scorecardresearch

स्वसंरक्षणाचे धडे

ज्यूदो-कराटेमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या तपस्वी गोंधळी यांच्यातल्या सामाजिक कार्याच्या ओढीने त्यांना रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये पोहोचवले ते मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी.

स्वसंरक्षणाचे धडे
तपस्वी गोंधळी

हर्षद कशाळकर

ज्यूदो-कराटेमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या तपस्वी गोंधळी यांच्यातल्या सामाजिक कार्याच्या ओढीने त्यांना रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये पोहोचवले ते मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी. महिला पोलिसांना ‘दामिनी’ बनवणाऱ्या तपस्वी यांना राज्याचा ‘युवा पुरस्कार’, केंद्र सरकारचा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ही मिळाला आहे. याशिवाय त्यांच्या ‘प्रिझम सामाजिक विकास संस्थे’च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज स्त्रियांनी शारीरिकदृष्टय़ा सक्षम होणे गरजेचे आहे, हा संदेश थेटपणे ४० हजार मुलींपर्यंत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन पोहोचवणाऱ्या ‘रायगड भूषण’ तपस्वी गोंधळी आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

राज्य शासनाच्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी मास्टर ट्रेनर म्हणून तपस्वी यांची निवड करण्यात आली होती. पुण्याजवळच्या बालेवाडी येथे शिबीर सुरू झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या १०० मुलींना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रशिक्षित केले. हे प्रशिक्षण संपल्यानंतर काही मुली रेल्वेने मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. या प्रवासादरम्यान काही तरुणांनी नेहमीप्रमाणे टिंगलटवाळी करत या मुलींची छेड काढणे सुरू केले. नुकतेच प्रशिक्षण संपवलेल्या या मुली, प्रचंड आत्मविश्वास घेऊन निघालेल्या. त्या गप्प थोडय़ाच बसणार होत्या? साहजिकच या मुलींनी त्या तरुणांना इतका चोप दिला, की आता ते कोणत्याच मुलींची छेड काढणार नाहीत. ही आहे तपस्वी गोंधळी यांच्या यशोगाथेतील एक कथा. अशा ४० हजार शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना त्यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले असून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.

   शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तपस्वी यांनी ‘नेहरू युवा केंद्रात’ स्वयंसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लहानपणापासूनच त्यांनी ज्यूदो आणि कराटे या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केले होते. अनेक पुरस्कारही मिळवले होते, मात्र या क्रीडा प्रकाराचा भविष्यात इतक्या लोकांना, विशेषत: मुलींना त्यांच्या स्वसंरक्षासाठी फायदा करून देता येईल याची जाणीव त्यांना नव्हती. ती संधी त्यांना त्यांच्या क्रीडागुणांमुळेच मिळाली.  राज्य शासनाच्या वतीने पुण्यातील बालेवाडी येथे स्वयंसिद्धा प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. २००६ मध्ये या प्रशिक्षणासाठी रायगड जिल्ह्यातून तपस्वी यांची निवड करण्यात आली. तेथे दहा दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्याप्रमाणेच अनेक मुलींना, तरुणींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करता येणे शक्य आहे, याची त्यांना जाणीव झाली. रायगडमध्ये परतल्यानंतर त्यांनी शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यास, आत्मरक्षणासाठी ज्यूदो, कराटे, लाठी-काठी कशी वापरावी याची माहिती देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांचा या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता, मात्र खचून न जाता त्यांनी आपले हे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले. सुरुवातीच्या काळात तर त्यांनी आपल्या दुचाकीवरून एकटय़ानेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन मुलींना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. पण हे काम एकटय़ादुकटय़ाचे नाही हे लक्षात आले, तसेच या प्रशिक्षणासाठी चांगल्या सहकाऱ्यांची गरजही लक्षात आली. प्रत्येक तालुक्यातील काही तरुणींना त्यांच्या कौशल्याप्रमाणे निवडून प्रशिक्षण दिले आणि मग त्या आणि त्यांचा चमू सज्ज झाला, प्रत्येक तालुक्यात स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यायला. 

 या उपक्रमाला जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस दल, क्रीडा विभाग यांचेही सहकार्य मिळत गेले. त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती वाढत गेली. गावागावातील शाळा, आश्रमशाळा, वस्ती शाळा, खासगी शाळा सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे सुरू केले. शाळांबरोबरच त्यांनी महाविद्यालयात जाऊन मुलींना आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चा बचाव कसा करावा याचे तंत्र अवगत करून दिले. गेल्या १५ वर्षांत तब्बल ४० हजार मुलींना तपस्वी यांच्या या प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे.

त्यांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे रायगड पोलीस दलात दाखल झालेल्या महिला पोलिसांना दिलेले स्वसंरक्षणाचे वेगळे धडे, ज्याचा त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालताना चांगलाच फायदा झाला. यातील काही तरुणींची पोलीस दलातील ‘दामिनी’ पथकात निवड केली गेली. छेडछाडविरोधी कारवाईतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याच कामाची दखल घेऊन तपस्वी यांना राज्य सरकारने ‘राज्य युवा पुरस्कारा’ने सन्मानित केले, तर केंद्र सरकारने त्यांची निवड ‘राष्ट्रीय युवा पुरस्कारा’साठी केली. एवढेच नव्हे तर ‘यूथ डेलिगेशन प्रोग्राम’साठी चीन येथे पाठवण्यात आलेल्या पथकात भारताचे नेतृत्व करण्याची संधी तपस्वी यांना मिळाली. रायगड जिल्हा परिषदेने ‘रायगड भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

  स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शैक्षणिक प्रगतीमुळे स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत, परंतु शारीरिकदृष्टय़ा सक्षम होणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रसंग आलाच तर त्याचा सामना करणे शिकायला हवे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरीही असे गुन्हे घडणे थांबलेले नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीने संरक्षणाचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे असल्यामुळे हे कार्य यापुढील काळातही सुरू ठेवणार असल्याचे तपस्वी सांगतात.

आपल्या सामाजिक कार्यासाठी तपस्वी यांनी ‘प्रिझम सामाजिक विकास संस्था’ स्थापन केली असून त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजप्रबोधनासाठी गावागावात जाऊन पथनाटय़े सादर केली जातात. व्यसनमुक्ती, स्त्रियांवरील अत्याचार, हुंडा प्रथा, कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या विषयांवर आत्तापर्यंत ४०००हून अधिक पथनाटय़े सादर केली गेली आहेत. यासाठी विधि व न्याय विभागाचे सहकार्य मिळत आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणातील विद्यार्थी स्पर्धापरीक्षांमध्ये भाग घेत नाही, त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन तपस्वी यांनी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा’चीही सुरुवात केली असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

चित्रपटातल्या नायिकांपेक्षा खऱ्या आयुष्यातील नायिका व्हावे हे त्यांचे ध्येय आहे आणि हे ध्येय इतर मुलींनीही आत्मसात करावे ही त्यांची मनीषा आहे. त्या दृष्टीने त्यांची आजवरची वाटचाल सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तपस्वी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज अनेक तरुण मुली या उपक्रमात सहभागी होत आहेत. स्वसंरक्षणासाठी स्त्रियांना सबल करण्याचा तपस्वी यांनी घेतलेला वसा अनेकानेक मुलींपर्यंत पोहोचावा, ही ‘लोकसत्ता’ तर्फे त्यांना शुभेच्छा.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या