27 January 2021

News Flash

बदलाचा ‘सिग्नल’

आपली खासगी माहिती सुरक्षित राहिली पाहिजे याबद्दल तरुणाई आता थोडी जागरूक होताना दिसते आहे.

तुलाही ते व्हॉट्सअ‍ॅपचं नोटिफिकेशन आलं का रे? हो रे मी नेहमीप्रमाणे ‘ओके’ क्लिक करून पुढे गेलो एवढं कोण वाचत बसणार यार?, असं म्हणत त्याने मित्राने विचारलेला प्रश्न अगदी नोटिफिकेशनसाखाच उडवून लावला. मग नंतर तो मित्र मात्र याला अगदी प्रायव्हसी, एन्क्रिप्टेड, मेटाडेटा असले भारीभारी शब्द फेकून मारू लागला. यामुळे विषय कळण्याऐवजी त्याला आपण केलं ते बरोबर केलं की चूक असं वाटू लागलं. अर्थात आपल्यापैकी काहीजणांचं असं झालंच असणार. आपल्यापैकी अनेकांनी ‘सिग्नल’चं नावही ऐकलं असणार. मात्र खरोखरच व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अटी एवढय़ा गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत का?, आपण कधीच न शेअर केलेला डेटा शेअर करणार आहोत का?, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले असणार. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा स्वप्नील जोशी या संदर्भात बोलताना आपण उगाच व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या धोरणांचा बाऊ केला आहे, असं सांगतो. सर्वप्रथम जी माहिती शेअर होणार आहे त्यामध्ये एका युजरने दुसऱ्या युजरला केलेल्या थेट (डायरेक्ट) मेसेजेसचा समावेश नसेल. म्हणजेच एका युजरने दुसऱ्या युजरला केलेला मेसेज हा त्याला डिलिव्हर झाला (सामान्य भाषेत तुम्हाला डबल टिक दिसलं) की तो मेसेज व्हॉट्सअ‍ॅपच्या सव्‍‌र्हरवर स्टोअर होत नाही. म्हणजे जोपर्यंत मेसेज डिलिव्हर झालेला नाही तोपर्यंतच (जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतच) व्हॉट्सअ‍ॅप सव्‍‌र्हरवर एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये (सोप्या शब्दात सांगायचं तर ‘च’च्या भाषेत) स्टोअर केलेला असेल. थोडक्यात कोणताही पर्सनल मेसेज दोन वापरकर्त्यांमध्येच एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये राहिल आणि व्हॉट्सअ‍ॅप त्यावर काहीही प्रक्रिया करू शकत नाही हे खुद्द व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलंय, असं स्वप्निल सांगतो. मात्र त्याचवेळी आपण जो चॅट बॅकअप घेत आलोय तो ज्या थर्डपार्टी सव्‍‌र्हरवर स्टोअर केला जातो, जसं की ‘गुगल क्लाउड’ अथवा ‘आय क्लाउड’ ह्युमन रिडेबल फॉर्ममध्ये असून त्याला व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसी लागू होत नाही. याचाच अर्थ आपण बहुतांश वापरकर्त्यांनी यापूर्वीच आपला डेटा थर्ड पार्टी कंपनीजना उघडपणे दिला आहे, म्हणजे या माहितीचे हस्तांतरण आपण आपल्याच परवानगीने नकळतपणे करतो आहोत. सायबर तपास करताना व्हॉट्सअ‍ॅपच्या संभाषणाचे युजरने नष्ट केलेले संदेश या बॅकअप मार्फतच बहुतेक वेळा मिळवले जातात. अगदी नजीकच्या काळात घडलेल्या तपासातसुद्धा याच तंत्राचा वापर केला गेला आहे.

