कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी पावसाचा रात्री चांगलाच जोर राहताना दिवसा मात्र, बऱ्यापैकी पावसाची उघडीप कायम आहे. गेल्या पाच-सहा दिवसात कोसळलेल्या समाधानकारक पावसामुळे कोयना जलाशय ४० टक्क्यांवर भरले असून, धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे.
गेल्या २४ तासात कोयना धरणाच्या जलपातळीत २ फूट २ इंचाने, तर पाणीसाठय़ात सुमारे २ टीएमसीने वाढ झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजता कोयना धरणाची जलपातळी २ हजार ९७ फूट १० इंच राहताना पाणीसाठा ४२.३७ टीएमसी म्हणजे ४०.२५ टक्के आहे. पैकी ३७.१२ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. १ जूनपासून धरणात सुमारे १२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.  सध्या ३० हजार ६९९ क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात होत आहे. दरम्यान, संततधारेमुळे धरणाखालील पाटण व कराड  तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयना धरण क्षेत्रात सरासरी ११७.५ एकूण ११०६, पाटण तालुक्यात ४०.५८ एकूण ३४९.५८ तर, कराड तालुक्यात १४.६५ एकूण १४८.४२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील महाबळेश्वर विभागात सर्वाधिक ५३ एकूण १२०८, नवजा विभागात ५२ एकूण १०७८, कोयनानगर विभागात ३३, एकूण ९९८ तर प्रतापगड विभागात ५१ एकूण ११४० मि. मी. पाऊस होताना दिवसभरातील सरासरी पावसाची नोंद ४७.२५ मि. मी. झाली आहे. एकंदर पावसात कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर विभागात १२०८ मि. मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक ४०३ मि. मी. तर तारळे विभागात सर्वात कमी १२० मि. मी. एकंदर पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक २१७.१० तर, शेणोली मंडलात सर्वात कमी ११५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना सर्वत्र पावसाची रिपरिप राहिल्याने जनजीवन विस्कळीत राहिल्याचे वृत्त आहे.