पारपत्रासाठी अर्ज केल्यानंतर पोलीस पडताळणीसाठी लागणारी लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रिया आता इतिहासजमा होणार आहे. मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या आधुनिक यंत्रणेद्वारे अवघ्या दहा दिवसांत पारपत्र पडताळणी केली जाणार आहे. गुरूवारी पोलीस आयुक्तांनी या यंत्रणेचा शुभारंभ केला. पारपत्रासाठी विशेष हेल्पलाइनसुद्धा सुरू करण्यात आली.
मुंबईत पारपत्रासाठी दररोज बाराशे अर्ज येत असतात. परंतु पोलिसांच्या पडताळणीत महिना दीड महिना जातो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा २ च्या प्रयत्नाने केवळ १० दिवसांत ही प्रक्रिया पार पाडणारी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पारपत्र सेवा केंद्र, विशेष शाखा २ आणि मुंबईची सर्व ९२ पोलीस ठाणी ऑनलाइनद्वारे जोडण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या यंत्रणेबाबत सांगितले की, अर्जदाराने अर्ज केल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे त्याचा अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात ऑनलाइन पाठविण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराला मेसेज पाठवून कळविण्यात येईल. हा मेसेज आल्यानंतर तीन दिवसांत अर्जदाराने पोलीस ठाण्यात आपली माहिती द्यायची आहे. रविवारीसुद्धा त्याला आपली माहिती देता येणार आहे. सात दिवसांत ही प्रकिया पूर्ण होईल. ही माहिती विशेष शाखा २ मध्ये ऑनलाइन देण्यात येईल. तेथून तीन दिवसांत प्रादेशिक पारपत्र कार्यालयात अहवाल पाठविण्यात येईल. म्हणजे दहा दिवसात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून तसा एसएमएसही संबंधित तक्रारदाराला पाठविण्यात येणार आहे. पारपत्राविषयीच्या अडचणी दूर करण्यासाठी ७७१५ ८०० ००० या क्रमांकाची हेल्पलाइन आणि srpipassportssb2-mum@nic.in ही ईमेल सेवाही सुरू करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अस्वस्थी दोर्जे (विशेष शाखा २) यांनी सांगितले.