सामान्यपणे व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर आपल्याकडून आपला डिव्हाईस, मोबाईल नंबर, आयएमईआय नंबर, बॅटरी स्टेटस, नेटवर्क स्टेटस, ब्राऊजर बद्दलची माहिती, ऑपरेटिंग सिस्टीम आणि अ‍ॅप्लिकेशन व्हर्जन याबद्दलची माहिती गोळा करून, स्टोअर करून म्हणजेच सव्‍‌र्हरवर साठवून ठेवली जाते. बरं हे फक्त व्हॉट्सअ‍ॅपच करतं असं नाही. अनेक अ‍ॅप्लिकेशन अशाप्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अ‍ॅक्सेस आपल्या सेवा शर्तींअंतर्गत घेत असतात. व्हॉट्सअ‍ॅप आपल्याकडून आपले लाईव्ह लोकेशन तसेच जेनेरिक लोकेशन कॅप्चर करून ते स्टोअर करून ठेवते, तसेच त्याचा वापर ते कशासाठी करणार हे अजून तितकेसे स्पष्ट केले नाही. बहुतांश अप्लिकेशन लोकेशन स्टोअर करतातच; ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास करोना काळात बहुसंख्य ठिकाणी बंधनकारक असणारे ‘आरोग्यसेतू’ हे अ‍ॅप्लिकेशन लाईव्ह लोकेशन गोळा करते. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण रजिस्ट्रेशन केल्यावर आपले स्टेटस, रजिस्ट्रेशनची माहिती, तसेच आपण अ‍ॅप्लिकेशनवर घालवत असलेला वेळ (फुकट आणि प्रोडक्टिव्ह दोन्ही) याबद्दलची माहिती व्हॉट्सअ‍ॅप गोळा करून फेसबुक आणि इतर ग्रुप कंपनीजबरोबर शेअर करू शकते. नव्या बदलांनुसार आपले फेसबुक अकाउंट नसेल तरीदेखील फोन नंबर तसेच इतर माहिती शेअर केली जाईल इतकाच काय तो फरक. जाहिरातींबद्दल बोलायचं झालं तर अजूनही व्हॉट्सअ‍ॅपवर  जाहिराती दिसणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. परंतु भविष्यात जाहिराती दाखवल्या जाणार असतील तर त्याबद्दल पॉलिसी अपडेट केली जाईल याचाच अर्थ इतर अ‍ॅप्लिकेशनप्रमाणे भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. बिझनेस अकाउंट बद्दल बोलायचे झाल्यास ज्या बिझनेस अकाउंटच्या संपर्कात आपण आहोत, त्याच्याशी संबंधित थर्ड पार्टी सव्‍‌र्हिसेसबरोबर आपली माहिती शेअर होऊ शकते. परंतु यात कोणत्याही खाजगी मेसेजेस किंवा संपर्क यादीचा समावेश नसणार आहे.

बरं आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सध्या तरी काही मोठा फरक पडणार नसला तरी याचा फायदा ‘सिग्नल’ सारख्या इतर अ‍ॅपला झाल्याचं चित्र दिसतं आहे. चार जानेवारीपर्यंत चर्चेतही नसणारं ‘सिग्नल’ हे अ‍ॅप भारताबरोबरच जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलॅण्ड, हाँगकाँग आणि स्वित्झर्लण्डसारख्या देशांमध्येही सर्वाधिक डाऊनलोड झालेलं अ‍ॅप ठरलं. इतकंच नाही तर अनेकजण या अ‍ॅपला पाठिंबा देताना दिसत आहेत. यामध्ये अगदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या इलॉन मस्क यांच्याबरोबरच ‘पेटीएम’चे सीईओ विजय शेखर शर्मा आणि अगदी आनंद महिंद्रांचाही समावेश आहे. ‘सिग्नल’ व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत कमी माहिती गोळा करते. त्याखेरीज त्यात स्क्रीन सिक्युरिटी (अ‍ॅप्लिकेशनचा स्क्रिनशॉट घेण्यापासून रोखणे), इनकॉग्निटो कीबोर्ड, रिले कॉल (याद्वारे आपला आयपी अ‍ॅड्रेस आपल्याला संपर्क साधतांना प्रायव्हेट ठेवता येतो) हे काही चांगले सेटिंग्जचे पर्याय आहेत. याच फीचर्समुळे सध्या हे अ‍ॅप प्रयोग म्हणून वापरून पाहण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

‘सिग्नल’ हे अ‍ॅप काही तरूण ‘वापरून पाहू’ म्हणत डाऊनलोड करत आहेत, तर काहींनी अधिक सुरक्षित असल्याचं वाटल्याने हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप मात्र डिलीट केलेलं नाही. ‘मला सिग्नल हे अ‍ॅप ट्रेण्डमध्ये असल्याचं ठाऊक नव्हतं, पण हे जास्त सुरक्षित असल्याचं समजल्याने मी ते डाऊनलोड केलं आहे’, असं विद्यार्थिनी असणारी किर्ती चिपळूणकर सांगते. तसेच कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना मी सरसकट साऱ्या गोष्टींना परवानगी देत नाही, असंही तिने सांगितलं, तर मीत पगारिया मात्र सिग्नल ट्रेण्डिंगमध्ये असण्याबरोबरच इंटरफेस, युझर एक्सपिरियन्स आणि माहितीची सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून अ‍ॅप डाऊनलोड केल्याचं सांगतो.

