गायत्री हसबनीस

‘आपली’(APLI) या अ‍ॅपद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य कंपन्यांपर्यंत नोकरीसाठी पोहोचवण्यास मदत करणाऱ्या शिवमने मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. ‘ग्लोबल आंत्रप्रिनरशिप बूटकॅम्प’, इंडोनेशिया २०१८ या स्पर्धेचा तो विजेता आहे. ‘आयआयटी मुंबई’मधून ‘आंत्रप्रिनरशिप’ या विषयातील शिक्षण घेत २०१८ साली शिवमने ‘आपली’ हे अ‍ॅप सुरू केले. आत्तापर्यंत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपला भेट दिली असून करोनासारख्या आपत्तीच्या काळात कॅम्पस प्लेसमेन्ट शक्य नसताना डिजिटली व्हिडीओ इंटरव्ह्य़ूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारे हे अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरले आहे.

टाळेबंदी झाल्याने महाविद्यालये बंद, नोकरी-व्यवसाय बंद.. अशा नकारघंटा पचवणाऱ्या तरुणांसाठी या काळातही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त त्या संधींपर्यंत तुम्ही कसे पोहोचाल? याचे मार्गदर्शन आवश्यक असते. एखाद्या नोकरीसाठी अर्ज करताना तुमचा रेझ्युमे कसा असावा इथपासून ते तुम्हाला डिजिटल माध्यमातून कॅम्पस प्लेसमेन्टप्रमाणेच नोकरीच्या संधींपर्यंत पोहोचविण्यापर्यंतची सगळे चोख मार्गदर्शन करणारे ‘आपली’ हे नवे अ‍ॅप शिवम तिवारी या तरुणाने विकसित के ले आहे. या अ‍ॅपचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेला शिवम तरुणांना सध्या चिंता करत बसण्यापेक्षा डिजिटल कॅ म्पस प्लेसमेन्टसाठी कशी तयारी करता येईल यावर भर द्या, असे आवाहन करतो आहे. ‘एक तर महाविद्यालये आणि कंपन्या यांच्यामध्ये पुष्कळ व्यावहारिक अंतर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपन्यांना नक्की कोणत्या स्किलसेटची गरज आहे याची चाचपणी करताना विद्यार्थी कमी पडतात किंबहुना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे नोकरी मिळवताना नेमके  कोणत्या प्रकारच्या कामासाठी आणि कशापद्धतीने अर्ज करावेत, याबद्दल तरुणाई अनभिज्ञ असते,’ असं शिवम सांगतो. योग्य नोकरीच्या संधी आणि योग्य उमेदवार यांच्यात असलेली गॅप माझ्या आधीच लक्षात आली होती. त्यामुळे के वळ विद्यार्थ्यांना नोकरीसंदर्भात जागरूक करणे एवढाच उद्देश नव्हता, तर जेव्हा कंपन्या नोकरीसाठी भरती करतात तेव्हा त्या बऱ्याचदा महाविद्यालयांशी संपर्कात नसतात. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेन्टसाठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसते. या दोघांमधील हे अंतर कमी करण्याच्या दृष्टीने आपली हे अ‍ॅप विकसित करण्यात आले,’ असं शिवम सांगतो.

करोना काळात तर हे अ‍ॅप वरदान ठरतं आहे, असं तो सांगतो. एक तर महाविद्यालये बंद असल्याने कॅम्पस प्लेसमेंटसाठी कंपन्यांचे अधिकारी प्रत्यक्ष कॅम्पसमध्ये जाऊ शकत नाहीत, मात्र अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे भरती करायची आहे. अशा कंपन्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डिजिटली जोडण्याचं काम या अ‍ॅपच्या माध्यमातून करत असल्याचं तो सांगतो. आज सर्वात जास्त प्रमाणात कोणत्या कंपन्या रिक्रूटमेंट करतायेत याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणं आवश्यक आहे आणि सध्याच्या करोनाच्या काळात हीच माहिती उपलब्ध नसल्याने नोकऱ्या नाहीत असा विद्यार्थ्यांचा समज होणं साहजिक आहे, असं तो सांगतो.  ‘मी अ‍ॅप सुरू करण्यापूर्वी कंपन्यांकडे गेलो तेव्हा त्यांना कुठल्याही ऑनलाइन अधिकृत रिक्रूटमेंट संस्थांशी जोडून घ्यायची इच्छा नाही हे माझ्या लक्षात आलं, कारण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अशा संस्थांमध्ये नसतो असा कंपन्यांचा अनुभव आहे. तेव्हा या कं पन्यांना अधिकृतपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आणणं हे माझ्यासमोरचं पहिलं आव्हान होतं. हळूहळू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डिजिटल कॅ म्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग वाढवत हे आव्हान मी पेललं. आता कं पन्याही या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत,’ असा आपल्या कार्याचा अनुभव शिवमने कथन के ला.

