प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढत अत्यंत चुरशीची ठरली आहे. आठ वेळा विधानसभेची पायरी चढणारे राष्ट्रवादीचे आ. ए. टी. पवार यांच्यापुढे भाजपचे यशवंत गवळी आणि माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
१९७० पासून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या एटींनी १९८५चा अपवाद आठ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या वेळीही प्रचारात त्यांनी विकासकामे या मुद्दय़ावर अधिक भर दिला आहे. तर भाजपचे गवळी यांना स्वच्छ प्रतिमा, तरुण व सर्वाशी सलोख्याचे संबंध, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची साथ आणि मोदी लाट आपणास तारून नेईल असा विश्वास आहे. माकपचे गावित यांचा पारंपरिक मतदारांवर विश्वास आहे. काँग्रेसचे धनराज गांगुर्डे यांच्याकडे दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव आणि काँग्रेसची हक्काची मते आहेत. शिवसेनेचे भारत वाघमारे यांचा भर शिवसैनिकांच्या फळीवर आहे.
सुमारे दोन लाख ४० हजार मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आघाडीला ६० हजार, भाजपला ५३ हजार तर माकपला ४६ हजार मते पडली होती. यावरून या मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व असल्याचे दिसत असले तरी युती आणि आघाडी स्वतंत्र झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसमध्ये असलेले पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत गवळी भाजपचे उमेदवार झाले. सुरगाण्यातील राष्ट्रवादीचे काही नेतेही भाजपच्या प्रचारात आहेत. त्याशिवाय काँग्रेसकडून दोन वेळा एटींना टक्कर दिलेले धनराज गांगुर्डे हेही रिंगणात आहेत. त्यामुळे होणाऱ्या मतविभागणीकडे इतर उमेदवारांचे लक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघात जबरदस्त चुरस वाढली आहे.
आदिवासीबहुल मतदारसंघ असला तरी ५० हजारांच्या आसपास मतदारसंख्या असलेल्या बहुजन समाजाच्या हातात उमेदवाराच्या विजयाची दोरी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ए. टी. पवार (राष्ट्रवादी) यांना ७४१५२, जे. पी. गावित (माकप) ५८०३९, यादव धूम (शिवसेना) १०६८ याप्रमाणे मतदान झाले होते.