वेदवती चिपळूणकर

आजकाल तरुणाईची भाषा ही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलत असते. प्रत्येक सोशल मीडियाच्या प्रत्येक फीचरवरून काही नवीन शब्दांची भाषेत भर पडत असते. इन्स्टाग्रामवर टाकल्या जाणाऱ्या स्टोरीजमध्ये वेगवेगळ्या शब्दांचे किंवा इमोटिकॉन्सचे स्टिकर्स वापरता येतात. यातले काही स्टिकर्स आठवडय़ाच्या वाराप्रमाणे महिना, वेळ, तापमान, ऋतू, सण अशा गोष्टींनुसार सतत बदलत राहणारे असतात तर काही स्टिकर्स कायमस्वरूपी उपलब्ध असतात. यातूनच अनेकदा काही शब्द वापरण्याचा ट्रेंड तयार झालेला दिसून येतो. या ट्रेंडमधलाच ‘सॅवेज’ हा शब्द जो आपला धडाकेबाज अ‍ॅटिटय़ूड दाखवण्यासाठी वापरला जातो. नाम, क्रियापद आणि विशेषण या तिन्ही प्रकारांत मोडणारा हा शब्द आजकाल ट्रेंडमध्ये आला तो जणू तरुणाईच्या अंगातलं उसळतं रक्त दाखवायलाच!

तरुण या संकल्पनेतील ऊर्जेचं वर्णन करणारा ‘सॅवेज’ हा शब्द. आक्रमक आणि अनावर होऊ  शकणारा स्वभाव किंवा काही प्रमाणात त्याच्याही पुढे जाऊन जंगली प्राण्यांसारखी वागण्याची पद्धत आणि चार लोकांत वावरण्याचं अजिबात भान नसलेल्या वागण्याला ‘सॅवेज’ हे विशेषण लावलं जातं. हाच शब्द जेव्हा नाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ हा अगदी आदिमानव, जंगलात राहणारा समाजभान नसलेला मानव, असा होतो. हिंसक हल्ला करण्याला ‘सॅवेज’ हे क्रियापद म्हणून वापरलं जातं. मग हा शब्द तरुणाईने नक्की कोणत्या संदर्भाने स्वत:शी जोडला असावा?

समाजाचे सगळे कायदेकानू झुगारून देऊन आपल्या मनासारखं वागण्याची तरुणाईची प्रवृती प्रत्येकच पिढीत दिसून येते. ही तरुण पिढीदेखील त्याला अपवाद नाही. समाज काय म्हणेल त्याचा विचार करून आम्ही आमचं आयुष्य का आखायचं, असा साधा प्रश्न तरुणाई विचारते. ‘माय लाइफ, माय रुल्स’ या तत्त्वाला फॉलो करणाऱ्या तरुणाईला समाजाचे नियम, रीतिरिवाज, पद्धती, आचारविचार या सगळ्यांमध्ये कोणताही रस नाही आणि या सगळ्याचं ओझं घ्यायचं नाही असं तरुणाईचं मत आहे. आपल्या मनाप्रमाणे जगण्याच्या इच्छेचं वर्णन करण्यासाठी ‘सॅवेज’ हा शब्द योग्य आणि चपखल वाटतो. या ‘सॅवेज’ला जंगली किंवा रानटी म्हणून न पाहता तरुणाई जगण्याचा ‘धडाकेबाज’ अ‍ॅटिटय़ूड म्हणून पाहते. त्यामुळे ‘स्टीरिओटाइप्स’ न मानता एखादी गोष्ट केली की त्याच्या फोटोवर ‘सॅवेज’चा स्टिकर लावून तरुणाई सोशल मीडियावर हा धडाकेबाज बाणा कौतुकाने मिरवताना दिसते.

viva@expressindia.com