देखा तो सब के सर पे गुनाहों का बोझ था
ख़ुश थे तमाम नेकियाँ दरिया में डाल कर – मोहम्मद अल्वी
स्पॉटिफायवर प्रसारित होणाऱ्या ‘झीरो झीरो साथ’ या कंटेंटवाला निर्मित पॉडकास्टमध्ये १२ ते १५ मिनिटांच्या भागात एक कथा सांगितली जाते. ही कथा देशातील नामवंत राजकारणी अचानक बेपत्ता होतात या विषयावर आधारित आहे. या पॉडकास्टच्या प्रत्येक भागात ही कथा विविध अंगाने फुलवत सांगितली आहे. अमित उपाध्याय लिखित या पॉडकास्टमध्ये अभिलाष, शिवानी बेदी, वीरेंद्र सक्सेना असे अनेक प्रसिद्ध आरजे या कथेतील वेगवेगळी पात्रे साकारत गोष्ट सांगतात. बेपत्ता झालेल्या राजकारण्यांच्या बँक खात्यात एक मोठी रक्कम जमा होते आणि त्यानंतर तीन दिवसांनी हे राजकारणी बेपत्ता होतात. काही गुप्तहेर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा या राजकारण्यांचे अनेक भ्रष्टाचार बाहेर येऊ लागतात. कोणती भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतात आणि नक्की का हे राजकारणी बेपत्ता होतात हे या पॉडकास्टमध्ये रंजक पद्धतीने मांडले आहे. या कथेच्या शेवटी आरजे ‘देखा तो सब के सर पे गुनाहों का बोझ था और वो ख़ुश भी थे तमाम नेकियाँ दरिया में डाल कर’ ही मोहम्मद अल्वी यांची शायरी ऐकवून भाग संपवतो.
सस्पेन्स थ्रिलर कथा मला फक्त चित्रपटात बघायला आवडतात, पण माझ्या मैत्रिणीने पहिल्यांदा ‘झीरो झीरो साथ’ हा पॉडकास्ट ऐकवला. हा पॉडकास्ट ऐकताना घडणारी गोष्ट अगदी सहज डोळय़ासमोर येते. ही कथा मुंबई शहरामध्ये घडताना दाखवली आहे. त्यामुळे या पॉडकास्टमध्ये राजकारण, मुंबई शहर आणि गुप्तहेर या विषयांचा सखोल अभ्यास केलेला आहे हे हा पॉडकास्ट ऐकताना जाणवते. अशा अनेक कथा असतात ज्या सत्य घटनेवरून प्रेरित असतात, पण अनेक वेळा आपल्याला त्याबद्दल कल्पना नसते. ही कथा जरी काल्पनिक असली तरी यासाठीचा केलेला अभ्यास या कथेला वास्तववादी बनवतो. – रुचिरा खोत
शब्दांकन: श्रुती कदम
viva@expressindia.com