विशेषत: करोनाच्या काळात कॅम्पस प्लेसमेंटच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन स्वरूपात काय फरक आहे व ऑनलाइन प्लेसमेंट्सचा फायदा कसा होतो, याबद्दल शिवम सांगतो, ‘विद्यार्थी कधीही त्यांच्या फोनवरून निवडलेल्या कंपनीकरता मुलाखती देऊ शकतात. उदाहरणार्थ, आम्ही विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ इंटरव्ह्य़ूचा मार्ग खुला केला आहे. यातून एच.आर. अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या स्किलसेट्स आणि प्रोफेशनल प्रोफाइलबद्दल जास्त माहिती घेता येते.  महाविद्यालयांना कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळेस भरपूर मुलाखती देणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेझ्यूमे मॅन्युअली चेक करावे लागतात व तसं  विद्यार्थ्यांना अपडेट करावं लागतं. म्हणजे मुलाखत झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या रेझ्यूमेचा, त्यांना नोकरीसाठी कंपनीकडून येणाऱ्या कॉलचा आणि नोकरी पक्की झाल्यानंतर कंपनीकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ऑफर लेटर या सगळ्याचा पाठपुरावा करावा लागतो. मात्र ऑनलाइन माध्यमातून आम्ही ही सगळी प्रक्रिया ऑटोमेटेड केली आहे. डेटा अ‍ॅनालिसिसच्या साहाय्याने आम्हाला योग्य रीतीने महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना कंपनीपर्यंत आणि कंपनीला विद्यार्थ्यांपर्यंत आणता आलं आहे.’  कंपनीला अ‍ॅपच्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आधारित मॉडेलमुळे अर्जदारांविषयी उपलब्ध माहितीच्या आधारे अचूक निर्णय घेण्यास मदत झाली असल्याचेही त्याने सांगितले. ‘आपली’ या अ‍ॅपद्वारे शिवम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो कुठेही शुल्क आकारत नाही तर बाहेर ‘कन्सल्टन्सी’च्या नावाखाली शुल्क आकारले जाते. हाच डिजिटल व्यवहारातला आणि प्रत्यक्ष व्यवहारातला आजचा फरक आहे, असं तो स्पष्ट करतो.  डिजिटली भरपूर माहितीचा पसारा असला तरी योग्य आणि अचूक माहितीपर्यंत पोहोचवणारे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे, त्याउलट ऑफलाइन पारंपरिक पद्धतीने माहिती मिळवून नोकरीच्या संधीपर्यंत पोहोचताना वेळ, श्रम सगळ्याचीच कसोटी लागते, असं तो म्हणतो. कमीतकमी कालावधीत भरती करू इच्छिणारी कं पनी आणि त्यासाठी योग्य ठरतील असे महाविद्यालयीन उमेदवार यांना एकमेकांच्या संपर्कात आणणं हे या अ‍ॅपचं महत्त्वाचं काम असल्याचं शिवम सांगतो. याचा फायदा नुकताच आयआयटी मुंबईत बी.टेक करणाऱ्या एका विद्यार्थ्यांला घसघशीत मानधनासह नोकरीची संधी मिळण्यात झाल्याचेही त्याने सांगितले.

या वर्षी जानेवारी महिन्यातच शिवमसह त्याच्या सहकाऱ्यांनी डिजिटली कॅम्पस प्लेसमेंट्स पार पाडली.  या दरम्यान त्यांनी तीन आठवडय़ांत ७० महाविद्यालयांपर्यंत पोहोचत डिजिटल कॅम्पस प्लेसमेंटमधून कंपन्यांपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचण्याचा टप्पा पार केला.  कोविड—१९ नंतर त्याने मुंबई विद्यापीठ व आयआयटी मुंबईतून डिजिटल कॅम्पस प्लेसमेंट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय, पुढच्या सहा महिन्यांत तो इतर शहरांनाही यात जोडून घेण्याच्या प्रयत्नात असून लवकरच पुण्यातही डिजिटल प्लेसमेंट सुरू करणार असल्याची माहिती त्याने दिली.

करोनाच्या या कठीण काळातही इंटरनेटचा योग्य आणि प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीपर्यंत आणण्याचा शिवम तिवारीचा हा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. ‘विद्यार्थ्यांनी सध्याच्या काळात नोकरी हवी म्हणून डोळे बंद करून कोणत्याही कं पनीत अर्ज करू नये. त्यांनी ब्रॅण्ड, पॅकेज आणि काम याची व्यवस्थित माहिती करून घेण्याची तयारी ठेवावी. इंटरनेटच्या माध्यमातूनही ते योग्य माहिती काढू शकतात पण त्यांनी आपल्या करिअरसाठी अनुरूप ठरेल अशा नोकरीच्या शोधात राहावे,’  असा सल्लाही शिवम तरुणाईला देतो. शिवमची ही ‘आपली’ गोष्ट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल अशी आहे.

‘फ्रेशर्स’ना मागणी

सध्याच्या काळात १२-१८ लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळणं अवघड आहे, तर सामान्य पॅकेजची नोकरी मिळणं सोप्पं आहे. सध्या सर्वात जास्त मागणी ही फ्रेशर्सना आहे, असं शिवम सांगतो. याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे  फ्रेशरच्या कामाची जबाबदारी ही प्राथमिक असते आणि दुसरं फ्रे शर्स खूप लवकर काम आत्मसात करतात जे कं पनीसाठी फायदेशीर ठरते. सध्या टाळेबंदीच्या काळात बऱ्यापैकी इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट वर्क विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. करोनाच्या काळात मार्केटमध्ये नोकऱ्यांच्या बाबतीत उदासीनता आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. संधी आहेत त्याकडे लक्ष द्या, असं शिवम पुन:पुन्हा सांगतो.

viva@expressindia.com