– राधिका पार्थ

टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलेलं आहे. मात्र, दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘मुंबई सागा’चं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या या चित्रपटाची दोन पोस्टर्स सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. जॉन अब्राहमच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. कारण, या चित्रपटातून तो बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर येतो आहे, तेही गॅंगस्टरच्या भूमिकेत. एकेकाळचा रोमॅंटिक हिरो इमरान हश्मीदेखील या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

जुलै महिन्याच्या मध्यात रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘मुंबई सागा’चं चित्रीकरण सुरू होणार आहे. संजय गुप्ता यांचा समूह चित्रीकरणासाठी सज्ज असल्याची, जॉन आपल्या टीमसोबत हैदराबादला निघणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटामध्ये जॉन, इमरान यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनीत रॉय, अमोल गुप्ते, असे दिग्गज अभिनेतेदेखील आहेत.

यापूर्वी दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी ‘शूट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘काबिल’, ‘काँटे’, यांसारखे चित्रपट दिलेले आहेत. त्यामध्ये ‘शूट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’ या चित्रपटातून मुंबईतील गुन्हेगारी जगताचं दर्शन त्यांनी घडवलं होतं. रसिकांनी हा चित्रपट आणि त्यातील गाणी डोक्यावर घेतली होती. तसेच जॉन अब्राहमनेही यापूर्वी मन्या सुर्वेची भूमिका दमदारपणे साकारत मुंबईतल्या गुन्हेगारी जगताचे दर्शन घडवले होते. त्यात तो रसिकांना भावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा जॉनला ‘त्या’ लूकमध्ये पाहायची रसिकांना उत्सुकता आहे. ‘मुंबई सागा’ चित्रपटातून १९८० ते १९९० च्या दरम्यानच्या मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाचे दर्शन होणार आहे. तसेच ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’मध्ये झालेले रुपांतर प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या चित्रपटाचे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात चित्रीकरण सुरू झाले होते. पण स्थानिक नेत्यांनी तसेच समाजकंटकांनी निर्माण केलेल्या अडचणींमुळे ते थांबले होते. संजय गुप्ता यांनी त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया ट्विटरवरून नोंदवली होती. आता चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत असून त्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर यांची आहे.