रस्त्यावरील खड्डे आणि नियमांबाबतची अपुरी जनजागृती
क्षुल्लक बाबींकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडल्याचे अनेकदा उघड झाले आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे, हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या एकूण अपघातांपैकी मद्यप्राशनामुळे २७, वेगात वाहन चालविण्याने ७१२, रस्त्याच्या मध्यभादातून वाहन चालविण्याने एक अपघात घडला. इतर कारणांनी ५२५ अपघात घडले. मद्यप्राशन हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. पोलिसांनी ड्रंकेन ड्राईव्ह सुरू केले असले तरी नागरिकांवर त्याचा थोडासाही परिणाम झालेला नाही. मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्यांचा नाहक बळी गेल्याचीही उदाहरणे आहेत. गेल्याच महिन्यात अमरावती मार्गावरील फुटाळा चौकात असाच अपघात झाला. त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टहा टपरीवरील आई-मुलगा व ग्राहक जखमी झाले.   रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अपघात घडतात. हे खरे असले तरी रस्त्यांवर खड्डे असू शकतात, हे गृहित धरून वाहन चालविल्यास बरेचदा अपघात टाळताही येतील.
वेगात वाहन चालवण्याने अपघात होतात. वाहतूक नियमांचे पालन न करणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांची संख्या अतिशय अल्प आहे. बहुतांशी सायकलस्वार, दुचाकी स्वार, रिक्षा चालक, कार चालक, ट्रक चालक अथवा पादचारी वाहतुकीच्या नियमांचे पालनच करीत नाहीत. काही लोक त्याला अपवाद असले तरी बहुतांश लोक वाहतूक नियमच पाळत नाहीत. सिग्नल्सवर झेब्रा क्रॉसिंगच्या आधी वाहने थांबवणे गरजेचे आहे. वाहन चालक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. उजवीकडे वळायचे असेल तर हळूहळू उजवीकडे जायला हवे. अनेक वाहन चालक अचानक उजवीकडे वळतात नि अपघात होतो.
रस्ता ओलांडण्यासाठी पूल अथवा झेब्रा क्रॉसिंगचा वापर करायला हवा. जेथे झेब्रा क्रॉसिंग आहे, तेथे लोक त्याचा वापर करीत नाहीत. केव्हाही कुठूनही लोक रस्ता ओलांडतात. रस्ता ओलांडताना वाहन येत आहे की नाही, हे पाहतही नाहीत. केव्हाही कुठूनही वाहने एकदम समोर येतात. विशेषत: मोठय़ा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आधी जाऊ दिले पाहिजे. मात्र, गल्लीबोळातून येणारी वाहने वेगात रस्त्यावर येतात नि अपघात होतो. रस्त्याने पायी जातानाही वाहतुकीला अडथळा होईल, असे चालतात व उभे राहतात. पदपथ अनेक ठिकाणी असले तरी नागरिक त्याचा वापर करीत नाहीत. त्यावर दुकानांचे सामान असते. रस्त्याच्या मध्ये असलेले विजेचे खांब, खड्डे, अंधार अपघाताला कारणीभूत ठरतात. वाहनांची स्थिती अपघाताचे कारण ठरू शकते. ब्रेक योग्य काम करीत नसतो, टायरमध्ये कमी हवा, दिवा नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे, जास्त सामान भरणे ही अपघाताची कारणे आहेत. वाहन चालकात दृष्टीदोष नसावा, असे वाहतूक पूर्व शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश बदरे यांनी सांगितले.