News Flash

डिझायनर मंत्रा : ट्रेण्डसेटर व्हा -सुबर्णा देवेंद्रन

या सदरातील या शेवटच्या लेखात आपण सुबर्णा देवेंद्रन या डिझायनर विषयी जाणून घेणार आहोत..

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

भारतीय फॅशनविश्वाचा परीघ जगभर विस्तारण्यात इथल्या फॅशन डिझायनर्सचा फार मोलाचा वाटा आहे हे आपण वर्षभर या सदरातून पाहतो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला फॅ शनविचार, दृष्टिकोन आणि कलेक्शन यांच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक नामांकित फॅ शन डिझायनर्सना आपण ‘डिझायनर मंत्रा’ या सदरातून भेटलो. फॅशन मांदियाळीतील थोरांशी संवाद साधून त्यांची जडणघडण, त्यांचे विचार, त्यांच्या यशाचा मंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. या सदरातील या शेवटच्या लेखात आपण सुबर्णा देवेंद्रन या डिझायनर विषयी जाणून घेणार आहोत..

लहानपणापासूनच फॅशनची असलेली आवड आणि वडिलांना काही तरी करून दाखवायची जिद्द या दोन्ही गोष्टींचा सांगड घालत केलेल्या प्रयत्नांतून सुबर्णाची फॅशन इंडस्ट्रीतील वाटचाल निश्चित झाली. एकदा या क्षेत्रात उतरल्यावर फॅशन डिझायनर म्हणून सामाजिक भान राखत केलेलं काम तिच्यादृष्टीने महत्त्वाचं ठरलं. त्यामुळेपर्यावरणपूरक फॅशनलोकांपर्यंत पोहोचवायचा ध्यास तिने घेतला आणि त्यासाठीच्या धडपडीतून तिने स्वत:ची फॅशन डिझायनर सुबर्णा देवेंद्रन ही खमकी आणि वेगळी ओळख निर्माण केली.

२०१७ साली ‘सुबर्णा देवेंद्रन कुतूर’ हे स्वत:चं लेबल तिने सुरू केलं. मात्र त्यामागचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता असं ती सांगते. ‘मी अगदी नऊ वर्षांची असल्यापासूनच कपडे, कापड, स्टायलिंग, फॅशन या गोष्टींविषयी माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. आईच्या साडय़ांपासून वेगवेगळे ड्रेस मी स्वत:साठी डिझाइन करायचे. थोडी मोठी झाल्यावर मी माझ्या नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी डिझाइन करू लागले, स्टायलिंग करू लागले. अनेकांना माझ्या डिझाइन्स आवडायच्या. आवर्जून माझ्याबद्दल विचारणाही व्हायची,’ असं सुबर्णा सांगते. आपली लहानपणीची आवड जपत तिने पुढे २०१३ साली ‘इन्स्टिटय़ूट कॅलिगरी मिलानो युनिव्हर्सिटी’मधून पदवी प्राप्त केली. पदवीनंतर तिने ‘सियाराम’, ‘रेमंड’सारख्या मोठय़ा ब्रॅण्ड्ससाठी फ्रीलान्स करून फॅशनइंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात केली. ‘मी ठरवलेलं होतं की मला व्यवसाय करायचा आहे, स्वत:चं लेबल सुरू करायचं आहे, पण व्यवसाय करायचा म्हणजे केवळ डिझायनिंग नाही. त्यात अनेक गोष्टी येतात. त्या समजून घेण्यासाठी मी अनेक डिझायनर्ससाठी फ्रीलान्स डिझायनिंगचं काम केलं, यातून मी व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी शिकले. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आर्थिक बाजूही मला सहज उभी करता आली,’ असं ती सांगते. प्रत्येक उद्योजक किंवा व्यावसायिकाची स्वत:ला पडताळून पाहण्याची एक पद्धत असते. सुबर्णानेही स्वत:चा व्यवसाय सुरू करताना आपण यशस्वी होऊ  की नाही हे तपासण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याबद्दल ती म्हणते, ‘मी साधारण २२ ते २५ कपडय़ांचं कलेक्शन बनवलं. ते माझ्याच घरी डिस्प्ले केलं. घरीच ठेवलेल्या प्रदर्शनासाठी मी माझ्या जवळच्या परिचितांना, नातेवाईकांना बोलावलं. आणि बघता बघता माझं ते पाहिलं कलेक्शन संपूर्णपणे विकलं गेलं. त्याच दिवशी मी माझा व्यवसाय करू शकते यावर ठाम झाले आणि त्या दिशेने कामाला लागले’.

