग १९११ मध्ये ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यास त्यांनी मदत केली. या पूर्णपणे स्वदेशी बँकेचे फिरोजशहा पहिले अध्यक्ष. बँकेचे भागभांडवल भारतीयांनीच पुरविले. ‘खरी व स्थायी स्वरूपाची प्रगती साधायची असेल, तर देशी भांडवलाला पर्याय नाही’ हा महत्त्वपूर्ण संदेश फिरोजशहा यांनी त्या काळात दिला. एका अर्थाने, दादाभाई नौरोजींचे आर्थिक विचार प्रत्यक्षात आणले. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे वर्तमानपत्र सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्याचा पहिला अंक एप्रिल १९१३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि फिरोजशहा यांच्या कार्यक्षम मार्गदर्शनाखाली या वर्तमानपत्राची झपाटय़ाने प्रगती झाली. ते या पत्राच्या कारभारात स्वत: लक्ष घालत.
मुळात कुशाग्र बुद्धीचे असल्याने भारताबाहेरील घटनांवरही त्यांचे लक्ष असायचे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर फिरोजशहा यांनी कडक टीका केली. त्यांचे म्हणणे होते की, ब्रिटिश साम्राज्यातील कोणत्याही विभागाने कोणालाही समान नागरिकत्वाचा हक्क नाकारणे समर्थनीय ठरत नाही. गांधीजींनी नेमक्या याच मुद्दय़ावरून दक्षिण आफ्रिकेत नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ सुरू केली होती.
एका बाजूला सरकारचे लोकहितविरोधी धोरण व दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधील जहाल मतवाद्यांची भेदक टीका, यामुळे ते पुढे राजकारणापासून काहीसे अलिप्त राहू लागले. तरीही मुंबईचे त्या वेळचे राज्यपाल लॉर्ड वििलग्डन हे बऱ्याचदा सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्नांबाबत फिरोजशहा यांचा सल्ला घेत. त्यांनीच फिरोजशहा यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक केली. पुढे विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही सन्माननीय पदवी दिली. पण ती स्वीकारण्यासाठी ते हयात नव्हते. काँग्रेसचे १९१५चे अधिवेशन मुंबईत भरवण्याची तयारी चालू असताना ५ नोव्हेंबर रोजी, वयाच्या ७०व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली वाहताना लोकमान्य टिळक म्हणाले होते : ‘फिरोजशहा यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे निर्भयता. एकदा त्यांनी एखाद्या प्रश्नाबद्दल मत बनविले आणि त्यानुसार धोरण आखले की, ते ठामपणे त्याचा पुरस्कार करीत आणि त्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नसे.’ ..वैचारिक निष्ठा बावनकशी असल्याखेरीज हे साध्य होऊ शकत नाही!
संजय चिटणीस – sanjay.chitnis@outlook.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In the memory of leader pherozeshah mehta who fought for municipal corporation autonomy