माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील म्हणजेच आबांना येथील गांधी चौकात आयोजित सर्वपक्षीय सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्वानी आबांच्या संघर्षशील व साध्या राहणीमानाचा उल्लेख करताना त्यांनी केलेल्या कार्याचा वसा पुढे सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली.
आबांचे कार्य पुढे नेणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विधीज्ञ जयकुमार कासलीवाल यांनी महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला जणू दृष्ट लागल्याचे सांगितले. विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि आता आर. आर. पाटील या धुरंधर नेत्यांना आपण गमावले आहे. वकील असूनही कधी कोट न चढवता आयुष्यभर जनतेच्या सेवेची वकिली करत आबांनी आपले चारित्र्यही जपले. गरिबीतून वर आलेला नेता म्हणून त्यांची ओळख सर्वसामान्यांना होती. डान्सबार बंदी, ग्राम स्वचछता अभियान, महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान असे त्यांनी घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आबांचा पूर्ण जीवनपट उलगडला. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास, साहित्य संमेलनातील प्रसंग अशी अनेक उदाहरणे देवून आबांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. शिक्षक नेते कचेश्वर बारसे यांनी आव्हान स्विकारायाचे आणि पूर्ण करायचे ही आबांची खरी ओळख होय, असे मत मांडले. चळवळीतील कार्यकर्ता असल्याने तसेच साधी राहणी, निष्कलंक व्यक्तीमत्व असल्याने त्यांचा प्रचार करण्यसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, मेघा पाटकर गेले होते, असा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. नगराध्यक्ष रामनिवास कलंत्री, आ. पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्ष अरूण पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 1:33 am