प्रभागात मोठय़ा आकाराची नवीन जलवाहिनी जोडून पाणी पळविण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून महापालिका सभागृहनेते महेश कोठे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर सपाटे यांच्यातील संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता देवीदास मादगुंडी यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असताना याउलट, सपाटे यांनीही दिलेल्या फिर्यादीनुसार पालिका सभागृह नेते कोठे व त्यांचे पुतणे नगरसेवक देवेंद्र कोठे, कनिष्ठ अभियंता मादगुंडी यांच्यासह इतरांविरुद्ध सपाटे यांच्यावर खुनीहल्ला केल्याच्या गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.
एकमेकांविरुद्ध पोलिसात नोंदविण्यात आलेल्या या तक्रारी कमी आहेत की काय म्हणून पुन्हा तिसरी तक्रार सपाटे यांच्या विरोधात कोठे यांच्या एका समर्थक कार्यकर्त्यांने नोंदविली आहे. यात सपाटे व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कोठे व सपाटे यांच्यातील संघर्षांने टोक गाठल्यामुळे मुरारजी पेठेतील वातावरण तापले आहे. या संघर्षांला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांच्यात अलीकडे सुरू असलेल्या ‘शीतयुद्धा’ची पाश्र्वभूमी असल्यामुळे हा विषय राजकीयदृष्टय़ा संवेदनशील बनला आहे.
सपाटे यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसचे देवेंद्र कोठे यांचा प्रभाग आहे. कोठे यांनी २४ इंचांच्या नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले असून हे काम रात्री उशिरा सुरू असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी सपाटे यांनी या कामाला जोरदार हरकत घेत पालिकेचे कनिष्ठ अभियंता देवीदास मादगुंडी यांना धक्काबुक्की करीत जलवाहिनी जोडण्याचे काम थांबविले. आपल्या प्रभागातील पाणी शेजारच्या प्रभागात पळविण्याचा घाट घातला जात असताना त्यास आपली हरकत होती, असे सपाटे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सपाटे यांच्या विरुद्ध कनिष्ठ अभियंता मादगुंडी यांनी मारहाणीची व सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली असता त्याउलट, सपाटे यांनीही निराळे वस्तीतील प्रभागात जलवाहिनी कोणाला विचारून टाकत आहात, असे विचारले असता महेश कोठे, देवेंद्र कोठे यांच्यासह कनिष्ठ अभियंता मादगुंडी व इतर ४० ते ५० जणांच्या जमावाने आपणास धक्काबुक्की करीत खुनाची धमकी दिली व खड्डय़ात ढकलून देऊन व अंगावर माती टाकून खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल केली आहे.
फौजदार चावडी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास हाती घेतला असतानाच सपाटे व त्यांच्या कुटुंबीयांनी तलवारीने आपणावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार किरण पवार या कोठे समर्थकाने केली आहे. पवार (२५) यांना सोलापूर मरकडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास निराळे वस्तीजवळ घडलेल्या या घटनेत सपाटे यांच्यासह त्यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे व पुत्र अ‍ॅड. बाबासाहेब सपाटे यांची नावे मारेकरी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद नव्हता.
कोठे व सपाटे हे एकमेकांचे हाडवैरी असून एकमेकांविरुद्ध शह-प्रतिशह देण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कोठे यांना दारुण पराभव पत्कराला लागला होता. यात सपाटे यांना काँग्रेसअंतर्गत राजकारणात ‘उज्ज्वल’ आशीर्वाद मिळाल्याचे आजही बोलले जाते. कोठे यांच्या पराभवाचा संबंध त्यापूर्वीच्या २००४ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीतील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्या पराभवाशी जोडला जातो. या पाश्र्वभूमीवर शिंदे व कोठे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे उघडपणे बोलले जाते. त्यातूनच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपाटे व कोठे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याने हा विषय संवेदनशील बनला आहे.