ऊसतोडणीसाठी अन्यत्र स्थलांतरित झालेल्या जिल्ह्य़ातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सरकारने आष्टी तालुक्यात चालू वर्षी २१ हंगामी वसतिगृहांना मान्यता दिली. त्यामुळे या मुलांची दिवाळी वसतिगृहात साजरी होणार आहे.
बीड जिल्हा ऊसतोडणी मजुरांचा म्हणून ओळखला जातो. ऊसतोड कामगार विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. या कामगारांच्या मुलांसाठी सरकारने आष्टी तालुक्यात चालू शैक्षणिक वर्षांसाठी २१ हंगामी वसतिगृहांना मान्यता दिली. तालुक्यातील जामगाव, डागवस्ती, हातोला, रुई (ना.), िशदेवस्ती, लमाणवाडी, लमाणतांडा, तागडखेड, पांगुळ गव्हाण, देसूर, कारखेल, पोंधे तिरमल, शेडाळा, केरुळ, कुतरवाडी, वनवेवाडी, मिहदा, मोराळा, खडकवाडी, पांगरा, मिरडवाडी या गावांत ६८६ मुले, ६४७ मुली मिळून १ हजार ३३३ विद्यार्थी वसतिगृहात दाखल झाले. त्यासाठी प्रतिविद्यार्थी २५ रुपये एका दिवसासाठी रक्कम असून तेल, साबण, मंजन, आरशासाठी १८० रुपये, स्वयंपाकी मानधन ५०० रुपये, स्वयंसेवक मानधन ५०० रुपये, अधीक्षक मानधन ५०० रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.