व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या तरुणाईसाठी जीव की प्रमाण आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे सिग्नलशी इमोशन म्हणजेच भावनिक बॉण्डिंग होईल की नाही यासंदर्भात तरुणाईमध्ये मतमतांतरे असली तरी ते आशावादी नक्कीच आहेत. विद्यार्थी असणाऱ्या वेदश्री कुलकर्णीला व्हॉट्सअ‍ॅपसारखंच सिग्नल अ‍ॅपही आपलंसं वाटू शकतं, फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असं वाटतं. तर ईशान कुलकर्णी मात्र व्हॉट्सअ‍ॅप हे व्हॉट्सअ‍ॅप आहे त्याच्याशी ज्या पद्धतीने आपण भावनिकदृष्टय़ा जोडले गेलो आहोत, तसं इतर अ‍ॅपसोबत शक्य नाही असं सांगतो. हे सर्व तरुण सध्या सिग्नल अ‍ॅप वापरत असून त्यामधून आलेल्या अनुभवामधूनच त्यांनी ही मतं मांडली आहेत. तरुणाईबरोबरच मध्यमवयीन वयातील वापरकर्त्यांंनाही व्हॉट्सअ‍ॅपशी असणारं नातं खास वाटतं. मानसी कुलकर्णी या व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे इतर अ‍ॅप वापरता येणं आणि स्वीकारणं आता सर्वाना थोडं कठीण जाईल असं सांगतात. तर दुसरीकडे पुण्यामध्ये व्यावसायिक असणारे मिलिंद फडके मात्र ज्याप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप आपण स्वीकारलं तसं काळानुसार सिग्नल या स्पर्धेत टिकून राहिलं तर त्याला आपण स्वीकारू असं सांगतात.

या चर्चेदरम्यान तरुणाईशी बोलताना जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ ट्रेण्डमधून एखादं अ‍ॅप डाऊनलोड करण्याऐवजी त्याबद्दलची माहिती वाचून तुलना करून ते डाऊनलोड करावं की नाही याचा निर्णय घेण्याला प्राधान्य दिलं जातं आहे. इतर अॅप्सही डाउनलोड करताना आम्ही त्यामधील महत्त्वाच्या अटी नजरेखालून घालतो, असंही तरुण मंडळी सांगतात. आपली खासगी माहिती सुरक्षित राहिली पाहिजे याबद्दल तरुणाई आता थोडी जागरूक होताना दिसते आहे. त्यामुळेच अनेकांनी आम्ही अ‍ॅप डाउनलोड केलं तरी त्याला सरसकट परवानगी देत नाही. काही अ‍ॅपला फोटोंची परवानगी नाकारतो, तर काही अ‍ॅपला लोकेशन ऑफ ठेवतो असं अनेकांनी आवर्जून सांगितलं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसीचा उगच बुडबुडा केला आहे असा जो दावा केला जातोय तो तरुणांशी प्रायव्हसी आणि सध्या वापरत असलेल्या अ‍ॅपसंदर्भात चर्चा केल्यास फोल ठरत असल्याचं दिसतं. कारण सध्या तरुण पिढी आपली माहिती कुठे आणि कशासाठी वापरली जातेय याबद्दल अधिक जागरूक झाली आहे. हे इंटरनेटवरील माहितीमुळे असेल किंवा इतर कारणांना घडणारा बदल हा खरंच स्वागतार्ह आहे. या प्रकरणामुळे प्रायव्हसीसंदर्भात तरुण किती जागरूक आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून ते स्वत:च्या सायबर सुरक्षेबद्दल अधिक सजग आणि सतर्क होत आहेत हेही स्पष्टपणे जाणवल्याशिवाय राहत नाही.

* व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून चर्चेत असणारी अ‍ॅप – टेलिग्राम, सिग्नल

* टर्कीसारख्या देशाने सरकारी कामासाठी यापुढे व्हॉट्सअ‍ॅप न वापरण्याचा निर्णय जाहीर केलाय.

* सिग्नलच्या निर्मात्यांपैकी एक असणारा ब्रायन अ‍ॅक्टॉन हा व्हॉट्सअ‍ॅपचा सहनिर्माता आहे.

* सिग्नल सर्वाधिक सुरक्षित असल्याचं अनेक सायबरतज्ज्ञ सांगतात, कारण त्यामधील मेटाडेटा (मूळ माहिती) एन्क्रिप्टेड असतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:19 am

Web Title: whatsapp privacy update telegram signal app alternative to whatsapp zws 70
Next Stories
1 नवं दशक नव्या वाटा : अशक्य बर्गर
2 वस्त्रप्रथा : वस्त्रांवेषी
3 कृष्णरंगातली फॅशन
Just Now!
X