-जय पाटील

करोनाचा कहर संपता संपत नाही आणि टाळेबंदी तर मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतंच चालली आहे. घराबाहेर पडताना मास्क घालणं हे चप्पल-बूट घालण्याएवढंच सवयीचं झालं आहे. येत्या काळात करोनाबरोबर जगताना घराबाहेर पडणं वाढू लागेल आणि मास्क हा आपल्या पोशाखाचाच एक भाग होऊन जाईल. हेच लक्षात घेऊन अनेक कल्पक व्यक्तींनी डिझायनर मास्क तयार करून या टाळेबंदीच्या संकटातही स्वतःसाठी उत्तम संधी शोधली आहे. उत्साही ग्राहकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

आसामध्ये नुकत्याच झालेल्या एका विवाह सोहळ्यातला नखशिखांत सजलेल्या वधूचा फोटो समाजमाध्यमांवर गाजला. त्याला कारण ठरलं तिचा अतिशय आकर्षक मास्क. करोनाकालिन या विवाहसोहळ्यात साथसोवळं पाळण्यासाठी वधूवरांनी डिझायनर मास्क परिधान करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. साथीविषयी कुरबूर करण्याऐवजी त्यांनी या काळातल्या बंधनांतून असा एक सुंदर मार्ग दाखवला. नंदिनी बोरकाकाती यांनी हा मास्क डिझाइन केला होता, तर वधूची मेकअप आर्टिस्ट हिमाद्री गोगोई यांनी त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला होता. त्या व्हिडीओला २० तासांत १.३ दशलक्ष व्ह्यूव्ज मिळाले.

सुचिता या सामाजिक कार्यकर्तीने काही रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि सध्या बेरोजगार झालेल्यांना एकत्र आणून डिझायनर मास्क तयार केले आहेत ४० रुपयांपासून पुढे उपलब्ध असलेल्या या मास्कना तीन पदर आहेत. सर्वांत बाहेरचा पदर सुती, मध्ये फिल्टर आणि आतला मलमलपासून तयार केला आहे. वापरणाऱ्यांसाठी मास्क आरामदायी आणि सुरक्षित असतील याची काळजी घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. बाहेरच्या पदरावर आकर्षक नक्षी आहे.

बंगळुरूतली डिझायनर रश्मी सिंगने देखील काही स्वयं साहाय्यता गटांच्या मदतीने डिझायनर मास्क तयार केले आहेत. पारंपरिक मधुबनी, कलमकारी, चिकनकारी आणि इक्कत कलाकारांकडून हे मास्क तयार करून घेण्यात आले आहेत. आपल्या समृद्ध कलासंस्कृतीची झलक यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोची स्थित सोनाली ठाकूर यांनी लहान मुलांसाठी मासे, प्राणी, पक्षी, फुलं यांच्या नक्षीचे, ड्रॅक्युला, युनिकॉर्नचेही मास्क तयार केले असून ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

अनेक प्रतिथयश ब्रँड्सही साथीतली ही संधी साधण्यासाठी सरसावले आहेत. अँलन सोली, पीटर इंग्लंड, मसाबा, फॅब इंडिया, आदिदास, झोडिअँक शर्ट्स अशा ब्रँड्सनी डिझायनर मास्क उपलब्ध केले आहेत. हे मास्क १०० ते १००० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. यात एक मास्क, दोन मास्कचा कॉम्बो, पाच मास्कचा पॅक असे विविध पर्याय आहेत. झोडिअँकने शर्टचं खास कलेक्शन उपलब्ध करून दिलं आसून त्यात शर्टबरोबर मॅचिंग डिझायनर मास्क मोफत देण्यात आले आहेत. आदिदासने रियुझेबल, रिसायक्लेबल मास्क बाजारात आणले आहेत. सध्या ते युरोप, उत्तर अमेरिका आणि चीनमध्येच उपलब्ध आहेत. त्यांच्या विक्रीतून मिळालेलं उत्पन्न सेव्ह द चिल्ड्रनच्या करोना साहाय्यता निधीला दान केलं जाणार असल्याचं, कंपनीने जाहीर केलं आहे.

परदेशांतही डिझायनर मास्कचं लोण पसरलं असून आपलं व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी प्रतिबिंबित होतील, असे मास्क लोक वापरत आहेत. थोडक्याक करोनाच्या या कठीण काळातही सुंदर जगण्याचा प्रयत्न लोक करू लागले आहेत. मास्क हे नवं स्टाइल स्टेटमेंट ठरू लागलं आहे.