अंबरनाथ पालिकेतील सहा समित्यांतील सदस्य निवडीसाठी बुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत राष्ट्रवादी-काँग्रेस-आरपीआय-मनसे आघाडीचे आठ, तर शिवसेना-भाजप-अपक्ष महायुतीचे सात सदस्य निवडून आल्याने पुढील आठवडय़ात होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना गनिमीकाव्याने पुन्हा एकदा आघाडीला धक्का देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगरचे नायब तहसीलदार विकास पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी विशेष सभा झाली. यात प्रत्येक समितीत १५ सदस्य घेण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे सर्व पक्ष गटनेत्यांनी नावे दिली, त्यात आघाडीचे आठ व युतीचे सात सदस्य प्रत्येक समितीत आहेत. २०१३ मध्ये हीच स्थिती होती. आघाडीचे बहुमत असताना युतीने एका समितीचे सभापतीपद खेचण्यात यश मिळवले होते.
यंदाही तसाच प्रयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थायी समितीवर माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, कॉंग्रेसचे प्रकाश पाटील आणि मनसेच्या ज्योत्स्ना भोईर या तीन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष रमेश गुंजाळ यांच्याकडे शिक्षण समिती राहणार आहे. आघाडी आणि युतीचे नेते कोणती खेळी खेळतात, यावर समिती सभापतीपद कोणाकडे जाईल हे ठरणार आहे.