पुढे छोटय़ा-छोटय़ा गॅलरीमध्ये, प्रदर्शनांमध्ये तिने तिचं कलेक्शन दाखवायला सुरुवात केली. संपूर्ण देशभर ग्राहकांशी ओळख क रून संपर्क वाढवणं आणि तिच्या ब्रॅण्डला खरा भारतीय ‘कुतूर’ लेबल म्हणून लोकांनी ओळखावं हेच तिचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने ती काम करते आहे. यासाठी तिला तिच्या ओळखीतील अनेक नवीन-जुने लोक मदत करत आहेत. ‘मी जेव्हा शिकता शिकता ऑर्डर्स घ्यायचे तेव्हा मी डिझाइन केलेले कपडे एका मास्टरकडून शिवून घ्यायचे. त्यांचं काम फार उत्तम होतं. म्हणूनच मी जेव्हा माझं लेबल सुरू केलं तेव्हा मी त्यांना माझ्या लेबलमध्ये हेडमास्टर म्हणून घेतलं. जसं माझ्या मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी, कुटुंबाने मदत केली तशीच अनेक लोकांनी मला माझ्या या कामात मदत केली आहे आणि आजही ते मदत करत आहेत,’ असं ती नम्रतेने सांगते. पर्यावरणपूरक ब्रॅण्ड अशीही तिच्या लेबलची ओळख आहे. त्याबद्दल बोलताना ती सांगते, ‘आमच्या लेबलअंतर्गत आम्ही पर्यावरणपूरक डिझाइन्स असतील असा प्रयत्न करतो. शिवाय, रीयूज कपडे, त्याचबरोबरीने मल्टीयूज कपडे डिझाइन करणे हा तर आमच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही एकाच ड्रेसचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापर करता येईल तेही समजावून सांगतो.’ त्यांना कोणता ड्रेस नको असेल तर आम्ही त्या ड्रेसमध्ये स्वत:च नवीन काही डिझाइन करून तयार करून देतो, असं ती सांगते. रीयूज किंवा मल्टीयूज कपडय़ांची ही कल्पना डोक्यात कशी आली, याबद्दलही सुबर्णा विस्ताराने सांगते. आपल्याकडे अनेकदा हेवी कपडे काही काळानंतर अजिबात वापरले जात नाहीत. ते कपडे असेच पडून राहतात किंवा मग कंटाळून ते टाकून दिले जातात. असे कपडे आम्ही घेतो आणि रीयूज करतो, असं ती सांगते.

तिच्या कलेक्शनची आणखी एक खासियत म्हणजे भारतीय पारंपरिक कपडय़ांना दिलेला वेस्टर्न ट्विस्ट.. पारंपरिक कपडय़ांचे आपल्याला अतोनात वेड आहे. त्यामुळे कपडय़ांतून पारंपरिकता जपताना त्याला आधुनिकतेचा नवा साज चढवणं यासारखा दुसरा आनंद नाही, असं ती म्हणते. आपल्या ग्राहकांसाठी अनोखे फ्युजन कलेक्शन तयार करण्यासाठी वेस्टर्न आऊटफिट्समध्ये पारंपरिक शैली मिक्स करणे हा प्रकार आपल्याला आवडतो, असं सुबर्णा सांगते. आपल्या कलेक्शन्स, डिझाइन्समागची प्रेरणाही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, प्रसंग यातूनच मिळत असल्याचेही तिने सांगितले. ‘सिंदुरी’ हे तिचं आताचं अगदी नवीन कलेक्शन आहे. हे कलेक्शनसुद्धा पेंटिंगवरून प्रेरित झालेलं आहे, असं तिने स्पष्ट के लं. प्रत्येक प्रवासामध्ये कधीही न विसरता येणारा असा एक क्षण असतो. असाच सुबर्णाच्या प्रवासातही आहे. ‘मी जेव्हा माझं पहिलं कलेक्शन सोल्ड आऊट करण्यात यशस्वी झाले तेव्हा माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांना माझा आणि माझ्या कामाचा खूप अभिमान वाटला. त्यांचा तो आनंदी चेहरा आणि माझ्या आयुष्यात कोरला गेलेला हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही,’ असं ती सांगते. या क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्या तरुण डिझायनर्सना ती आवर्जून सांगते की, ‘ट्रेण्ड्सच्या पाठी धावू नका, तर स्वत: ट्रेण्ड सेटर व्हा’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 4:02 am

Web Title: be a trendsetter says subarna devendran abn 97
Next Stories
1 अभिजात संगीत चिरंतनच!
2 आजा नचले!
3 क्षण एक पुरे! : कलाकारापलीकडचा ललित
Just Now!
X